Top Post Ad

नालेसफाईची कामे १५ एप्रिलपासून सुरू करण्याचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश


 नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, १५ एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील ८६ अती धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही  राव यांनी स्पष्ट केले. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अती धोकादायक इमारतीत रहिवासी रहात असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टीकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, अती धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी, इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात, याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्त  राव यांनी केली.

वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आप्तकालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

 बैठकीनंतर, ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त  राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आप्तकालीन कक्षात असावेत, असे आयुक्त श्री. राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिली. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तिव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 

हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अदययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. हे सेंटर अद्ययावत आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीचा अर्लट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या भेटीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com