होळीचा सण जवळ आला आहे. फुला - फळाला आलेले जिवंत हिरवे सुपारीचे झाड होळीमधे जाळण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. असं करू नका, म्हणून सांगितले तर, आमच्या भावना दुखावल्या जातात, असे जाळणारे म्हणतात. त्यांनी लक्षात घ्यावे की, तुमच्या फक्त भावना दुखावल्या जातात, तिथे जिवंत झाड जळते, त्याला किती दुःख वेदना होत असतील. तुम्ही त्याला जाळता हे झाडाला समजते. त्याला काय वाटत असेल. "हा माणुस प्रत्येक क्षणी, मी दिलेल्या प्राणवायूचा श्वास घेतो, जगतो. मी आणलेल्या पावसाचे पाणी पितो, त्यातुन पिकलेले अन्न खातो आणि मला जाळण्याचे क्रौर्य, परंपरा रूढी व धार्मिकतेच्या चुकीच्या कल्पनेतुन करतो. पृथ्वीवर ईश्वर अस्तित्व देतो, पालनपोषण करतो ते झाडाच्या रूपाने. ही सजीवांची धारणा करण्याची क्षमता जोपासणारी, तिला धक्का न देणारी जीवनपद्धती म्हणजे 'पृथ्वीधर्म'. सर्व धार्मिक आणि निधार्मिक मानवांनी तो पाळण्याची व अनुसरण्याची आज नितांत गरज आहे".
"हरितद्रव्य नसते तर वातावरणातील कार्बन कमी झाला नसता, प्राणवायू वाढला नसता, तापमान कमी झाले नसते आणि हा माणूस अस्तित्वात आला नसता. मी जन्मदात्या सूर्याशी जोडलेला स्वयंपोषी, खरा आत्मनिर्भर आहे. मला फिरण्याची आवश्यकता नाही. पण याला माझा दुबळेपणा समजुन हा यत्किंचित माणुस माझा नाश करून माझ्या आश्रयाने जगणाऱ्या जीवसृष्टीचाही विनाश करत आहे. सर्व जीव माझा आदर करतात पण हा एकटाच कृतघ्न आहे." हे मी भावनिक होऊन लिहिले असले तरी पूर्ण वैज्ञानिक आहे.
पृथ्वीवर कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण औद्योगिकरणाच्या अडिचशे वर्षांत, दीड पट वाढले आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानाने वणवे लागुन जंगले जळत आहेत आणि मानवजात दर वर्षी उच्चाटनाकडे एक एक पाऊल टाकत आहे. उन्हाळ्यात विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात होत असलेली अवकाळी वृष्टी व गारपिट हा त्याचा भाग आहे. या संकटातुन मानवजातीला वाचवू शकणारे हरितद्रव्य ही अदभूत गोष्ट आहे आणि झाड वाढायला कितीतरी वर्षे लागतात. परिस्थिती एवढी गंभीर आहे की, झाड काय एक पानदेखील जाळू नये. तुम्ही जीवनशैलीच्या व प्रगतीच्या नावाने देशात रोज सुमारे १५ लाख टन कोळसा वीजेसाठी जाळता. कोट्यावधी टन पेट्रोल व डिझेल रोज वाहनांमधून जाळता. हा कार्बन शोषुन, प्राणवायू देणारे झाड विकासाच्या नावाने कापता, आणि असे परंपरा म्हणूनही होळीत जाळता. *याला आता निसर्ग माफ करणार नाही.*
तुम्हीच निर्माण केलेल्या प्रदूषणाने हानी झालेली तुमची फुफ्फुसे, श्वसनमार्ग तुम्हाला संपवत आहेत. प्राणवायूची कमतरता दूर करायला तुम्ही व्हेंटिलेटरवर जाता. परंतु झाड तोडू नये, जाळू नये ही साधी गोष्ट, तुम्हाला कळत नाही. मग असा माणुस बुध्दीवान तर सोडाच पण साधा प्राणी म्हणवुन घ्यायला लायक नाहीत. होळीसाठी झाडे तोडणे व सुपाऱ्या जाळणे कृपया थांबवा.. पृथ्वीच्या विरोधात गेलेले तंत्रज्ञान व अर्थव्यवस्थारूपी अंधाराचा नाश होवो आणि तत्वज्ञान, विज्ञान, अध्यात्म व धारणा करणाऱ्या खऱ्या धर्मरूपी ज्ञानाची शलाका प्रज्वलित होवो._
- अॅड. गिरीश राऊत दू. ९८६९ ०२३ १२७
- निमंत्रक ... भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
0 टिप्पण्या