शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा आपला अजेंडा मनुवादी शक्तींनी सर्व शक्तिनिशी पुढे आणला आहे. हजारो वर्ष ब्रिटिशांची चाकरी, गुलामी करु पण इथल्या बहुजन वर्गाला समता व स्वातंत्र्याच्या आडोशाला ही उभे राहू देणार नाही, हा मनुवादी शक्तींचा अजेंडा. आज आरएसएस याच कुविचारांवर चालत आहे. याच कुविचारांतर्गत शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करून या देशात पुन्हा नव पेशवाई व मनुवादी व्यवस्था स्थापित करण्याचा आरएसएसचा डाव आहे. तो डाव उधळून लावण्यासाठी महाड येथेच पुन्हा मनुस्मृतीचे दहन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड व त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रप्रेमी व आंबेडकरी विचारांच्या सर्व अनुयायी व कार्यकर्त्यांचे प्रथम जाहीर अभिनंदन....! मनुवादी शक्ती जेव्हा जेव्हा डोके वर काढतील, तेव्हा तेव्हा त्यांना ठेचूनच काढले पाहिजे. तेच जितेंद्र आव्हाड यांनी केले. म्हणूनच त्यांच्या हातून गंभीर चूक झालेली असतानाही ते अभिनंदनास पात्रच ठरत आहेत. डोक्यात आंबेडकरी विचार व संविधांनावर निष्ठा असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाकडे या शक्तींना ठेचून काढणारा कृती कार्यक्रम असायलाच हवा. तो आद्य कर्तव्याचा भाग असला पाहिजे. आव्हाडाकडे तो आहे अन् हेच कर्तव्य पार पाडत असताना अनावधानाने काही चुका त्यांच्याकडून झाल्या. त्या क्षम्य आहेत. झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी मागितली असल्याने त्यांना माफ करून त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे घटक बनून त्यात सहभागी झाले पाहिजे. ही आता काळाची गरज आहे. नाहीतर काळ सोकावेल, हे लक्षात घेतले पाहिजे.
समाजात जाती द्वेष व स्त्री द्वेषाची बीजे पेरणाऱ्या मनू व त्याच्या मनुस्मृतीला पुन्हा पुन्हा गाडून टाकण्याचे काम करीत राहिन, त्यात मृत्यू आला तरी चालेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल माफी मागताना म्हटले आहे. त्यामुळे ते खरे आंबेडकरवादी आहेत, तर त्यांचा निषेध करणारे संघ, भाजपचे लाचार, दलाल आहेत.हे आता उघड होऊ लागले आहे.जितेंद्र आव्हाड अन् त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी विचार व संविधानावरील निष्ठेला सत्तेसाठी भाजप व मोदीची दलाली करणाऱ्या कुठल्या ऐऱ्यागैऱ्या नत्थु खैऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा अपवाद सोडला तर बाकी सारा आंबेडकरी समाज समजदार आहे. त्याने आव्हाडांना झालेल्या चुकीची माफी केव्हाच देवून टाकली आहे. आता जे आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. ते संघ व भाजपचे दलाल आहेत. राज्यातील पोलिस ही सत्तेच्या दबावाखाली काम करीत असून पोलिसांनी त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. पण जितेंद्र आव्हाड सच्चा आंबेडकरवादी आहे. त्याच्या डोक्यात आंबेडकर आहे. त्यामुळे या धर्मांध शक्तींना व त्यांच्या लाचार दलालांना ते भिख घालणार नाहीत, घालीत ही नाहीत. हे त्यांनी अनेक वेळा दाखवून ही दिले आहे. पण आव्हाड यांना विरोध केला तर मालक खुश होईल व एक हट्टी अधिकची टाकेल, या आशेवर हे लाचार, दलाल ठिकठिकाणी ५ ते ५० लोक घेऊन आंदोलन करीत आहेत. हे खूपच केविलवाणे अन् लाचारीचे प्रदर्शन करणारे चित्र आहे.
मनुस्मृती मानव समाजावरील कलंक..... पुस्तक अन् ग्रंथांवर जीवापाड प्रेम करणारे लोकच मनुस्मृतीचे दहन वेळोवेळी का करतात ? हे समजून घेतले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तर जग अनेक कारणास्तव ओळखते. त्यात ग्रंथासाठी घर बांधणारा पुस्तक व ग्रंथप्रेमी म्हणूनही जगभर त्यांची ओळख आहे. एका व्यक्तीचे ग्रंथालय म्हणून आज ही डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथालयाची सर्वात मोठे व्यक्तिगत व खाजगी ग्रंथालय म्हणून जगभरात नोंद आहे. ५० हजारांपेक्षा अधिक ग्रंथ त्यांच्या संग्रहात आहेत. त्यात धर्म शास्त्रांवरील ३००० हजार ग्रंथ आहेत. त्यातून त्यांनी फक्त मनुस्मृतीचे दहन का केले ? ग्रंथांवर अतोनात प्रेम करणाऱ्या डॉ. आंबेडकर यांना ही मनुस्मृती जाळून टाकावी का वाटली ? याची उत्तरे शोधताना हा ग्रंथ विषाचे आगार असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे संपूर्ण मानव समाजावरील कलंक ठरणाऱ्या मनुस्मृतीचे रोजच चौकाचौकात दहन झाले पाहिजे.
राज्यात मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - भाजप युतीची सत्ता असताना मुंडे यांनी विधानभवनाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन करण्याची तयारी सभागृहात दर्शविली होती. तोच भाजप आज अनाजी पंतांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असून मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात येत आहे. हे प्रथम समजून घेतले पाहिजे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश करण्याचे राज्यातील शिक्षण विभागाने ठरविताच त्या विरोधात आव्हाड तत्काल उभे राहिले, तर सत्तेच्या तुकड्यांसाठी आरएसएस, भाजपची दलाली करणारे व मोदीला बाप म्हणणारे मूग गिळून बसले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ही या समावेशाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचा निषेध करायचे सोडून जितेंद्र आव्हाड यांच्याकडुन अनावधानाने झालेल्या चुकीचा निषेध करणे , हे लाचारीचे लक्षण आहे. ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकविले, ज्यांच्यामुळे सत्तेची पदं मिळाली. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी इतकी गद्दारी करणारी नीच जमात या जगात दुसरी कुठलीच नसेल. ही लाचार जमात निषेध करण्याच्या ही लायक नाही.
संघ, भाजपच्या तुकड्यांवर जगणारे लाचार... आंबेडकरी चळवळीतील काहींना सत्तेचे तुकडे देवून आपल्या सोबत ठेवण्यात आरएसएस, भाजपला यश आले आहे. त्यांचा वापर करून आंबेडकरी विचार व चळवळ संपविणे हा त्या मागचा हेतू संघाचा होता. पण आंबेडकरी समाजाने भाजपच्या तुकड्यांवर जगणाऱ्या नेत्यांनाच संपवून टाकले आहे. भाजपसाठी ते निकम्मी ठरले आहेत. आव्हाडांचा निषेध करण्या इतकी ही ताकद आता त्यांची राहिलेली नाही. त्यामुळे आव्हाडांच्या विरोधात आरएसएस स्वतःच आंबेडकरी प्रेमाचे नाटक करीत रस्त्यावर उतरला आहे. पण हे प्रेमच बेगडी आहे, हेच प्रकर्षांने पुढे येत असल्याने आरएसएस, भाजप उघडा पडत आहे.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे म्हणजे देशाच्या धर्मनिरपेक्षतेलाच आव्हान देणे आहे. त्यामुळे हा लढा एकट्या जितेंद्र आव्हाड यांचा नाहीतर आरएसएस, भाजपच्या विरोधातील सर्व राजकीय पक्ष व संघटनांचा असला पाहिजे, तरच आपण देश, संविधान व लोकशाही या धर्मांध शक्तींच्या तावडीतून वाचवू शकतो. याची जाण व भान संविधानावर निष्ठा असलेल्या सर्व राजकीय पक्षांना असणे गरजेचे आहे. पण ते दिसत नाही. असते तर महाविकास/ इंडिया आघाडीतील घटक पक्ष ठामपणे आव्हाडांच्या मागे उभे राहिले असते. संविधान व लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या काहीची आरएसएस व संघाच्या छुप्या अजेंड्यावर छुपी निष्ठा आहे. अन् हेच आरएसएस व भाजपच्या पथ्यावर पडत आलेले आहे... हिच खरी या देशाची शोकांतिका आहे.....!
- राहुल गायकवाड,
- महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश
0 टिप्पण्या