Top Post Ad

.... तर महाराष्ट्राचे राजकीय समिकरण बदलेल - प्रकाश अण्णा शेंडगे

 


वंचित बहुजन आघाडीसोबत आम्ही युतीसाठी आजही प्रयत्नशील आहोत. जर वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी  बहुजन पार्टी यांनी एकत्रितपणे लोकसभा 2024ची निवडणूक लढवली तर महाराष्ट्रातील राजकीय समिकरण नक्कीच बदलेल असा आशावाद आज प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केला. लोकसभा 2024 करिता उमेदवारांची नावे जाहीर करण्याकरिता आज त्यांनी मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते  बोलत होते. 

आज ओबीसी बहुजन पार्टीच्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये  १) बीड- यशवंत (अण्णा) गायके २) जालना- डॉ तानाजी भोजने ३) अहमदनगर (अहिल्या नगर)- दिलीप खेडकर ४) सातारा- सुरेश कोर्डे. तर  ७ एप्रिल २०२४ रोजी ओबीसी बहुजन पार्टीच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक- २०२४ साठी परभणी- ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार हरिभाऊ शेळके यांची उमेदवारी मागे घेउन ओबीसी नेते महादेव जानकर यांना जाहीर पाठींबा. तसेच  यवतमाळ- ओबीसी बहुजन पार्टी उमेदवार कुणाल जानकर यांची उमेदवारी मागे घेउन प्रा. अनिल राठोड यांना जाहीर पाठींबा देत असल्याची घोषणा शेंडगे यांनी आज केली. 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या आधीपासूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्यास इच्छूक आहोत. मात्र त्यांनी मराठा आरक्षणा करिता आंदोलन करीत असलेले जरांगेपाटील यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव दिला असल्याने आम्ही आमच्या भूमिकेला विश्राम दिला होता. मात्र आता स्वतः जरांगे पाटील यांनीच राजकारणात प्रवेश न करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळे ही युती होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच आता आम्ही वंचितसोबत युतीसाठी आग्रही आहोत. या युतीमुळे महाराष्ट्रातील राजकारण नक्कीच बदलेल असा दावा शेंडगे यांनी केला. 

ओबीसी नेते छगन भूजबळ हे नाशिकमधून निवडणुकीकरिता उभे राहिल्यास त्यांचा आम्ही सर्व शक्तीनिशी पराभव करू असा दावा जरांगेपाटील यांनी केला असल्याच्या मुद्यावर शेंडगे म्हणाले, छगन भूजबळ हे आमचे नेते आहेत. ते कोणत्याही पक्षाचे असले तरी ते आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना विजय हा आमचा विजय आहे. जरांगे यांनी अशा काही वल्गना करू नये. भूजबळ यांना निवडून देण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा करू. प्रसंगी आम्ही सर्व नेते त्यांच्या प्रचाराकरिता नाशिकमध्ये जाऊ आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करू. नाशिकमध्ये मराठा समाजाची सुमारे 15 टक्के मते आहेत मात्र या ठिकाणी ओबीसी हा 60 टक्क्याहून अधिक आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी भूजबळ यांचा विजय निश्चित होईल याबाबत आम्हाला कोणतीही शंका नसल्याचेही शेंडगे यांनी स्पष्ट केले. 

सध्याचे राजकारण किंवा निवडणुकीच्या वातावरणात केवळ जातीय राजकारणाचाच मुद्दा चर्चिला जात आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हे मुद्दे मागे पडले आहेत. त्यावर आपले मत व्यक्त करताना शेंडगे म्हणाले, सध्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण केवळ आरक्षण या एकमेव मुद्याभोवती फिरत आहे. प्रत्येक जात ही आरक्षणाकरिता  आंदोलन करीत आपला हक्क मागत आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत प्रमुख ठरला असला तरी आम्ही येणाऱ्या काळात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याबाबत नक्कीच आवाज उठवू. तसेच निवडणुकीत होणाऱ्या इव्हीएमच्या वापरासंबंधी देखील मोठे आंदोलन करण्याची गरज यावेळी शेंडगे यांनी व्यक्त केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com