Top Post Ad

आडनावे.... पूर्वीपासून आतापर्यंत .....

माणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती झाली. पुढे माणूस स्थिर स्थावर झाल्यावर नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अशा रीतीने गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा झाली. त्याला वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार या संज्ञा प्राप्त झाल्या.प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकार ते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.

वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात. महाराष्ट्रातील वतनदारांचा दर्जा आणि त्यांना करावी लागणारी कर्तव्ये पुढीलप्रमाणे-पाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. 

पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. १) पोलिस पाटील २) मुलकी पाटील. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले… उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा.

चौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत(गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा.गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे यालापण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकण्र्याच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले.

इतर सेवेबरोबरच धार्मिक सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात गुरव आणि मश्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला ‘हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते.गाव वाढला की व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. 

प्राचीन काळी गाव हा स्वयंपूर्ण घटक होता. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे करण्याकरिता आलुतेदार आणि बलुतेदार आले. पारंपरिक कामगार म्हणजे आलुतेदार. ज्यामध्ये जंगम, गोंधळी, कोळी, सुतार, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, वेसकर यांचा समावेश होता. तर बलुतेदार म्हणजे मोबदला घेऊन सेवा देणारे. यात जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणी, न्हावी, परीट, मांग व चांभार. गावची शेती व त्याला एक मानून त्या शेतीचे म्हणजे गायीचे वाटेकरी म्हणजे आलुते-बलुते आले. त्यांच्या दर्जानुसार त्यांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास याप्रमाणे मोबदला मिळायचा. अर्थात त्यांचा मोबदला धान्याच्या स्वरूपात होता. एका नांगरामागे दोन पाचुंदे, तीन पाचुंदे बलुतेदारांना खळ्यावरच द्यावे लागायचे. अर्थात गरिबांना त्याची स्वत:च रास करावी लागायची. आताचे सरकार थेट धान्यच देते. चलनवापर नगण्य होता. परंतु तेही सोन्या-चांदीचे असल्याने त्याची पारख करण्याकरिता सोनार घेण्यात आला. त्याला पोतदार म्हटले गेले.दहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश आणि मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. 

अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करण्याचे काम करावे लागे. याचबरोबर आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे. त्यामुळे संरक्षणातून व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. त्यांना इतरही अधिकारी मदतीला आले. वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची. परंतु एकदा त्याला खुश केले की, ही मंडळी राजाच. 

छत्रपती शिवरायांनी या वतनदारावर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे स्वतंत्र अधिकारी नेमून राज्याची व्यवस्था लावली.पुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही . हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत. असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com