*नीट परिक्षेतील घोटाळ्यावर पंतप्रधान गप्प का? जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा - प्रा. वर्षा गायकवाड*
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. नीट परीक्षेचा पेपऱ फुटल्याने देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे पण केंद्रातील भाजपा सरकार कारवाई करत नाही. भाजपा सरकारच्या विद्यार्थी विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध करत मुंबई काँग्रेसने आंदोलन केले. सर्व मुद्द्यांवर ‘मन की बात' करणारे पंतप्रधान मोदी नीट पेपरफुटी प्रकरणी गप्प का? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या पेपरफुटीची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा व नीट परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन करुन भाजपा सरकारचा निषेध केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. नीट परिक्षेतील घोटाळा हा गंभीर प्रकार असून व्यापक घोटाळ्यासारखा हा घोटाळा आहे. भाजपा सरकारच्या काळात जवळपास १०० पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत पण सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाकाखाली एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तरीही मोदी गप्प कसे? कारवाई का करत नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात पण पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान दिसत नाही का?
नीटचा पेपर फुटला असतानाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटला नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. खासदार राहुलजी गांधी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सरकारला जाब विचारल्याने भाजपा सरकार खडबडून जागे झाले व फेपरफुटी झाल्याचे कबुल केले मग कारवाईबाबत भाजपा सरकार गप्प का आहे. राजकारण हे शिक्षणापासून वेगळे ठेवले पाहिजे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, सचिन सावंत, प्राणिल नायर, संदीप शुक्ला, तुषार गायकवाड, सुरेशचंद्र राजहंस, युवराज मोहिते, अजंटा यादव, कचरू यादव ,अखिलेश यादव, प्रद्युम यादव यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या