Top Post Ad

मत विभाजनाच्या राजकारणाला मराठा आरक्षण आंदोलनाचा जाहीर विरोध


 वंचित बहुजन आघाडी अथवा मराठा समाजातील गरीब अपक्ष उमेदवाराला राज्यातील भाजप आघाडी आर्थिक रसद पुरवून मत विभाजन करण्याचा प्रयत्न करु शकते. तो प्रयत्न हाणून पाडा, असे जाहीर आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांनी केले आहे. हा निर्णय अतिशय योग्य असा असून लोकशाही व संविधान वाचविणारा असाच आहे. राज्यातील मराठा आंदोलनाने ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी संविधानबाह्य मागणी केली असून त्या मागणीला संविधानावर विश्वास व निष्ठा असणाऱ्या राज्यातील सर्व जनतेने विरोध केला होता. पण आता मनोज जरांगे पाटील व त्यांच्या साथीदारांनी हा मत विभाजन टाळण्याचा निर्णय घेऊन आपण जन विरोधी भाजपच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले असल्याने त्यांचे राज्यातील जनता कौतुक करीत आहे.

     राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा गैर फायदा उचलत मत विभाजनाचा आपल्या राजकारणासाठी  वापर करण्याचा निर्णय वंचितने घेतला होता. मराठा आंदोलनाला पाठींबा देत जरांगे पाटील यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असा प्रयत्न वंचितने केला. पण तो जरांगे पाटील यांनी सतत हाणून पाडला. तसेच मराठा आंदोलनाच्या विरोधातील ओबीसी आंदोलनाला पाठींबा देत ओबीसी नेत्यांना ही मत विभाजनाच्या राजकारणासाठी उभे करण्याचा प्रयत्न वंचितने केला. परस्पर विरोधी समुदयाला एकाच वेळी पाठींबा देण्याचे घाणेरडे राजकारण प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते इतका आटापिटा का करीत होते व आहेत? कुणाच्या फायद्यासाठी करीत होते व आहेत? हे आता लपून राहिलेले नाही.

        मराठा व ओबीसी या परस्पर विरोधी आंदोलनातील नेत्यांना वंचितच्या मार्फत उमेदवारी देण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जोरात सुरु असून परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डक या जरांगे पाटील समर्थकाला उमेदवारी ही दिली आहे. तर ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांना सांगली लोकसभा मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिला आहे. पण या पाठींब्याबाबत बोलताना शेंडगे यांनी खूप सावध भूमिका घेतली आहे . मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हानच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना करुन वंचितची राजकीय दिवाळखोरी उघड केली आहे.

      उमेदवारी देण्यावरून वंचित आघाडी तोंडावर पडत असून अमरावती व शिरूरमधील प्रकरण तर चांगलेच अंगलट आले आहे. पुण्यातील उमेदवारीबाबत ही खूपच उलट सुलट चर्चा सुरु असून वंचितच्या राजकारणावर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सांगलीमध्ये दिलेला पाठींबा प्रकाश अण्णा शेंडगे जाहीरपणे नाकारण्याची शक्यता आहे. असे घडल्यास वंचितची निवडणुकी अगोदरच फार फजिती होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरत असतानाच होत असलेल्या या नामुष्कीचा मुकाबला वंचितला करावाच लागणार आहे. अमरावतीत है आपण पाहतच आहोत. 

      बाकी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेले आरोपी व फडणवीस यांचे सहकारी असलेले शिरूर येथील वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केल्याचे वृत्त आहे. तर परभणी येथील उमेदवार पंजाबराव डक हे खरेच जरांगे पाटील यांच्या निकटच्या वर्तुळातील आहेत की वंचित तसा प्रचार करीत आहे. हे लवकरच स्पष्ट होईल. नसतील तर ठीक. पण असतील तर मत विभाजन टाळण्याचे राजकारण करणारे जरांगे पाटील काय भुमिका घेतात ? हे ही लवकरच स्पष्ट होईल. म्हणजे आणखी एका ठिकाणीं वंचित अन् प्रकाश आंबेडकर यांना तोंडघशी पडावे लागणार आहे.  तसेच या घटनांना येथेच विराम लागणार आहे की हे लोण आणखी पसरणार आहे, याचे ही दर्शन पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेला लवकरच होणार आहे.

  • राहुल गायकवाड,
  • महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com