सध्या देशभरात ईव्हीएम हटाव आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाची धग आता केवळ शहरातच नाहीतर खेडेगावात सुद्धा पोहोचली आहे. अनेक खेडेगावात ग्रामस्थांच्या वतीने स्वस्फूर्तीने हे आंदोलन होत आहे. मुंबईत देखील आझाद मैदान येथे एक भारतीय नागरिक म्हणून लोकशाही आणि देश वाचवण्याकरिता या लढ्यात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करीत ईव्हीएम हटाव कृती समितीच्या वतीने 9 फेब्रुवारी पासून ईव्हीएम विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव य. आंबेडकर, दैनिक देशोन्नतीचे संपादक पोहोरे सर, दैनिक सार्वभौम राष्ट्रचे संपादक प्रा. प्रेमरत्न चौकेकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर, ज्येष्ठ विचारवंत सुनील कदम, शहीद भागवत जाधव स्मृती केंद्राचे सुमेध जाधव, प्रा. विजय मोहिते, नामदेव साबळे, अशोक कांबळे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अनेक संस्था संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ईव्हीएम हटाव आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट करताना भीमराव म्हणाले, ईव्हीएम विरोधात जनआंदोलनांतर्गत लोकांनी रस्त्यावर येणे गरजेचे आहे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. इलेक्शन कमिशनर विद्यमान केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. येणारी लोकसभा निवडणुक ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवर करावी हे ठणकावून सांगण्याकरिता प्रत्येक संस्था संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. 2003च्या आधी ईव्हीएम काँग्रेसच्या राज्यात आली होती, त्यावेळी भाजपाने ईव्हीएमच्या विरोधात मोठमोठी आंदोलने केली होती, मोर्चे काढले होते आणि आता भाजपावालेच ईव्हीएम चांगली आहे, असे सांगतात. दिल्लीमध्ये जंतर-मंतरच्या मोर्चामध्ये आयटीच्या काही लोकांना आम्ही बोलावले होते. त्यांनी सर्वांसमोर या मशीनमध्ये असलेले दोष दाखवले. केळी चिन्हाचे बटन दाबले तर आंब्याची लिविंग पॅडमधून पर्ची बाहेर आली. जर असे होत असेल तर कमळ का नाही फुलणार, असा सवालही भीमराव यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांनाही लक्षकरित त्यांनी म्हटले की, पदयात्रा वगैरे नंतर करा पण आज देशासमोर ज्वलंत प्रश्न आहे, त्याकडे पाहणे गरजेचे आहे तर निश्चितच या देशांमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित होईल. आज संपूर्ण भारत ईव्हीएम विरोधात आहे. काही जण उघड विरोध करीत आहेत तर काही जण शांतपणे आपला विरोध दर्शवित आहेत. अनेक संस्था संघटना आक्रमकपणे आंदोलने करीत रस्त्यावर उतरत आहेत. पण त्यामध्ये संघटितपणा नाही. याचे मला दुःख होते, अशी खंत भीमराव यांनी यावेळी व्यक्त केली. आज देशांमध्ये विविध प्रश्न आहेत, वेगवेगळी आंदोलने चालू आहेत, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये ईव्हीएम विरोधी भूमिका मांडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या आंदोलनास महाराष्ट्रातील मुंबई नागपूर पुणे नंदुरबार अशा विविध भागातून ईव्हीएम हटाव कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मुंबईसह महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्या ईव्हीएम विरोधी आंदोलने होत आहेत, त्या सर्वांना एका सूत्रात बांधून देश पातळीवर मोठ्या प्रमाणात हे जनआंदोलन करण्याची गरज आहे. म्हणून हे आंदोलन देशव्यापी करण्याचा ईव्हीएम हटाव कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला. तसेच लवकरच हे आंदोलन आपणास देश पातळीवर वाढलेले दिसेल असेही समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या