स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेमध्ये "कुष्ठरूग्ण" घोटाळा झाला असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला . त्यानंतर आता अधिक स्वच्छता कर्मचारी दाखवून कंत्राटदार महापालिकेची लूट करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नौपाडा परिसरातील स्वच्छतेचे कंत्राट ज्या आस्थापनाला देण्यात आले आहे त्याने केवळ ३० ते ३५ टक्के कामगारांची भरती केली आहे आणि संपूर्ण १०० टक्के कामगार दाखवून पालिकेकडून निधी उकळत असल्याची माहिती प्रजासत्ताक जनताच्या हाती लागली आहे. ओम दिगंबरा कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडे नौपाडा विभागाचा सफाईचा ठेका आहे. मात्र आवश्यक असलेला कामगारवर्ग या ठेकेदाराकडे नसून अतिशय कमी कर्मचारी वर्गाकडून ही स्वच्छता कामे करून घेत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली आहे. पटलावर अधिक कामगारांची नावे असून ती सर्व बोगस असल्याची शंका निर्माण होत आहे. तसेच घंटागाडीचे कंत्राट असलेल्या अमृत एन्टरप्राईझ बाबतही तोच प्रकार निदर्शनास आला आहे. या घंटागाडीवर देखील अनेक कामगारांची गरज असताना अतिशय कमी कामगारांमध्ये ही कामे करून घेत आहे. तरी याबाबत ठाणे महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे उपायुक्त यांनी त्वरीत दखल घेऊन याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या कंत्राटदारासोबत भागीदारी एका माजी पालिका अधिकाऱ्याची असून या कंत्राटदारांच्या मागे ठाण्यातील बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचीही माहिती मिळत आहे. तरी ठाणे महानगर पालिकेने याबाबत त्वरीत चौकशी करावी.
0 टिप्पण्या