तीर्थस्थळ कुठलेही असो, यात्रा - जत्रेच्या दिवशी तिथे दर्शनासाठी उसळणाऱ्या गर्दीच्या काळात भाविकांची वाहने ठराविक किलो मीटरच्या अंतरावरच रोखली जातात, त्यांची पार्किंगची व्यवस्था तिथेच केली जाते. त्याला दरवर्षी १ जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला दिली जाणारी मानवंदनाही अपवाद नाही. त्या दिवशी कुठल्याही वाहनाला थेट विजय स्तंभापर्यंत जाण्यास परवानगी दिली जात नसते. तसेच महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दीचे व्यवस्थापन करताना वाहतुकीसाठी रस्ते बंद वा खुले ठेवण्याचे मुंबई पोलिसांचे नियोजन कौशल्य तर वाखाणण्यासारखे असते.
मग राज्यात फक्त एकट्या दीक्षाभूमीवरच मध्यभागी वाहनतळ ' उभारण्याचा अतार्किक घाट कुणी घातला आहे? तो वाहनतळ नेमका कुणासाठी आणि कुणाची सोय आणि लाभासाठी आहे?हा वाहनतळ उभारल्यानंतर दीक्षाभूमीवर दरवर्षी अशोक विजया दशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनी विक्रमी ग्रंथ विक्री होणारे पुस्तकांचे स्टॉल्स आणि प्रकाशक - विक्रेते कुठे जाणार? या प्रश्नांची उत्तरे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सूत्रधार - धुरीण देतील काय? कारण दीक्षाभूमीवर सध्या जे काही खोदकाम, बांधकाम सुरू आहे, ते एखाद्या बड्या सरकारी प्रकल्पासारखेच दिसत आहे. मात्र त्याबाबत संशयास्पद लपवालपवी, बनवाबनवी सुरू आहे, असा आरोप विदर्भातील आंबेडकरी कार्यकर्ते करू लागले आहेत.
*संविधानाचे रक्षण करणारा स्पेशल टास्क फोर्स' दीक्षाभूमीवर आता कसा विसावणार? आपल्या पश्चात लोकशाहीच्या रक्षणासाठी स्पेशल टास्क फोर्स ' उभा करूनच द्रष्ट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता!
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांची जोपासना - जपणूक करण्यासाठी त्याला अनुरूप अशी देशातील लोकांची मानसिकता घडविण्याची नितांत गरज होती. त्यादृष्टीने लाखो दलितांना तथागताच्या मुक्तीपथावर नेवून ठेवले. अन् देशाच्या लोकशाहीच्या भविष्याबद्दल स्वत:ला वाटणारी भ्रांत बाबासाहेबांनी मिटवली होती. त्यांनी बाळगलेला विश्वास त्या स्पेशल प्रोटेक्शन फोर्सने ताज्या लोकसभा निवडणुकीत सार्थ ठरवला आहे.
पण पुढील तीन महिन्यांनी येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी बौध्द समाजाचा लाखोंचा स्पेशल प्रोटेक्शन फोर्स छिन्न विच्छिन्न दीक्षाभूमीवर कसा विसावणार? त्यासाठी तिथली अंडर ग्राऊंड पार्किंगची अदूर्दर्शी आणि आत्मघातकी योजना रद्दबातल करून दीक्षाभूमी पूर्ववत करून घेण्याची गरज आहे. अन् ती जबाबदारी सर्वस्वी दीक्षाभूमी स्मारक समितीची आहे.
त्या समितीच्या डॉ. राजेंद्र गवई आदी पदाधिकाऱ्यांना बौद्ध बांधवांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. त्याचा एक व्हिडिओ आवाज इंडिया ' न्युज चॅनलने प्रसृत केला आहे. त्यात एका भगिनीने व्यक्त केलेली भीती रास्त आणि पुढील भयाण धोक्याचा इशारा देणारीच आहे.
ती ताई म्हणते : गरज नसलेल्या अंडर ग्राऊंड पार्किंगसाठी भयंकर खोदकाम करून दीक्षाभूमी विद्रुप करण्यात आली आहे. आता तिथे माझे लाखो बौद्ध बांधव येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी कसे सामावणार? हा प्रकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न झाला तर त्यात पुढची दोन आणि कदाचित पाचही वर्ष जातील. दीक्षाभूमीवर उभे राहायला धड जागाही उरली नाही तर नाईलाजाने बौद्ध बांधवांना इथे येण्याचे टाळावे लागेल. त्यातून हळूहळू पुढे त्यांची संख्या घटत जाईल. नागपूर विकास ट्रस्टला आमची दीक्षाभूमी ओस पाडायची आहे काय?
- दिवाकर शेजवळ
- divakarshejwal1@gmail.com
==========================
दीक्षाभूमीला उध्वस्त होण्यापासून वाचवा.गेल्या काही महीन्यापासून सौंदर्यीकरणाच्या नावाने दीक्षाभूमीला उध्वस्त करण्याचे मोठे कारस्थान राबविण्यात येत आहे.करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग करण्यात येत आहे. जागतिक वारसा असलेल्या या राष्ट्रीय स्मारकाला लागूनच अत्यंत खोलवर खोदकाम केलेले आहे.त्यामुळे या भव्य स्मारकाला धोका पोहचून ते केव्हाही क्षतिग्रस्त किंवा दुर्घटनाग्रस्त होवू शकते.मुळात या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगची आवश्यकताच नाही. भारतात कोणत्याही धार्मिक स्थळाखाली अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही मग दीक्षाभूमीवरच अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी?
श्रीलंकेहून आणलेल्या बोधीवृक्षाची मूळे या खोदकामा दरम्यान क्षती ग्रस्त होऊन भविष्यात हा बोधीवृक्ष नष्ट व्हावा यासाठीचे हे कूटील कारस्थान आहे हे अनुयायांनी लक्षात घ्यावे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी भारतभरातून, विदेशातून बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने दीक्षाभूमी वर येतात आणि बाबासाहेबांच्या साहित्याची येथून विक्रमी खरेदी करून जातात.ज्या ठिकाणी या पुस्तकांचे स्टॉल असतात त्याच ठिकाणी हे खोदकाम सुरू आहे.त्यामुळे येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी बौद्ध अनुयायांना प्रचंड त्रास मनःस्ताप होऊन दीक्षाभूमी वर येणाऱ्या अनुयायांची संख्या कमी व्हावी व लोकांना ज्ञान देणाऱ्या साहित्याची विक्री थांबावी यासाठी सौंदर्यीकरणाच्या नावाने दीक्षाभूमी ओसाड पाडण्याचे कटकारस्थान राबविण्यात येत आहे.दीक्षाभूमीच्या लेकरांना आता बसायला सुद्धा जागा राहणार नाही
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनस्पर्शाने उजळलेल्या व करोडो बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या या पावन भूमीला स्मारक समिती च्या परवानगीने उद्ध्वस्त करण्याचे कूटील कारस्थान आपण फक्त बघत बसायचं काय? बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावना जाणिवपूर्वक दु:खविण्याच्या हेतूने दीक्षाभूमी वर सुरू असलेले अंडरग्राऊंड पार्किंगचे बांधकाम संबंधित विभागाने व स्मारक समितीने परिस्थिती स्फोटक होण्यापूर्वी ताबडतोब थांबवावे.
नागपूरच्या बौध्द बांधवांनी आज १८ जून रोजी सकाळी दीक्षाभूमीवर सुरू असलेले काम बंद पाडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत धम्मबांधव खोदकाम केलेल्या ठीकाणी बसून होते. स्मारक समितीचे सदस्य येतो बोलले होते पण आले नाही पण स्मारक समितीने एका व्यक्तीला पाठविले. धम्मबांधवांनी त्यांच्याकडे निवेदन दिले. सायंकाळी *नागपूरचे पोलिस इन्स्पेक्टर राजपूत* यांनी जनता आणि स्मारक समिती यांच्या मधे 18 जून रोजी समन्वय साधून मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले. 18 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून* परत बांधकाम सुरू असलेल्या जागेवर बसून या बांधकामांला विरोध करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
आमचा सौंदर्यीकरणाला विरोध नाही तर दीक्षाभूमीच्या स्तुपाला अगदी लागून असलेल्या आणि भविष्यात स्तुपाला आणि बोधीवृक्षाला धोकादायक ठरणा-या अंडरग्राऊंड पार्किंग आणि दोन हॉलच्या बांधकामाला आहे. इतर कामाला नाही अफवांवर विश्वास ठेऊ नका. प्रत्यक्ष दीक्षाभूमीवर जाऊन खात्री करून घ्या की हे बांधकाम किती खोलवर आणि स्तुपाजवळ आहे. जिथे स्टॉल लावण्यात येतात त्याच जागेवर हे खोदकाम सुरू आहे. असे आंदोलकांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४च्या दरम्यान फतवा काढणारी नागपुरातील विचारवंत मंडळी कुठे गेली असा सवाल आता नागपूरकर विचारत आहेत.
- अधिक माहितीसाठी संपर्क:-
- 9730016215,
- 9422112593,
- 9096593570,
- 9850491395,
- 9921250343.
0 टिप्पण्या