केंद्रातील तसेच महाराष्ट्रातील विद्यमान भाजपाला सत्तेवरून पायऊतार करण्यासाठी तसेच देशात स्थिर लोकशाही स्थापन करण्यासाठी राज्यात सुमारे ५ कोटीहून अधिक असलेला भटका विमुक्त समाज सर्वशक्तीनिषी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे, जयंत पाटील (शेकाप) यांना जाहिर पाठिंबा देऊन विनाअट पाठिंबा जाहिर केला असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी आज केली.
महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी तांडा, वाडी, बस्ती मध्ये जाऊन या सेलमार्फत प्रचाराचे कार्य सुरु असून यामध्ये बंजारा समाज संघटना, धनगर समाज संघटना, बेलदार समाज संघटना, वडारी समाज संघटना, बहुरूपी समाज संघटना, नाथजोगी डोंगरी गोसावी, छप्पर बंद, गवळी, बासुदेव, गोंधळी, वैदु, जोशी, कोल्हटी, भामटा खाटीक, माकडवाले, कुच्ची फारचे, नंदिवाले, बहिरुपी, पिंगळा, बंजारी, कंजारभाट, बागडी, मदारी, ओतारी समाज संघटना, मांग गारुडी, मरून जोगी, लोहार, बिसाडी, सरोवी असे राज्यातील 24 सामाजिक संघटनांसह इतर संघटनां सहभागी झाल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अमूल्य असे संविधान ज्यामुळे आजही इथला सर्वसामान्य नागरिक लोकशाहीच्या मार्गाने आपले सरकार आणत आहे. ते नष्ट करण्याचा आरएसएसच्या भाजप सरकारचा प्रयत्न आहे. तसेच समान नागरी कायदा देखील जबरदस्तीने लागू करण्यात येत आहे. त्यांचे हे मनसुबे कदापी पूर्ण होऊ नये कारण तसे झाल्यास विमुक्त जाती भटक्या जमाती, मागासवर्गीय, बारा बलुतेदार, ओबीसी या समाज या देशामधून नेस्तनाबूत होईल. विद्यमान सरकार यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहे. म्हणूनच गेल्या महिन्याच्या १५ तारखेपासून विमुक्त जाती भटक्या जमाती सेल तर्फे या पक्षाच्या वतीने राजू अवताडे, रमेश जाधव, डॉ. शाम जाधव (नाईक) असे अनेक राज्यप्रमुख एकत्र येऊन मुंबई ते नागपूर, नंदुरबार ते कोल्हापूर पर्यंत घोंगडी बैठक, प्रत्येक तांडा वाडी- वस्ती वर जावून काम करणार आहेत. असे हिरालाल राठोड, रमेश जाधव, राजू आवताडे, गणपत देवकाते, रमेश पवार, प्रकाश देशमुख, प्रा.सुनिल भोसले, बि. एम. पवार, डॉ. श्याम जाधव, अनिल राठोड यांनी जाहिर केले.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार हे नेहमीच भारतातील उपेक्षित समाजाच्या पाठिशी राहिले आहेत. आजही आम्ही आमच्या काही मागण्यांसह पाठिंबा देण्यासाठी गेलो असता शरद पवार यांनी आपले सरकार आल्यास तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे या राष्ट्रवादी पक्षाची तुतारी जी आमच्या भटक्या विमुक्तांचीच आहे. ती राज्यात मोठ्या शक्तीनिशी वाजवल्या जाईल आणि येणारे सरकार हे महाविकास आघाडीचेच असेल असा आम्हाला विश्वास आहे. - रमेश जाधव
0 टिप्पण्या