राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी 1 महिन्यांचा अवधी मागितला. त्यानंतर, मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची गॅरंटी द्या, अशी मागणी करत लक्ष्मण हाके वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. ओबीसी समजााच्या न्याय व हक्कासाठी आपलं उपोषण आहे, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी 5 दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यातच, गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केले आहेत. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडत चालली असून अशक्तपणाही आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला. मात्र, हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे. तर, डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपलं प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढत असून त्यांनी पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.
येत्या 2 ते 3 दिवसांत छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी जाणार आहेत. अंतरवली सराटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्रीत भुजबळ जाणार असून मराठा आंदोलनाला आव्हान देत भुजबळ ओबीसी आंदोलकांना पाठिंबा दर्शवणार आहेत. भुजबळांच्या शिष्टमंडळाने ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आहे. समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत छगन भुजबळ तुमच्या सोबत असल्याचा पाठिंबा हाकेंना दर्शवला आहे. भुजबळांच्या सहकाऱ्यांनी हाके आणि भुजबळ यांच्यात फोनवरून संवाद घडवून आणला. अंतरवली सराटीच्या वेशीवरच मराठा आणि ओबीसी वाद रंगण्याची शक्यता आहे.
कुणबी नोंदी हा फ्रॉड आहे. कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हे आम्हाला शासनाने सांगावं. महाराष्ट्रात तुम्ही दहशतीचे वातावरण निर्माण केलं. तुम्ही बीडमध्ये कोणाची घर आणि कोणाची हॉटेल जाळली आणि तुम्हीच ओबीसी वाद निर्माण करत आहे. ई डब्ल्यू एसमध्ये दहा टक्के पैकी साडेआठ टक्के लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे. शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारा ओबीसी आहे, त्याच्या अन्नात माती कालवू नका. सग्या-सोयऱ्या शब्दामुळे केवळ ओबीसीचे नाही तर एस सी आणि एसटी चे आरक्षण सुद्धा जाऊ शकते. खिरापत वाटल्याप्रमाणे कुणबी सर्टिफिकेट वाटले जात आहे. अन्याय होत असताना महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहेत? तुम्हाला पैशाचा आणि सत्तेचा माज आहे. यावेळी हेलिकॉप्टरने पैसे वाटले तरी तुम्हाला ओबीसी मतदान करणार नाही. धनगर समाजाचे नेते ओबीसीच्या अठरापगड जातीच्या संरक्षणार्थ व्यासपीठावर आहेत. भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. मराठा नेत्यांना कळकळीची विनंती आहे. जरांगेची कृती समोर आली तर तुम्हाला सुद्धा तोंड काळ करावा लागेल. खूप गोष्टी आहेत वेळ आल्यावर बोलेल, सगेसोयरे शब्दांमुळे केवळ ओबीसींचेच नाही तर एससी आणि एसटी वर्गाचे आरक्षण सुद्धा जाऊ शकतं. मनोज जरांगेंमुळे मराठा नेत्यांचीही मान खाली जाईल. ओबीसी समाजावर अन्याय होताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठे आहेत. - लक्ष्मण हाके
0 टिप्पण्या