*ठाणे* येत्या ०५ जून रोजी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्र्. ०१ आणि नागला बंदर चौपाटी अशा दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यात बकुळाची १००० झाडे लावली जाणार आहेत. तर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने ५०० झाडे लावली जाणार आहेत. त्यात, पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे.
त्याचबरोबर, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, ०५ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५.०० वाजता ' करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे' या विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, स्टॅण्ड अप कॉमेडी, कविता, पर्यावरण नगरी यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.
0 टिप्पण्या