स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (वस्ती स्वच्छता योजना) कंत्राटदाराच्या हाती देण्यामुळे या योजनेतील स्वयंसेवकांवरील बेरोजगारीची कुऱ्हाड थांबवा, ग्लोबल टेंडर रद्द करून मुंबईतील महिलांना बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे. या आणि इतर मागण्यांकरिता आज मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या वतीने मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसी बळाचा वापर करून गेटवरच अडवण्यात आला. यामुळे आंदोलक आणि पोलिस प्रशासन यांच्यात चकमत उडाली होती. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्यासह सर्व मोर्चाकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मुंबईतील १५ हजार स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करुन मित्रांसाठी १२०० कोटी रुपयांचे ग्लोबल टेंडर काढणाऱ्या महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा काढण्यात येत होता परंतु पोलिसांनी मोर्चकऱ्यांची धरपकड केली. महिलांशी धक्काबुक्की केली. सरकारचा पोलिसांवर दबाव आहे या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. लोकशाहीमध्ये आवाज उठवण्याचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्हाला दिलेला आहे त्या हक्कापासून कोणीतीही शक्ती रोखू शकत नाही. केंद्रातील हुकूमशाही भाजपा सरकारप्रमाणे राज्यातील भाजपा-शिंदे पवार सरकारही मनमानी पद्धतीने काम करत असून विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढला तर त्यावर कारवाई होते हे मुंबईकरांचे दुर्भाग्य आहे. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या मोर्चा पोलीस बळाचा वापर करत थांबला जातो परंतु गुंडगिरी करणाऱ्या सत्ताधारी पक्षांच्या आमदारांवर हे सरकार कारवाई करत नाही.
मुंबईतील १५ स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करुन त्यांच्यावर विसंबून असलेल्या ७५ हजार लोकांना रस्त्यावर आणण्याचे हे षडयंत्र आहे. या स्वयंसेवकांना महिन्याला फक्त ६००० रुपये देता आणि मित्रांसाठी १२०० कोटी रुपयांचे टेंडर काढता? असा संतप्त सवाल करत मित्रांसाठी काढलेले हे १२०० कोटी रुपयांचे ग्लोबल टेंडर रद्द करा व तेच पैसे या स्वयंसेवकांना द्या. मराठी माणसाचा, महिलांचा, भूमिपुत्रांचा आवाज ऐका व त्यांना न्याय द्या, पोलिसांना थेट आव्हान देणारे भाजपाचे आमदार नितेश राणेवर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या भाजपाच्या गुंडांवर सरकार कारवाई करत नाही. मात्र १५ हजार मराठी भूमीपुत्र तसेच महिलांच्या हक्कासाठी मोर्चा काढला तर पोलिसांच्या मदतीने तो दडपला जातो. भाजपा-शिंदे-पवार सरकारच्या या दडपशाहीचा धिक्कार करत सरकारने आवाज दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारच, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणार असा निर्धार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी केला.
0 टिप्पण्या