पराभवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दारूण पराभव होणार असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी व प्रेम व्यक्त करत आहेत. एवढेच जर प्रेम असते तर बाळासाहेबांची शिवसेना कटकारस्थान करून फोडली नसती. मोदींनी व्यक्त केलेले बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दलचे प्रेम व आदर हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. बाळासाहेबांबदद्ल प्रेम, आदर व आपुलकी असती तर भाजपाने असे उद्योग केलेच नसते. शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे, असे असले तरी उद्धव ठाकरे संकटात असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांनी फोन करून सोबत असल्याचा शब्द दिला, उद्धवजी आजारी असतानाही त्यांची विचारपूस केली पण जाहीरपणे वक्तव्य करून त्याचे राजकीय भांडवले केले नाही, हा शिष्टाचाराचा व राजकीय संस्क़ृतीचा भाग आहे आणि उध्दव ठाकरे आजारी असताना कटकारस्थान करून शिवसेना पक्ष फोडणे याला विकृती म्हणतात. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही", "ज्या दिवशी कौटुंबिकदृष्ट्या श्रीमान उध्दव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा पहिला मदतीला धावून मी जाईन" ही नरेंद्र मोदी यांचे विधान स्पष्ट, स्वच्छ आणि निर्मळ भूमिका असणारे नाही तर वातावरण निवळण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे. नरेंद्र मोदी आज काहीही बोलले तर शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सकाळी लोकमान्य टिळक नगर, येथील गोल मैदान येथे मार्निंग वॉक करत स्थानिक लोकांशी संवाद साधला. वाकोला मार्केट येथे विविध समाजाच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्समधील मोहमद इस्टेट येथील स्थानिकांशी संवाद साधला. तसेच टिळक नगर, कुर्ला, कलिना भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या अशी माहिती मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि मिडिया समन्वयक, सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
0 टिप्पण्या