Top Post Ad

बहुजन समाजाची पारंपारिकता


   प्रस्थापित जात्यांध समाजव्यवस्थेशी प्रखर लढा देणारे क्रांतीवीर महापुरुष जोतिबा फुले व संविधान निर्माण करुन जातीभेद निर्माण करणाऱ्या मनुवादाचे उच्चाटन करणारे  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांस हार्दिक शुभेच्छा! 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताच्या इतिहासाबद्दल म्हणतात, भारताचा इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बौद्धधम्म विरुद्ध बामणवाद, वैदिक संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृती  यांच्यामधील संघर्ष होय. बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनानुसार पाहिल्यास भारताचा इतिहास दोन संस्कृत्यामधला आहे. त्यापैकी वैदीक संस्कृती जी विषमतावादी, जातीवादी, द्वेषमुलक,, कर्मकांड, अंधश्रद्धा यांना माननारी आहे.  तर श्रमण संस्कृती ही मानवाला केंद्रबिंदु मानून त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने विचार करणारी, बहुजन हिताय-बहुजन सुखाय असणारी मानवतावादी संस्कृती आहे. ही संस्कृती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, प्रेम, करुणा, शांती व न्याय यावर आधारीत आहे.  या देशातील 6 हजार जातीत विखुरलेले अनार्य हेच लोक मुळनिवासी आहेत, हे इतिहास संशोधनावरुन सिद्ध झाले आहे. म्हणूनच या देशातला एस.सी.,एस.टी.,एन.टी, ओ.बी.सी., आदिवासी  हेच लोक मुळ भारतीय आहेत. यांचा मेंदू इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने गुलाम केल्याने याचे भान त्यांना नसल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही समाजाच्या उन्नतीकरिता मागण्यांची यादी घेऊन सत्ताधाऱ्यांचे दरवाजे झिझवावे लागत आहेत. आज देखील भारतातील एस.सी.,एस.टी.,एन.टी, ओ.बी.सी., आदिवासींना इथल्या सत्ताधाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. याचाच फायदा घेत  प्रस्थापित व्यवस्थेने यांना कायमचे गुलाम केले असल्याचे चित्र आहे. 

मात्र 2024च्या लोकसभा निवडणूकीत अनेक समाजघटकांनी आपल्याच समाजातील प्रतिनिधी निवडून आणण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. मात्र या बहुजन वर्गात भेदनिती अतिशय खोलवर रुजली असल्याने हा मुलनिवासी समाज आपआपसात लढून स्वतःची अधोगती करत आहे. मागील अनेक वर्षापासून हीच परंपरा कायम आहे. आणि या निवडणुकीतही हेच पहायला मिळत आहे. भारतातील शेकडो जाती समुहांना बाबासाहेबांनी एस.सी., एस.टी., एन.टी, ओ.बी.सी. या चार समुहात अंतर्भूत केले. तरीही हा समुह आजही आपली जात जोपासताना दिसत आहे. निवडणुकांमधून प्रस्थापित समाजाची 15 टक्के एकगट्ठा मते त्यांच्याच उमेदवाराला मिळतात. मात्र 85 टक्के असलेल्या या बहुजन समाजामधून 85 उमेदवार उभे राहिल्याने ही मते विभागून अल्पसंख्यांक असलेला हा प्रस्थापित समाज सहजतेने बहुजनांवर राज्य करीत आहे. बाबासाहेबांनी सत्ताधारी बना असा संदेश दिला. मात्र या संदेशाला या बहुजन समाजाने केव्हाच तिलांजली दिली आहे. आणि नेहमी आपला कटोरा घेऊन सत्ताधाऱ्यांकडे मागण्यांचे गाऱ्हाणे मांडत  आहे. नव्हे ते त्यांच्या अंगवळणीच पडले असल्याचे दिसते. म्हणूनच आता बाबासाहेबांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांची जयंती साजरी होणे अपेक्षित आहे. 

सर्वहारा बहुजन समाजामध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे काम बुद्ध, फुले, शाहू, पेरियार, बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनी केले. सनातन्यांच्या अमानुष रुढी परंपरे विरुद्ध प्रखर लढा दिला. बहुजन समाजाला मानसिक गुलाम करणाऱया ईश्वरशाहीविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकले. व प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध बहुजन समाजात क्रांतीकारी प्रबोधन करुन कुटील षडयंत्रे उघडी पाडली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधान निर्माण करुन मनुस्मृतीची तळपटे उध्वस्त केली. ज्या शूद्र अतिशूद्र समाजाला मनुस्मृतीने अधिकार वंचीत करुन गुलामी व लाचारी दिली होती. त्यांना संविधानाने सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल करीत स्वाभीमानाचे जीवन दिले. म्हणूनच सनातनी विदेशी आर्य बामण आज संविधानाचे शत्रू बनले आहेत. मागील 10 वर्षात हळू हळू त्यांनी भारतीय संविधानातील एकेका कायद्याला बदलत त्याचे मुळ स्वरूप नष्ट करून टाकण्याचा सपाटाच लावला आहे. मात्र बहुजन वर्गातून आरक्षित जागांवरून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी देखील या विरोधात आवाज उठवला नाही. याचाच अर्थ असा होतो की यांचा मेंदू आजही या व्यवस्थेचा गुलाम आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला निवडून द्या आम्ही घटना बदलू असे जाहीर वक्तव्य आज प्रस्थापित व्यवस्थेकडून होत असताना देखील हा बहुजन वर्ग शांतपणे ऐकत आहे.  आज आपल्या संघटीत शक्तीच्या जोरावर इथली सत्ता आपल्या हाती घेऊन बहुजन समाजाला लाचार व गुलाम बनविण्यात प्रस्थापित व्यवस्था नेहमीच यशस्वी होत आहे. तुम्ही संघटीत रहा जग तुमच्याकडे चालीत येईल असे बाबासाहेबांनी म्हटले होते. परंतु बहुजन समाज 85 टक्के असूनही विघटीत राहील्याने त्याला हातात कटोरा घेऊन भिक मागत लाचार बनून दुसऱ्यांकडे चालत जावे लागत आहे. त्यामुळे स्वांतत्र्याच्या 75 वर्षातही बहुजन समाज लाचार व गुलामीचे जीवन जगत आहे. 

संविधानाने 14 वर्षाखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्याचे वचन देऊनही बहुजन समाजात 45 टक्के लोक निरक्षर आहेत. प्रत्येक भारतीयाला अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे अभिवचन संविधानाने देऊनही 40 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आपले जीवन कसे बसे जगत आहेत असे का झाले? कारण संविधान चालविणारे लोक मनुवादी विचारसरणीचे असल्यामुळेच बहुजन समाजाच्या वाट्याला असले जीवन स्वातंत्र्यानंतरही आले. बाबासाहेबांना ह्या धोक्याची पूर्व कल्पना होतीच. म्हणूनच त्यांनी मनुवादाने शोषित पिडीत 85 टक्के बहुजन समाजाला संघटीत होऊन शासनकर्ती जमात बना असा मोलाचा संदेश दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानव कल्याणासाठी व देशहितासाठी बहुजन समाजाला दोन मार्गांनी जाण्यास सांगितले 1- विज्ञानाची कास धरा  2-शासनकर्ती जमात बना. परंतु बहुजन समाजाला गुमराह करण्यात मनुवादी यशस्वी झाल्याने वरील दोन्ही मार्ग बहुजन समाज विसरला. आणि विज्ञाननिष्ट होण्यापेक्षा तो अधिकाधिक अंधश्रद्धेत गुरफटला व शासनकर्ती जमात होण्यापेक्षा स्वहितातच धन्यता मानत आहे. त्यामुळेच आज थेट भारतीय संविधान बदलण्याचेच मनसुबे आखल्या गेले आहेत.  आज गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर एकसंघ होण्याशिवाय पर्याय नाही.  देशभक्तांच्या बलीदानातून देश स्वातंत्र झाला, मात्र चोरचामाट, सोंग्याढोंग्यानी त्याचा ताबा घेऊन देशातील सर्वसामान्य जनतेचे जीवन दुःखमय बनवले आहे. हे बदलण्यासाठी आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी,  माझा या पेक्षा देशहित लक्षात घेऊन आपण मतांचा अधिकार बजावला पाहिजे तरच कदाचित बाबासाहेबांची पुढील जयंती आपण अधिक हर्शोल्हासात साजरी करू...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com