वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर झाली असून, पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. यात जळगाव मतदारसंघातून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नाशिकमधून करण गायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. याआधी जळगावमधून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने जळगाव मतदारसंघातून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांच्या जागी युवराज भीमराव जाधव यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. तसेच, नाशिकमधून वंचित बहुजन आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी दिल्याने येथे जोरदार लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेसाठी मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे करण पवार यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. यातच जळगाव लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्यानंतर आपण निवडून येऊ शकत नाही या वस्तूस्थितीची जाणीव आपल्याला झाली असल्याने आपण उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती लोढा यांनी दिली. मागील पाच दिवसांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये काही नागरिकांच्या भेटी घेतल्या असता नागरिकांनी असे लक्षात आणून दिले, की माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही माघार घ्यावी आणि मी खरोखर निवडून येणार नाही अशी शक्यता होती, त्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचेही लोढा म्हणाले.
मी कोणत्याही दबावाला बळी न पडता माझी ही माघार आहे. याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. येणाऱ्या दोन दिवसात मी माझा निर्णय जाहीर करणार आहे. कोणत्या उमेदवाराला अथवा कोणत्या पक्षाला मी पाठिंबा द्यावा हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती प्रफुल्ल लोढा यांनी दिली. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्रफुल्ल लोढा यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून सांगितले, की जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे. यावर आंबेडकर यांनी माझे कौतुकच केले त्यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही माघार घेतलेली नाही, त्यामुळे तुम्ही मला धोका सुद्धा दिलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना पाठिंबा दर्शविण्यात येणार अशी माहिती असून यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ नक्कीच मिळेल.
0 टिप्पण्या