राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाज आंदोलन करणार आहे. तसेच ‘तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करू शकतो’ असा इशारा या आंदोलनाला विरोध करणाऱ्या नेत्यांना जरांगे यांनी दिला आहे. शिवाय जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा सकल मराठा समाजाला सांगितली आहे. त्यानुसार, ३ मार्च रोजी मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या आंदोलनावरुन कायदेशीर लढाई सुरू झाली असून उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये जरांगेंना आंदोलनाची नेमकी दिशा स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ‘मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगेंना २६ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, अशी हमीही जरांगेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे.
राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांसाठी युक्तिवाद करू नये. आम्हाला प्रशासनानं कुठलीही नोटीस पाठवलेली नाही, मनोज जरांगे यांच्या वतीनं जेष्ठ वकील विजय थोरात यांनी कोर्टात युक्तिवाद केला. जरांगे हे उपोषणाला बसले आहेत, अद्याप कुठेही हिंसाचार झालेला नाही. प्रशासनाला भिती असेल तर त्यांनी रितसर नोटीस पाठवावी, बंद आणि तीव्र आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली आहे. मनोज जरांगे यांनी व्यक्ती म्हणून अशी घोषणा केलेली नाही, राज्य सरकार याप्रकरणी हतबल झालीय, अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती, मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा हा डाव आहे. त्यांचं आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे. राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही. एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत, - अॅड. विजय थोरात (जरांगेंचे वकील)
दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारस्कर यांच्यावर मुंबईतील चर्चगेट परिसरात मराठा आंदोलकांनी हल्ल्याच्या प्रयत्न केला. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय बारस्कर महाराज यांच्याविरुद्ध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बारस्कर यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. बारस्कर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच वास्तव्याला आहेत. प्रसारमाध्यमांशी सातत्याने संवाद साधत आहेत. अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. त्यांच्यावर पाच ते सहा लोकांनी हल्ला केला होता. ते पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांच्यावर हल्ला होणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्याने ती रद्द करण्यात आली. याप्रकरणी कट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर जवळच असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना अडवलं आणि ताब्यातही घेतलंय. या सगळ्या घटनेनंतर बारस्कर यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्कर यांनी काही दिवासांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जरांगे पलटी मारतात, खोटं बोलतात असा दावा बारस्करांनी केला होता. जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत. त्यांनी बंद खोलीत बैठका केल्या, जरांगेंच्या बैठका रात्री होतात. लोकांची फसवणूक केली आहे. मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. मी प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाहीये. मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही. आताच हे का झालं? काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली, असंही त्यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे विरोधात बारस्कर भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मराठा समाजातील पाटील समर्थक मराठा बांधव त्यांचा विरोध करत आहेत.
राज्य सरकारनेच मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी आपल्याविरोधात सापळा लावलेला असून, आज जे मराठा समाजातील आंदोलक आपल्यावर आरोप करीत आहेत ते सरकारचे हस्तक आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन आपल्याविरोधात आरोप केले जात आहेत. बारसकर हे मराठा समाजात फूट पाडत होते म्हणून आपण त्यांना व्यासपीठावरून खाली उतरवले, असा गंभीर आरोप अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत जरांगे यांनी अजय बारसकर यांच्यावर केला.
0 टिप्पण्या