राज्यात गेल्या दोन वर्षात अनेक राजकीय भूकंप आले. तसेच सत्ताही आली आणि गेली. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून समाजवादी पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार व माजी खासदार अबू असिम आझमी यांच्या नेतृत्वाखाली मविआसोबत खंबीरपणे उभी राहिली. ती केवळ भाजपासारख्या धर्मांध, जातीयवादी, देशद्रोही, देश व संविधान विरोधी शक्तीला सत्तेपासून रोखण्यासाठीच ! येत्या २०२४ च्या निवडणूकीतही देश व संविधान वाचविण्यासाठी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशातही देश व संविधान विरोधी भाजपला रोखण्याचे काम राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेली समाजवादी पार्टी करेल” असा ठाम निर्णय आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
“गेल्या ४ वर्षांमध्ये पक्षाने ४ ते ५ लोकसभा मतदारसंघाची बांधणी केली आहे. मविआबरोबर झालेल्या जागा वाटपामध्ये किमान दोन जागांची मागणी करण्यात आली आहे. त्या जागा निश्चित कराव्यात, अशी आग्रही मागणी आज झालेल्या राज्य कार्यकारीणी बैठकीत मविआ नेत्यांकडे एकमताने करण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून समाजवादी पार्टी मविआमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडे लोकसभेचा दोन जागांची मागणी करीत आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी समाजवादी पक्ष तयार आहेच. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात पार्टीचे उमेदवार असतील तर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अधिक उत्साहाने कामाला लागतील. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी समाजवादी पक्षाच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती या नेत्यांना करण्यात येत असून या संदर्भात ते सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.” अशी माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रवक्ता रेवण भोसले, प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी व महिला आघाडी अध्यक्ष मायाताई चौरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
महाराष्ट्रात समाजवादी पार्टीचे दोन आमदार असून राज्यातील सर्व जिल्ह्यांत पक्षाचे काम आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी, कार्याध्यक्ष प्रताप होगाडे व प्रधान महासचिव परवेज सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ व उत्तर महाराष्ट्राचा दौरा नुकताच करण्यात आला. यावेळी सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच पक्षाचे पदाधिकारी गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रभर दौरे करून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी जनमत तयार करीत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीराभाईंदर, वसई, विरार, पालघर आदी ठिकाणी समाजवादी पार्टीचा मतदार असलेल्या उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य असून हा मतदार पार्टीसोबत कायम राहिलेला आहे. समाजवादी पार्टीला दोन जागा मिळाल्या तर हा मतदार मविआ/इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी व भाजपचा दारूण पराभव करण्यासाठी आपल्या जीवाचे रान करेल, असा विश्वास या परिसरातील पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
समाजवादी पार्टी कार्यालय बैलार्ड इस्टेट मुंबई येथे आज झालेल्या राज्य कार्यकारीणी व जिल्हाध्यक्ष बैठकीमध्ये लोकसभा निवडणूका शिवाय आगामी विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इत्यादी निवडणुका तसेच पक्ष संघटना वाढ इ. बाबतीत चर्चा झाली. प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये चर्चेत राऊफ शेख, डॉ. विलास सुरकर, राहुल गायकवाड, अनिस अहमद, विनायक लांबे, एड. शिवाजीराव कांबळे, दत्ता पाकिरे, रमेश शर्मा, दीपक चिमणकर, पायस मचाडो, साधना शिंदे, महंमद सज्जाद, कुमार राऊत, मोईजुद्दीन अहमद, नितीन मिरजकर, महंमद तौसीफ, लियाकतखान, रुक्मिणीताई गीते, अजहरुल्ला खान, शाहूराज खोसे, विजय खारकर, विकास विचारे, नफीस अहमद इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. राज्यातील बहुतांशी सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष या बैठकीस उपस्थित होते.
0 टिप्पण्या