भीमराव आंबेडकर पंजाबातून लढणार )- रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर हे अमरावतीमधील उमेदवारी कायम ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर अखेर लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे वंचित आणि रिपब्लिकन सेना यांच्यात त्या मतदारसंघात झालेला वाद आता संपला आहे. तर दुसरीकडे, त्याचवेळी आंबेडकर घराण्यातील प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्याप्रमाणे भीमराव आंबेडकर यांनीही ' प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी ' हा आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला असल्याचे उजेडात आले आहे.
भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. पण त्यांनीही आपला स्वतंत्र राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे रीतसर नोंदणीकृत करून घेतला आहे. मात्र महाराष्ट्र हा प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर या दोघांसाठी सोडून इतर राज्यांत आपला पक्ष वाढवण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे.
या लोकसभा निवडणुकीत भीमराव आंबेडकर हे स्वतः पंजाबातील होशियारपुर या मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांनी सर्व राज्यांतील आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे हा निर्णय कळवला आहे. तसेच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी अर्जही मागवले आहेत.
एकाच आंबेडकर घराण्यातील प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि भीमराव आंबेडकर यांची प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी असे तीन पक्ष तिघा आंबेडकर बंधूंनी स्थापन करून कार्यरत केले आहेत. शिवाय, त्यातील एकट्या प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर आजवर भारतीय रिपब्लिकन पक्ष, भारिप - बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पक्षाची नोंद झाली आहे.
अकोला, अमरावती, होशियारपुर येथून लढत
आपापल्या पक्षातर्फे प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील अकोला, आनंदराज आंबेडकर अमरावती तर भीमराव आंबेडकर हे पंजाबातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.
मुंबई,पुणे, सुरतला कार्यालये
त्या तिघा आंबेडकर बंधूपैकी पुण्यात स्थायिक असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे मुख्य कार्यालय बेलोर्ड पियर मुंबई येथे आहे. मुंबईत स्थायिक असलेल्या आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे कार्यालय पुण्यात आहे. तर, मुंबईत वास्तव्य असलेले भीमराव आंबेडकर यांच्या प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे मुख्यालय हे गुजरात राज्यातील सुरत येथे आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व न स्वीकारण्याचे, आपापले स्वतंत्र पक्ष स्थापन करून चालवण्याचे विचार स्वातंत्र्य हे आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांना असू शकते. मग प्रकाश आंबेडकर यांच्याशी मतभेद बाळगण्याचे आणि असहमत असण्याचे स्वातंत्र्य बौद्ध बांधवांना नाही काय?....श्यामदादा गायकवाड...ज्येष्ठ पँथर - रिपब्लिकन नेते.
0 टिप्पण्या