Top Post Ad

सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली...!

 


 प्रत्येक निवडणुकीत नवनवीन सवंगडी घेवून प्रकाश आंबेडकर निवडणुका लढत असतात. त्यांच्या या खेळीला त्यांनी 'सोशल इंजिनिअरिंग' असे गोंडस नाव दिले आहे. समाजातील दुर्लक्षित जातींना निवडणुकीत प्रतिनिधित्व देणे हे या 'इंजिनीअरिंग' चे साध्य सांगितले जाते आणि त्याप्रमाणे ते विविध जातीतील लोकांना आपल्या पक्षातर्फे निवडणुकीत उभं करतात. वरवर पाहता हा उपक्रम स्तुत्य असा वाटतो आणि आंबेडकरी दलित समाज या खेळीला भाळतो. आधीच, बाबासाहेबांच्या स्पष्ठ आदेशाच्या अगदी विपरित, हा समाज कमालीचा 'व्यक्तिपूजक' झाला असल्यामुळे किंबहुना त्याला तसाच संस्कारित केला असल्यामुळे तो प्रकाश आंबेडकरात विनाकारणच बाबासाहेब पाहत असतो. म्हणून, त्याांची ही खेळी तो मोठ्या गर्वाने उचलून धरतो. प्रकाश आंबेडकरांचे काम फत्ते झालेले असते. ते मग विविध जातीतील लोकांना पक्षाची तिकीटं वाटतात. निवडणुकीला वेगवेगळया जातीच्या लोकांना उभं करणं बस्स एव्हढंच त्यांच सोशल इंजिनिअरिंग असतं. आपण उभ्या केलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडे बाकी काही योजना नसतेच. ते त्याच्या फंदात पडतच नाहीत. 2019 च्या लोकसभेत मिळालेली 43 लाख मतं अगदी 5 महिन्यातच 23 लाखांवर उतरली ते याच मुळे. प्रकाश आंबेडकराना मात्र याच सोयरसुतक नसतं कारण त्यांच्यापरीने त्यांचा कार्यभाग उरकलेला असतो पुढच्या निवडणुकीपर्यंत जिथे ते वेगळी माणसं शोधतात.

याचा अर्थ प्रकाश आंबेडकरांचे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या लोकांना आपल्या पक्षातर्फे 'हरण्यासाठी' उभं करणं होय. या उमेदवारांना वाटतं आपल्या जातीची मतं आधिक 'आंबेडकर' नावामुळे मिळणारी मतं यातून आपण निवडून येवू तर प्रकाश आंबेडकरांना वाटतं आपल्या ठेवणीतली मतं आधिक आपण 'हरण्यासाठी' उभं केलेल्या जातीतील लोकांची मतं म्हणजे आपली सीट लागतेच लागते..हाच काय तो यांचा निवडणुकीय उपद्व्याप. यात एक बाब मात्र विशेष आहे, जाती निवडतांना ते एक गोष्ट आवर्जून करतात ज्या जातीचा त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना स्वतःला फायदा होणार आहे त्या जातीचे उमेदवार ते अधिक देवून त्या जातीला गोंजारतात.  उदाहरणार्थ, 2019 च्या लोकसभेत त्यांच्या सोलापूर मतदारसंघात धनगर मतदान निर्णायक असल्यामुळे व त्यावेळी धनगर आरक्षणाचा लढा सुरू असल्यामुळे त्यांनी अनेक धनगरांना उमेदवारी दिली. RSS च्या गोपीचंद पडळकर या 'बदमाश' माणसाला उमेदवारी दिली गेली ती याच मुळं.

सध्या प्रकाश आंबेडकर सोलापूर मधून नव्हे तर अकोलातून लढत आहेत व मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे म्हणून त्यांनी 'मराठ्यांना' जवळ करायचं धोरण अवलंबले आहे. कोल्हापूर मधिल शाहू छत्रपतीच्या उमेदवारीला, न मागता, पाठिंबा व संविधान न मानणार्‍या जरांगेच्या पुढेपुढे करणं देखिल त्याचसाठी. महाविकास आघाडी सोबत युती तोडताना देखील त्यांनी जरांगेला सोबत घेत नाहीत म्हणून बाहेर पडण्याचे कारण मुद्दामहून, 'सर्व मराठ्यांनी' लक्ष द्यावे म्हणून जोरजोरात मांडले आहे. कोपर्डी प्रकरणात दलित विरुद्ध मराठा अशी जाणूनबुजून तेढ लावणारा हाच तो जरांगे. प्रकाश आंबेडकरानी कोपर्डीत पाय ठेवल्यास अंडी अन दगडांनी त्यांचे स्वागत करू अशी थेट धमकी देणारा हाच तो आगलाव्या जरांगे ज्याची मनधरणी करण्यास प्रकाश आंबेडकर जिवाचे रान करताहेत. जरांगेनी अजून युतीला होकार दिलेला नाही. तो 30 तारखेला निर्णय घेणार आहे. प्रकाश आंबेडकर व वंचित वाल्यांनी मात्र जरांगे सोबत युती जाहीर करून टाकलीय.. विकिपीडिया वर जरांगेला चक्क 'वंचित बहुजन आघाडी' या पक्षाचा दाखवला आहे. वंचितची आय.टी सेल म्हणे भाजपा च्या सारखीच काम करतेय अगदी ट्रोलिंग देखिल.

दुसरीकडे, ओबीसी/धनगर मतदान डोळ्यासमोर ठेवत प्रकाश आंबेडकरांनी, प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहिर केला आहे तर शेंडगे यांनी आधी 'जरांगेचे काय ते निस्तरा', असा निरोप धाडला आहे. शेंडगे हे जरांगेच्या असंवैधानिक मागणीच्या कट्टर विरोधात आहेत तर प्रकाश आंबेडकरांना सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली दोघांचेही मतदार गोंजारायचे आहेत...आपल्या सीट साठी.
असो.
तर, मुद्दा सोशल इंजिनिअरिंगचा आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देवू केल्याचे जाहिर केलं आहे. या पाच जागांवर प्रकाश आंबेडकर सोशल इंजिनीअरिंग आरामात करू शकतात. यात एका जागेवर ते स्वतः 'एक महार' (जनगणनेत बौद्धांनी, जातीच्या रकान्यात आपली जात 'महार' लिहावी असा फतवा प्रकाश आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेने काढला असल्यामुळे, त्यांना AB Form वर 'जात' महार लिहावी लागणार) व उर्वरित इतर चार जागांवर इतर जातीचे उमेदवार घेता येतील. महाविकास आघाडी, सोबत असल्यामुळे या पाचही उमेदवारांना निवडून येणं शक्यही होवू शकेल. एका झटक्यात वंचित बहुजन आघाडीचे 5 खासदार होतील. पुढील पक्ष बांधणीसाठी याचा जबरदस्त उपयोग ही पुरेपूर करता येईल .... पण...

अजूनही वेळ गेलेली नाही.  व्यक्तिपूजेला बळी न पडलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रकाश आंबेडकरांच्या गळी हे उतरवू शकतात. जेणेकरून हातात आलेल्या संधीचे सोनं करता येईल... विविध जातीचे 5 खासदार, महाविकास आघाडीच्या मदतीने, वंचित तर्फे संसदेत पाठवता येतील आणि त्याहून महत्वाचं म्हणजे स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यामुळे RSS/भाजपाला आतापर्यंत जी थेट मदत 'वंचित' करत आलाय ती टाळता येईल....खरंच इच्छा असेल तर...!

जाता जाता:... या लेखाचा फक्त विषय पाहून 'वंचित' वाले जे  अंधभक्त, माझ्या आई-बहिणीचा उद्धार करायला..मला धमक्या द्यायला सरसावतील त्यांना एकच प्रश्न - गोपीनाथ पडळकर नावाचा 'बदमाश' जेव्हां तुमची मतं खावून तुमच्याच तोंडावर पचापच थुंकत ऐटीत भाजपात गेला तेंव्हा तुम्ही कुणाच्या कुशीत झोपला होता... त्याला साधा एक प्रश्न विचारण्याची ही धमक तुमच्यात नव्हती... साधा निषेध ही करता आला नाही... अन आता बाजीरावाचा आव आणताय.


  • मिलिंद भवार_पँथर्स_ 
  • 9833830029
  • 29 मार्च 2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com