Top Post Ad

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस "लिफ्ट"ने एकत्र प्रवास... राजकीय चर्चांना उधाण


  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली.   त्यामुळे गुरुवारपासून मुंबईत सुरुवात होणाऱ्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलेमोठे चॉकलेट दिले. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानभवातून बाहेर पडले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता उद्धव ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. त्यावर पत्रकारांनी, 'कोण कोणाला डोळा मारतंय, हे कळालं पाहिजे', असे म्हटले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्कीलपणे म्हटले की, मी उद्यापासून गॉगल घालून येऊ का?. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला.   दोघांनीही लिफ्टनेही एकत्रच प्रवास केला. त्यावेळी लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं,  प्रवीण दरेकर हेदेखील उद्धव आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये होते. तेव्हा या बाबत प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होतो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आज होणाऱ्या भेटीगाठींमुळे पुन्हा मनोमिलन होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरे भेट झाली. तर त्यानंतर लिफ्टमध्ये उद्धव-फडणवीस 'अचानक' भेट झाली. पण या अचनाक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.  देवेंद्र फडणवीसांसोबतच्या लिफ्ट प्रवासाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे असं काहीही नाही.   मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगचं आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे या पुढे गुप्त बैठक तिथेच करू." 

उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस यांच्या नावावर आता फुली मारली आहे,   म्हणजे विषय संपला आहे. एकत्र येणार वगैरे काहीही असं नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असा होत  नाही. चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभा राहिलो आहे. माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची त्यांना विनंती आहे की,  जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका.   तुमच्या अशा चॉकलेटनी आम्ही तुम्हाला जनतेच्या समस्यांबाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका. मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही.  वर्धापन दिनादिवशी उद्धव साहेबांनी हे स्पष्ट केला आहे की, कुठली चर्चा झाली नाही आम्ही कुणासोबत जाणार नाही म्हणजे जाणार नाही  -  शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com