Top Post Ad

पुण्यातील कार दुर्घटना... आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा तो लोकप्रतिनिधी कोण ?


  १९ मे च्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडलं. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणात संबंधित मुलाला अटक करण्यात आली. मात्र त्याला १५ तासांत जामीन मंजूर करण्यात आला. ज्यामुळे सोशल मीडिया आणि पुणे शहरांत संताप व्यक्त झाला. यानंतर या प्रकरणात मुलाच्या वडिलांना आणि आजोबांनाही अटक झाली आहे.  तसंच जनक्षोभ वाढल्यानंतर या मुलाची रवाणगी बालसुधारगृहात करण्यात आली.

 मात्र अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर  आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख  डॉ.अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी एका लोकप्रतिनिधीने अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचे डॉक्टर तावरे यांना सांगितल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण? याबाबत पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली असली, तरी पोलिस नाव सांगण्यास नकार दिलाय. पोलिसांनी याप्रकरणी वेगानं तपास सुरु केलाय. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. त्यांच्या फोनकॉलनंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं तपासात समोर आलेय. पोलिस चौकशीदरम्यान अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भित इशाराच दिलाय. तावरेच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण तापलेय.  डॉ. तावरे कोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे.  तावरेनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याशिवाय त्यानेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला. ११ वाजल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले. खबरदारी म्हणून दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आली. औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पोहोचवण्यात आले. औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आलं मात्र पहिले रक्ताचे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आलं. पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळणोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितल.

या प्रकरणामुळे आता राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. पालकमंत्री म्हणून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिसमध्ये का बसला नाहीत?  ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूला का बसले नव्हता?   याप्रकरणी प्रतिक्रिया द्यायला तुम्हाला ४ दिवस का लागले?   घटना घडली तेव्हा तुम्ही नेमके कुठे होतात?   तुमचे आणि आरोपीच्या कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का?  असे प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारले आहेत.  शुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते? जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले. याप्रकरणी आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

तत्पूर्वी सकाळी अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. हा अपघात घडल्यानंतर अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. “याप्रकरणी काही पत्रकारांच्या पोस्ट मी पाहिल्या, वाचल्या. अजित पवारांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याचं काही जण म्हणत आहेत. हीच शंका माझ्याही मनात होती. कारण सुरुवातीचे चार दिवस अजित पवार काहीच बोलले नाहीत. मी रोज सकाळी उठून काम करतो वगैरे म्हणणारे अजित पवार अपघाताबाबत गप्प होते. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेचं नाव पुढे येत होतं. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती?” असे त्या म्हणाल्या होत्या.

या प्रकरणी आजोबा, बाप आणि नातू तिघेही तुरुंगात असताना आता अग्रवाल कुटुंबीयांचे  गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यातील नामवंत बिल्डरच्या यशोगाथेमागची काळी कहानी या घटनेनंतर उजेडात आली आहे. पोराचं अपघात प्रकरण दाबण्यासाठी अग्रवाल पिता-पुत्राने कशारितीने शासकीय यंत्रणेवर, पोलिसांवर  दबाव टाकला, पैशाचं आमिष दाखवलं हे समोर आलं. त्यानंतर, संबंधितांवर कारवाईही झाली. आता, अग्रवाल यांनी एका महिलेच्या 10 एकर जमिनीवर बेकायदा ताबा घेतल्याचे उघडकीस आले आहे. वडगाव शेरी भागातील नीता गलांडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन अग्रवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गलांडे यांच्या 10 एकर जागेवर अग्रवाल कुटूंबाने बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच, याबाबत पोलिसांत तक्रार करुनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. 

ब्रह्मा बिल्डर्सच्या नावानं या अगरवाल कुटुंबांचा धंदा असला, तरी ते काळ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं आता समोर आलं आहे. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचं त्यांच्या भावासोबत पटत नव्हतं. संपत्तीचा वाद होता. तेव्हा त्यांनी थेट छोटा राजनशी संपर्क साधला होता. त्यांचा उद्देश त्यावेळी साध्य झाला नाही, पण छोटा राजनबरोबर दोस्ती वाढली. छोटा राजनचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी ऊर्फ विजय तांबटची बँकॉकला जाऊन भेटही घेतली होती. या दोस्तीतूनच सुरेंद्र अग्रवाल यांनी 2009 साली शिवसेना नेते अजय भोसलेंची सुपारी दिली होती. वडगाव शेरीत 2009 ची निवडणूक लढवताना भोसलेंवर गोळीबारही झाला. शिवसेना नेते अजय भोसले यांनी पुढे येत यापूर्वी अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती.

 त्यानंतर, आणखी एक तक्रारदार पुढे आले आहेत. दत्तात्रय कातोरे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे.  ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे दत्तात्रय कातोरे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचं काम करत होते. काम पूर्ण झाल्यानंतरही कातोरेंना अग्रवाल बिल्डर्सकडून पैसे देण्यात आले नव्हते. कातोरेंना अग्रवालांकडून तब्बल 84 लाख 50 हजार रुपयांचं येणं होतं. सातत्यानं पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदार दत्तात्रय कातोरेंचा मुलगा शशी कातोरे ह्याने जानेवारी महिन्यात आत्महत्या केली. याप्रकरणी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रय कातोरे यांनी आज पोलिसांत येऊन तक्रार दिली आहे. त्यानंतर, आता वडगाव शेरीतील महिलेकडून तिसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com