Top Post Ad

एकलव्य माता सन्मानासह ‘श्यामची आई’ च्या प्रयोगाला उदंड प्रतिसाद


 साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त समता विचार प्रसारक संस्था आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ हा नव्या चित्रपटाचा प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. त्याच वेळी एकलव्य माता सन्मान हा एकलव्य मुलांना सर्व प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या  त्यांच्या मातांच्या सन्मानाचा कार्यक्रमही संपन्न झाला, असे संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले.

       समता विचार प्रसारक संस्था दर वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या त्यांच्या मातांचे महत्त्व जाणून त्यांचं सत्कार करते. या वर्षी, भानू संजय दाठिया,जान्हवी हेमंत पोतदार, मनिषा संजय करांडे, रेणुका टोकरे, कमलादेवी साऊद, मंगल चंदनशिवे, नैना हांडवे, बिंबला मेहता, रुक्मिणी पाटील, वैजयंती गोरिवले, समिता जयस्वाल, रेखा महेश गुरव, सुनीता बेर्डे या मातांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. तुडुंब भरलेल्या सभागृहात महिला, पुरुष, युवा यांच्याबरोबर सर्व वयोगटातील लहान आणि किशोरवयीन मुलांनीही संपूर्ण चित्रपट शांततेत बघितला. नंतर याबद्दल चर्चा करताना त्यांना भावलेल्या गोष्टी आवर्जून सांगितल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभात चित्र मंडळाचे संतोष पाठारे, समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले, जगदीश खैरालिया, मनीषा जोशी, लतिका सु. मो. आदी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. एकलव्य कार्यकर्ते मयुरी गुरव, ईशा शेलार, अनुजा लोहार, हर्ष पोतदार, अनमोल साळवी, करीना साऊद, निलेश दंत आदींनी सहकार्य केले.

       साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे सुरु आलेल्या साने  गुरुजी १२५ जयंती अभियानात सुजय डहाके दिग्दर्शित नव्या संचातील या वर्षी प्रदर्शित झालेला ‘ श्यामची आई’ हा अतिशय प्रभावी चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. आयुष्यात गरिबीमुळे अपरिमित दुःख आणि त्रास सहन करत असताना आपला स्वाभिमान न सोडता  आपल्या मुलांना शिस्तीचे आणि सत्याचे संस्कार देणाऱ्या आपल्या आईची गोष्ट साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ या आपल्या पुस्तकातून सांगितली आहे. अशा सकस कथेवर आधारित तयार केलेला हा चित्रपट तितक्याच सकस दिग्दर्शनाने व अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कैदेत असताना इंग्रजांचे जुलूम सहत आपले अनुभव आणि विचार लिहित राहणाऱ्या आणि इतर भाषेतील साहित्यांचे अनुवाद करणाऱ्या साने गुरुंजींनी आपल्या आठवणीतील आईची गोष्ट चित्रपटात सांगितली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी साने गुरुजी, त्यांच्या बरोबर कैदेत असणारे विनोबा भावे आणि इतर सहकारी यांचे संवादातून प्रकट होणारे विचार, बा.ग. टिळकांचे स्वातंत्र्याच्या मागणीचे ओजस्वी भाषण अशा अनेक प्रेरणादायी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट सद्य परिस्थितीवरही भाष्य करतो. आजही एकलव्य मातांनी आपल्या मुली - मुलांना स्वतःच्या विकासासोबतच सामाजिक भान जोपासण्याची शिकवण देणे आवश्यक आहे. नागरिकांनी साने गुरुजींपासून प्रेरणा घेऊन सध्यस्थितीत योग्य बदल घडवून आणण्यासाठी झटण्याचे आवाहन यावेळी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे संजय मंगला गोपाळ यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com