माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल,सेक्युलर पक्षाने भाजप बरोबर केलेली युती मान्य नसल्यामुळे या पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.आपल्या सहकाऱ्यांशी बोलून पुढील वाटचालीबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे भिलाणे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
सध्याच्या काळात आर एस एस आणि त्यांच्या परिवारातील भाजप व इतर पक्ष संघटना या भारतीय लोकशाही आणि संविधान यासाठी मोठा धोका असून संविधानिक मार्गाने त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे.अशावेळी त्यांना मदत होईल असे कोणतेही कृत्य माझ्यासारखा समाजवाद आणि लोकशाही मूल्य व्यवस्थेवर विश्वास असलेला कार्यकर्ता करू शकत नाही.म्हणून हा राजीनामा ! असेही भिलाणे यांनी स्पष्ट केले आहे.
जनता दल सेक्युलर पक्षाची भाजप बरोबरची युती ही फक्त कर्नाटक पुरती असून महाराष्ट्रात पक्ष स्वतंत्रपणे सेक्युलर भूमिका घेऊ शकतो असे वरिष्ठांकडून सातत्याने सांगितले जात होते.त्यामुळे पक्षाच्या कर्नाटक मधील भाजप धार्जिण्या भूमिकेकडे आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष करून कामकाज चालू ठेवले होते.मात्र राज्याचे प्रभारी अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी नुकतेच भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र देऊन महाराष्ट्र जनता दलाचा भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर करून टाकले.त्यामुळे आपणही लगेच राजीनामा देत असल्याचे रवि भिलाणे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.भिलाणे यांच्या राजीनाम्यामुळे समाजवादी विचारांच्या पक्ष संघटनांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
जनता दल,सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी काही महिन्यांपूर्वी भाजप बरोबर युती करण्याचा घेतलेला निर्णय आणि प्रभारी अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी कार्यकारिणीला काहीही न कळवता 29 फेब्रुवारी रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना परस्पर दिलेले, महाराष्ट्र जनता दलाच्या पाठिंब्याचे पत्र या गोष्टी पक्षाच्या आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सेक्युलर भुमिके विरोधात असल्याची आपली ठाम भूमिका असल्यामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे रवि भिलाणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
0 टिप्पण्या