26 मार्च हा क्रांतीकारी लेखक बाबुराव बागूल यांचा स्मृतीदिवस. या निमीत्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन यांच्या वतीने, ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रिडासंकुलातील नाना आहिरे यांच्या कार्यालय येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमंत्रीत कवींचे कविसंमेलन संपन्न झाले.
यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात पॅंथर सुमेध जाधव म्हणाले, आंबेडकरी कविसंमेलनात भिम टॉनिक मिळत असून, शब्द म्हणजे आग, शब्द म्हणजे ज्वाला, शब्द हा दारुगोळा आहे, मात्र सध्या तो थंड बस्त्यात असल्यासारखे वाटत आहे. १९७० च्या काळात जी सामाजिक परिस्थिती होती तशीच काहीशी किंवा त्यापेक्षा जास्त परिस्थिती आज झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आंबेडकरी साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. आज आपले कवी संसदेत जाऊन कविता म्हणतात, ज्या संसदेत आपले सामाजिक प्रश्न सोडवायला हवेत तिथे जाऊन आपण कविता करत आहोत. त्या अर्थहिन कवितांपेक्षा आज ठिकाणी ज्या कविता सादर करण्यात आल्या त्या खरोखरच प्रबोधनात्मक आणि चळवळीला पोषक अशा आहेत. या कविसंमेलनात तीन पिढ्यांचे प्रतिनिधीत्व दिसून येते. राजरत्न जे आज ८०च्या पुढे आहेत. मी स्वत: ६० पार केले आहेत तर आमचे अनंत धनसरे हे तिसऱ्या पिढीचे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा हे विचार कवितेतून जरी व्यक्त होत असले तरी ते कायम धगधगते राहण्यासाठी सर्व साहित्यिकांनी अग्रेसर राहून आज जी शक्ती या सामाजिक व्यवस्थेला बिघडवत आहे त्याचा निषेध करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन सुमेध जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे सचीव अड. नाना अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला 'काव्यलेखन काव्य सादरीकरण -चर्चात्मक विवेचन' या विषयावर प्रा.अनिल भालेराव यांनी भुमिका मांडली. मंचीय कविता, प्रचारकी कविता, विद्यापिठीय कविता, यापैकी विद्यापीठीय कविता चिरकाल टिकणारी असते. साहित्याचा मुख्य प्रवाह हे आंबेडकरी विचाराचे साहित्य आहे.आपल्या भाषेत आपण लिहीलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यानंतर झालेल्या कविसंमेलनात, कवी बी.अनिल, राजरत्न राजगुरु, सुधाकर सरवदे, भटू जगदेव, कवी दिप, शाहीर जोंधळे, अनिल गायकवाड, प्रभाकर जाधव, नवनाथ रणखांबे, साहेबराव कांबळे, अंकुश पडघण, सुजाता सावंत, गजानन गावंडे, अनंत धनसरे, विजय जाधव, आबासाहेब चासकर, वसंत हिरे, भानुदास आवचार, व्ही जी सकपाळ यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. गझल, गीत, गेय ,विद्रोह कवितांनी कवीसंमेलन यशस्वी झाले. या कार्यक्रमास अडव्होकेट रविंद्र जोशी,अडव्होकेट नागोराव वैद्य, अडव्होकेट दिलिप भांगरे, प्रमोद पाटील, सुबोध शाक्यरत्न, सुरेश रासम, प्रमोद इंगळे , किशोर बनकर, तायडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन सुधाकर सरवदे यांनी बहारदार केले. शेवटी बाबुराव बागूल यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
0 टिप्पण्या