मुंबईकरांचा खिसा रिकामी करणारी अदानीची वीज दरवाढ रद्द करा - सुरेशचंद्र राजहंस
मुंबईकर उन्हाच्या तडाख्याचा सामना करत असताना अदानी कंपनीने वीज दरवाढ करुन मुंबईकरांना आणखी एक झटका दिला आहे. १ मे पासून ही दरवाढ लागू होत असून ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जात असून उन्हात होरपळणाऱ्या मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. अदानीने ही वीज दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेसच्या स्लम सेल विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
अदानी पॉवरने त्यांचे वीजदर वाढवले असून ७० पैसे ते १.७० रुपये प्रति युनीट अशी दरवाढ केल्याने मुंबईकरांना या वाढीव वीज बिलाचा त्रास होणार आहे. झोपडपट्टीत राहणारे गरीब, कष्टकरी जनतेसह मध्यमवर्गीय कुटुंबालाही या वीज दरवाढीची झळ बसणार आहे. मुंबईतील तापमानातही वाढ होत असल्याने पंखे, एसी, कुलर यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात केलेल्या या दरवाढीचा सर्वसामान्यांना शॉक बसला आहे. अदानीच्या या वीज दरवाढीचा मुंबईतील ३० लाख लोकांना फटका बसणार आहे, याआधी टाटा पॉवरनेही विज दर वाढवले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या काळात महागाईने जनतेचे जगणे कठीण करुन ठेवले आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे आणि खाजगीकरणामुळे सरकारचे त्यांच्यावर नियंत्रणँ नाही. या सर्व प्रकारात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. सरकारने यात लक्ष घालून सामान्य मुंबईकरांची या दरवाढीतून सुटका करावी असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
0 टिप्पण्या