Top Post Ad

सुशिक्षित युवकांनी राजकारणामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिरीरीने सहभाग घेणे अत्यावश्यक


  निवडणुकीचा निकाल पाहता कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला बहुमत नाही. या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला देशातील दलित वंचित समाजाच्या जनतेचा सहभाग व त्यांच्या मताचे मोलाचे योगदान आहे. देशातील दलितांच्या बाबतीत न बोलता केवळ महाराष्ट्रातील दलितांच्या राजकीय वाटचालीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सध्या दलित समाजातील नवीन पिढी नव्हे तर जुनी फळी सुद्धा थोडीशी घाबरलेल्या स्थितीत आणि निराश झाल्याचे दिसते. मात्र सदर निवडणुकीमध्ये राज्यातील स्वतःला विद्वान समजणारे साहित्यिक आणि उत्तम ओरिएटर्स पुढाऱ्यांनी दलित मतदारांना चुकीचे संदेश देऊन राज्यघटना धोक्यात असल्याचे सांगत राज्यातील  दलित वंचितांचा एकमेव भक्कम असलेल्या राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी ला साथ न देता केवळ काँग्रेस प्रणित इंडिया महाविकास आघाडी ला मतदान करण्यास प्रवृत्त करून महाविकास आघाडी ने दलितांची मते आपल्या पदरी पद्धतशीरपणे पाडून घेतली. 

मुख्यतः ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांनी उमेदवार दिलेले नव्हते अशा ठिकाणी राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या मतदारांना महाविकास आघाडीला मदत करण्याचे खुले आव्हान दिलेले होते. त्यानुसार नागपूर कोल्हापूर सातारा सांगली बारामती इत्यादी ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यायला पाहिजे म्हणून वंचित चे उमेदवार दिले नव्हते त्याचा परिणाम म्हणून त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार घवघवीत मतांनी विजयी होऊन बीजेपी व एनडीए यांचे पानिपत केल्याचे स्पष्ट चित्र दिसते. मात्र महाविकास आघाडीने माणुसकी व नैतिकतेचा खून करत अकोला येथे दलित समाजाची एकमेव प्रतिष्ठेची असलेली एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या जागेवर मतदारसंघात उमेदवार देऊन मदत करणे तर सोडून द्या मात्र तिथे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना पाडण्याचे जबरदस्त काम महाविकास आघाडी यांनी केलेले आहे हे आमच्या समाजातील विद्वानांना (ज्यांनी वंचित चा उमेदवार असूनही महाविकास आघाडी ला मदत केली)  समजण्यास हवे होते. 

आमचे काही लोकं या निवडणुकीच्या निकालामुळे अतिशय आनंदी आहेत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अशा लोकांना सवाल आहे की, आपण "दुसऱ्यांना बाप म्हणण्यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप म्हणणे योग्य राहील" महाराष्ट्रातले दलित असे खुश आहेत की जणू त्यांचाच विजय झालेला आहे. एका प्रचलित म्हणी प्रमाणे "पाटलाचे घोडे- महाराला भूषण". आपल्या हक्काचा सक्षम राजकीय पक्ष असताना आपण काय म्हणू महाविकास आघाडी ला मदत करायची? एवढा साधा विचार ह्या लोकांच्या मनात येऊ नये ही नवलाची गोष्ट. उलट ते लोक असे म्हणतात की आमच्या पिढ्यान पिढ्या वाया जात आहेत पण आम्हाला सत्तेत येता येत नाही, तेव्हा सवाल निर्माण होतो की, केवळ सत्तेमुळेच समाजाचा विकास होतो का? असं असेल तर बाबासाहेब हे कधीच सत्तेमध्ये नव्हते. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काँग्रेसने त्यांना कधीच सत्तेत येऊ दिले नाही, तर आपला विकास झाला नाही का? राजकीय ताकद ही निश्चितच मोठी ताकत असते, जो समाज सातत्याने सत्तेत असतो त्या समाजाचा झपाट्याने विकास होतो हे निश्चित आहे. बाबासाहेब म्हणतात की राजनैतिक सत्ता ही अशी किल्ली आहे की जी प्रत्येक कुलूप सहजपणे उघडू शकते, सगळ्या समस्यांचे निराकरण होऊ शकते आणि समाजाचा झपाट्याने विकास होतो. मात्र त्यासाठी आपल्या स्वाभिमानाची तिलांजली देणे बाबासाहेबांना कदापिही पसंत नव्हते मान्य नव्हते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

समाजातील अशाच संधी साधू लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतही काँग्रेसच्या मदतीने तसंच केलं आणि त्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती माननीय कांशीराम जी यांच्यासोबत आणि नंतर माननीय  मायावती यांच्यासोबत सुद्धा काँग्रेस पक्षांनी खेडी करून पक्ष फोडण्याचे काम केले. मात्र महाराष्ट्रातील दलित वंचित समाज व नवीन पिढी  हा काँग्रेसचा कावा चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. काँग्रेस व त्यांच्या प्रणित पक्षांना वंचित सोबत तसे करणे शक्य होणार नाही कारण वंचित चे आदरणीय नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार व चाणाक्ष राजकारणी असल्याने काँग्रेसची डाळ सिजणे शक्य नाही. 

वंचितांचा काँग्रेस किंवा त्यांच्या प्रणित आघाडीला कोणताही विरोध नाही, मात्र दलितांच्या वंचितांच्या संख्येनुसार जर सत्तेत वाता मिळाला तर सत्ता संघर्ष करण्याची कोणतीही गरज नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा सत्तेमध्ये संख्येनुसार सारखा वाटा मिळण्यासाठीचाच लढा होता व आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांचाही तोच लढा आहे हे विसरून चालणार नाही. जर आपण आपल्या स्वाभिमानला विकून काँग्रेस व आघाडीशी तळजोड केली तर येणारा काळ हा आपणाला नष्ट करणाराच असेल याची जाणीव आजच्या युवकांना असण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने 1925 पासून लढा व आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अथक -निरंतर परिश्रम घेत आणि हतास न होता निस्वार्थपणे कार्य करत राहिल्यामुळेच कालपर्यंत बीजेपी सारखा पक्ष बहुमताने सत्तेवर होता. ह्यापासून आपण सुद्धा शिकलो पाहिजे. आपला तर जन्मच 1950- 1956 च्या नंतर झालेला आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा राजकीय वाटचाल करण्यामध्ये भरपूर अवसर आहे व आज सुद्धा आपण जे मिळवले ते इतरांपेक्षा कमी नक्कीच नाही आहे हे विसरून चालणार नाही. हाताश न होता नव्याने परत उठून उभे राहून निस्वार्थ सेवा करून वंचित व एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम करण्याची गरज नवीन पिढीवर आलेली आहे.

ज्या दलितांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मदत केली त्या दलितांचा खरंच आघाडीचे लोक उपकार जाणतील का किंवा त्यांना मोलाचे स्थान दिल्या जाईल का हा एक प्रश्न आहे. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की अशा लोकांना कोणीच विचारत नाही, काल एका इतर मागास वर्गातील व्यक्तीला विचारलं की, जिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नाही मात्र तिथे वंचित किंवा बीएसपी चा उमेदवार असेल त्या ठिकाणी तुम्ही वंचित किंवा बीएसपी ला मतदान केले असते का? तर त्याचे उत्तर सरळ नाही होते.यावरून सरळ असे लक्षात येते की देशात दलितांच्या मताचा फायदा इतर लोक घेऊन शकतात मात्र दलितांच्या पक्षांना इतर लोक जे आरक्षणामध्येही आहेत ते सुद्धा मत देत नाहीत ही बाब स्पष्ट असूनही आमच्या विद्वान लोकांना समजत नाही? याचा मोठा आश्चर्य वाटतं.

परत एक प्रश्न निर्माण होतो की, जे दलित नेते आरक्षणाचा फायदा घेऊन इतर पक्षांमध्ये निवडून येतात ते खरंच ज्यांची मते घेऊन निवडून आले त्यांची सेवा करतात का? किंवा  त्यांच्या पक्षात यांचे प्रश्न घेऊन गेले तर त्यांचं त्यांच्या पक्षश्रेष्ठींपुढे काही चालते का? तर उत्तर सरळ नाही आहे हे नितळ पाण्यासारखं सत्य आहे. मग जर अशा आरक्षित पदावर आरक्षित जागेवर निवडून गेल्यानंतर समाजाच्या कामी पडत नसतील तर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये भांडून आणि पुणे कराराचा संघर्ष करून दलित, अस्पृश्य व इतर मागास लोकांसाठी जे आरक्षण मिळवलं आणि भारत स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेमध्ये दलित अस्पृश्यांच्या आधी इतर मागासवर्गीय व इतर जातींना आरक्षण देऊन त्याचा समाजासाठी काय फायदा झाला? हा प्रश्न प्रकर्षाने निर्माण होतो. म्हणजेच शिकलेल्यांनी समाजाला फसवलं अशी स्थिती आहे.

काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीपर्यंत स्वतंत्र भारतात एकाही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून येऊ दिले नाही, संविधान सभेमध्ये त्यांच्यासारखा विद्वान संविधान पटू नसल्याने ना इलाजाने संविधान सभेत निवडून आणून दिले होते. अशा काँग्रेस पक्षासोबत आमचे काही लोक इमाने इतबारे काम करतात व इतरांनाही प्रवृत्त करीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील ९५% फुले शाहू आंबेडकरी समाज प्रकर्षाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यासोबत इमानदार व खंबीरपणे उभा आहे, ही आंबेडकरी चळवळीची जमेची बाजू आहे यात शंका नाही.  काही महाविकास आघाडीचे लोक म्हणतात की वंचित मुळे आम्हाला दलितांची कमी मत मिळाली, मात्र ही मंडळी सहजपणे विसरले की, ज्या ज्या ठिकाणी वंचित ने उमेदवार दिले नाहीत त्या त्या ठिकाणी वंचितच्या लोकांनी महाविकास आघाडीलाच भरघोस मत देऊन उमेदवार निवडून आणले, त्यामुळे वंचित चे मागच्या निवडणुकीतील प्रत्यक्ष मत मोजताना अप्रत्यक्षपणे कमी झालेले दिसतील. मात्र ते मत कमी झालेले नसून महाविकास आघाडीमध्ये जोडलेले आहेत हे नाकारता येणार नाही.

 2024 च्या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने असे लक्षात आले की राहुल गांधी व इंडिया आघाडीचे नेत्यांनी एका हाती बाबासाहेबांचा फोटो तर दुसऱ्या हाती संविधानाची प्रत घेऊन संविधान वाचवा आणि इंडिया आघाडीला मतदान द्या म्हणत देशभरात प्रचार केला. मला इथे असे म्हणायचे आहे की राहुल गांधी यांनी दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणत त्यांचा फोटो वापरण्यापेक्षा आपल्या आजी आजोबा- वाढ - वडिलांच्या प्रतिमा वापरून मत मागायला हवे होते. त्यांनी तसं केलं नाही कारण त्यांना हे माहिती आहे की आता बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय व घटने शिवाय काँग्रेस इंडिया आघाडीलाच नव्हे तर भारत देशाला दुसरा पर्याय नाही आणि दुसरे फोटो चालणारही नाही. आणि त्यांची ही युक्ती यशस्वी झाल्याचे दिसून येते व महाबलाढ्य एनडीए सरकार पडताना दिसते ही किमया केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे, राज्यघटनेमुळे वंचित दलित पीडित लोकांच्या मतामुळे शक्य झाली यात कोणीही दुमत करणार नाही.

 म्हणजेच आमच्याकडे एक जमेची बाजू अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत आणि आपण सुद्धा आगामी निवडणुका भरघोस मतांनी निवडून येऊ शकतो यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. निवडणुकीत हारले जिंकले हा एक स्पर्धा असल्यासारखा भाग आहे त्यामुळे हताश न होता नव्याने कामाला लागल्यास ज्या ठिकाणी आपल्या चुका झाल्या त्या शोधून काढल्यास येणाऱ्या काळामध्ये आपले यश पक्के आहे यामध्ये शंका नाही. त्यासाठी समाजातील सुशिक्षित नवीन युवकांनी राजकारणामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिरीरीने सहभाग घेणे अत्यावश्यक आहे किंबहुना ते आजच्या पिढीचा आद्य कर्तव्यच आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर जे अनंत उपकार केलेत त्याची जाणीव ठेवून आपण युवकांनी ह्या चळवळीमध्ये  तन- मन धनाने येतोचित सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सोबत मागच्या फळीतील अनुभवी लोकांचे मोलाचे मार्गदर्शन राहणारच राहिलाच यात शंका नाही.

  •  एडवोकेट शांताराम मोरे,
  • उच्च न्यायालय, नागपूर
  • 9960337312

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com