'दगडा पेक्षा, वीट मऊ' या आत्मघाती आजाराची लागण आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या काही मोजक्या लोकांना झाली असल्याचे दिसून येत आहे. या लोकांना वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट एकत्र असलेल्या महाविकास आघाडी सोबत मिळतील त्या जागा घेऊन युती करायला हवी होती असे वाटते आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला रोखण्यासाठी झुकतं माप घ्यावं आणि महाराष्ट्रातील एकूण ४०-५० लाख आंबेडकरी मतदान महाविकास आघाडीला द्यावं असं या मंडळीच म्हणणं आहे. भाजपला सत्तेतून हद्दपार करणे गरजेचे आहे पण त्यासाठी आंबेडकरी जनतेनेच किंमत का मोजावी असा प्रश्न या लोकांना का पडत नाही? भाजपला हरविण्यासाठी महाविकास आघाडीने झुकत माप घेऊन वंचितला हव्या असलेल्या अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, सांगली, सोलापूर, रामटेक, मुंबई दक्षिण मध्य यापैकी ६-७ जागा सोडण्यास कोणती समस्या होती?
भाजपला रोखण्याच्या नावावर बौद्धांनीच निवडणुकीच्या रणांगणात त्याग का करावा? या प्रश्नांची उत्तरं हि मंडळी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गटाला का मागत नाही? काँग्रेसला ७ जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला, ७ पैकी नागपूर आणि कोल्हापूर या २ जागांवर पाठिंबा जाहीर सुद्धा केला, त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीतर्फे बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठं मन करून समर्थन दिल्या प्रमाणे काँग्रेसने सुद्धा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना अकोल्यात समर्थन द्यावे असे सर्व आंबेडकरी जनतेला वाटत होते, पण गुर्मीत असलेल्या काँग्रेसने बाळासाहेबांना पाठिंबा तर दिलाच नाही उलट बाळासाहेबाच्या विरोधात संघाच्या मुशीत तयार झालेल्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या वाढीसाठी झटलेल्या डॉ.अभय पाटील यास उमेदवारी दिली. जी मंडळी काहीही करून महाविकास आघाडी सोबत युती करावी अश्या विचाराची आहे त्यांना यात काहीही चूक वाटत नाही काय? भाजपला हरविण्यासाठी अकोल्याच्या एका जागेवरहि यांना पाठिंबा द्यायचा नाही मग आपण यांना सर्व जागांवर पाठिंबा का द्यावा? आपण एवढे स्वाभिमान शून्य झालेलो आहोत का ?
महाविकास आघाडी मध्ये शिवसेना उबाठा गटाला सुटलेल्या २१ जागांपैकी किती जागांवर आंबेडकरी उमेदवार उभे केले आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी का विचारण्यात येत नाही? उद्धव ठाकरे एकही बौद्ध उमेदवार देऊ इच्छित नाहीत पण तरीही त्याबदल्यात त्यांना संपूर्ण बौद्ध समाजाचं मतदान हवं आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुद्धा आपल्याला मिळालेल्या १० पैकी एकाही जागेवर बौद्ध उमेदवार देता आलेला नाही, शरद पवार म्हणतात बौद्धांनी वंचितला मत न देता राष्ट्रवादीला मत द्यावे पण याच शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला उमेदवारी देण्यासाठी एकही बौद्ध का मिळाला नाही?* महाविकास आघाडीतील पक्षांना १००% बौद्ध मतदान हवं आहे पण त्याचवेळी बौद्ध उमेदवार त्यांना चालत नाही याचा जाब त्यांना कोण विचारेल?
अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा गढ आहे, ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाने अकोल्यात बौद्ध, माळी, कुणबी, मुस्लिम असे विविध वंचित बहुजन समाजातील जिल्हा परिषद अध्यक्ष दिले आहेत. बौद्ध महापौर अकोल्याला वंचित बहुजन आघाडीमुळे लाभला आहे, जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्या वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत. बौद्ध, ओबीसी आणि इतर वंचित समूहाची अकोला जिल्ह्यावर असलेली पकड तोडण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी,प्रहार आणि शिवसेना असे सर्व पक्ष एक झाल्याचे आपण जिल्हा परिषद मध्ये अनेकवेळा पाहत आलेलो आहोत.वंचितचा हा गढ नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे बाळगून असलेल्या राजकीय पक्षांवर आपण विश्वास ठेवावा की अकोला सारखेच आंबेडकरी आणि वंचित समूहाचे अनेक गढ तयार व्हावेत म्हणून झटणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना आपण साथ द्यावी हा निर्णय घेण्याची ही वेळ आहे. 'दगडा पेक्षा विट मऊ' म्हणून प्रश्न सुटणार नाहीत, दगडाच्या राज्यात भीमा कोरेगाव येथे हल्ले होतात आणि विटेच्या राज्यात खैरलांजी येथे अत्याचार करून अख्खं कुटुंब संपविल्या जात. दगड असो की विट आपण दोन्ही ठिकाणी प्रतिनिधित्व विहीन राहत आलेलो आहोत.. दगडाने आपली डोकी फुटतात आणि विटेने सुद्धा आपली डोकीच फुटतात त्यामुळे निर्णय विचार करून घ्या आणि आपली डोकी सुरक्षित कशी राहतील याचा विचार करा.
0 टिप्पण्या