Top Post Ad

पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही

 


पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी ठणकावून सांगत विजय साखळकर यांना वाहण्यात आली आदरांजली                                      

  आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत आहेत. यासाठी आता पत्रकारांनी स्वतःहून एकजुटीने उभे राहिले पाहिजे. पत्रकारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणावर उभी करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी ठणकावून सांगितले. 

ज्येष्ठ अष्टपैलू पत्रकार, लेखक, साहित्यिक विजय साखळकर यांचे २७ जानेवारी रोजी अल्पकालीन आजाराने निधन झाले. कै. विजय साखळकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या के. वसंत शिंदे सभागृहात इंडिया मीडिया लिंक ॲंड इव्हेंट्स मॅनेजमेंट चे के. रवि आणि विजय साखळकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना योगेश वसंत त्रिवेदी यांनी पत्रकारांची आजची विदारक परिस्थिती सविस्तर मांडून मुंबई मराठी पत्रकार संघ या ऐंशी वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या नोंदणीकृत संघटनेचा अधिकृत प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही समितीवर नाही, याबद्दल खेद व्यक्त केला आणि संघाने यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे असे स्पष्ट केले. 

सरकारी समित्यांवर काम करतांना आपल्याच पत्रकारांनी जाचक अटी रद्द करण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मी अधिस्वीकृती समितीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा प्रतिनिधी असतांना २०१६ मध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून ५८ वर्षे वय आणि २५ वर्षे अनुभव असा ठराव समितीने मंजूर केला होता त्याचा अजून शासन निर्णय निघालेला नाही.  ९ मे २०२३ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची रक्कम अकरा हजार रुपयांवरुन वीस हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही रक्कम पंचवीस हजार रुपये करण्याची मागणी केली होती. त्या घोषणेचा जी आर अजून निघालेला नाही. आयुष्याच्या संध्याकाळी सन्मान योजना सन्मानाने द्या, सहनशक्तीचा अंत पाहू नका अशा मागण्या केल्या.  आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या दोन्ही योजना स्वतंत्र करुन प्रत्येकी १००/१०० कोटींची तरतूद करा, अशा मागण्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत. सरकारने विनाविलंब या मागण्या मान्य करुन पत्रकारांना दिलासा द्यावा. पत्रकार हा पत्रकार असतो त्यांच्यासाठी अधिस्वीकृतीचा काटेकोर नियम लावण्यात येऊ नये. ज्यांच्याकडे अधिस्वीकृती पत्रिका नाहीत ते पत्रकार नाहीत कां ? असा संतप्त सवाल उपस्थित करुन महाराष्ट्रातील सर्वच पत्रकारांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. 

के. रवि, प्रा. हेमंत सामंत, भारत कदम, राजेंद्र साळसकर, सोनल खानोलकर, नासिकेत पानसरे, घनश्याम भडेकर  सत्यवान तेटांबे, सुधीर हेगिष्टे आदींनी आपापले अनुभव कथन केले आणि कै. विजय साखळकर यांना आदरांजली वाहण्यात आली. के. रवि यांनी सरकारवर अवलंबून न राहता आपण एकजुटीने उभे राहून पत्रकारांसाठी कार्य करु या, असे सांगितले. राजेंद्र साळसकर यांनी सूत्रसंचालन केले.

हया वेळेस पत्रकार विजय साखळकर यांची मानस कन्या सोनल खानोलकर यांनी सांगितले की, साखळकर हे माझे गुरुवर्य होते. ते माझ्या वडिलांचे ( खतरनाक वृतपत्राचे संपादक सुरेश खानोलकर )यांचे चांगले मित्र होते. त्यांच्या जाण्याने मला मानसिक धक्का बसला आहे. कारण ते नेहमी मला मार्गदर्शन करीत. त्यांच्यामुळेच खतरनाक अंकांची अविरतपणे एवढी वर्षे वाटचाल सुरू होती. त्यांच्या लेखणीने अनेक प्रांत बेमालूमपणे हाताळाले होते. अशा अवलिया पत्रकाराचा शेवट मनाला चटका लावून गेला.  पत्रकार प्रा हेमंत सामंत, नासिकेत पानसरे, घनश्याम बडेकर ,सत्यवान तेटांबे , सुरेश गायकवाड यांनीही पत्रकार विजय साखळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यकमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय साखळकर यांचे मानस पुत्र राजेंद्र साळसकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com