कामगारांनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे कामगार दिन- जगदीश खैरालिया
कामगारांनी आपल्या हक्कांबाबत जागृत असावं आणि ते हक्क अबाधित राहावे यासाठी संघर्षाला तयार असावं असे आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया यांनी आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त केले. समता विचार प्रसारक संस्था आणि श्रमिक जनता संघ यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आज ठाण्यात कामगार आणि कार्यकर्ते यांच्या उत्साही सहभागात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम होत्या. या प्रसंगी जगदीश खैरालिया प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की आजचा दिवस हा कामगारांनी आपल्या वरील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना दिलेल्या बलिदानाचे प्रतिक आहे. कामगारांना कायद्याने दिलेले हक्क प्रत्यक्षात मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागतो आणि तो संघटित होऊन निर्धाराने पण अहिंसात्मक पद्धतीने करायचा आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात हर्षलता कदम यांनी सांगितले की आजचा कामगार दिन हा आपल्याला लढून मिळालेला आहे हे कधीही विसरता कामा नये. कामगारांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आपल्या हक्काबाबत जागृत राहून संघटित पणे लढायला तयार रहायला हवे.
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भगवाने यांनी कामगारांच्या संघटित लढ्यासाठी युनियन चे महत्त्व सांगत श्रमिक जनता संघाच्या प्रामाणिक आणि पारदर्शी व्यवहाराला कामगारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवर्जून सांगितले.
सुनील दिवेकर आणि संतोष देशमुख या शैक्षणिक क्षेत्रातील सफाई कामगारांच्या प्रतिनिधींनी सांगितले की शाळेतील कंत्राटी सफाई कामगारांना मे महिन्यात विना वेतन सुट्टी दिली जाते आणि एक महिना पगार न मिळाल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होते. शाळेत मुलांना सुट्टी असली तरी शाळेची सफाई करणे गरजेचे असते त्यामुळे सफाई कामगारांना सुट्टी ना देता पगार द्यावा अशी मागणी अनेकदा करुनही शाळा प्रशासन ऐकत नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आमची तयारी आहे असे ते म्हणाले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या विश्वस्त लतिका सु. मो., मनिषा जोशी, मीनल उत्तुरकर यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
------------------------------------------------
आयुक्त सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण गुणवंत सफाई कामगारांचा केला सत्कार
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी ७.१५ मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
ध्वजारोहणानंतर, महापालिका आयुक्त श्री. राव यांच्या हस्ते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने, गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. संध्या रामदास पवार, पुष्पा हनुमंत शेलार, छाया सुभाष काकडे, महादेवी साईबान गंधनोर, सुषमा सुदाम पवार, विठ्ठल दामोदर बर्वे, परशुराम दशरथ जाधव, तुषार सदानंद रटाटे, संदीप राम करंजकर, उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या १० सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले. तसेच, शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, तुषार पवार, सचिन पवार, शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या