मराठा आरक्षणाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदाराकडून भुजबळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदाच ओबीसींचा महा एल्गार मेळावा आज पार पडला. यावेळी आपण १६ नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
भटक्या विमुक्त ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही सभा होत आहे. ओबीसींचे सर्व आरक्षण संपवून टाकेल हे सर्वांच्या लक्षात येत नाही का? सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत ते आरक्षण विरोधात आहेत. झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतले तर त्याला बाहेर काढले जाईल असे निवाडे आहेत. काय चाललय समजत नाही. ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून मारहाण केली जात आहे त्रास दिला जात आहे, असे गंभीर आरोप करत भुजबळ पुढे म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते राजीनामा द्या सांगतात, तसे सरकारमधील लोकही मागतात. मला त्या सगळ्यांना सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला पहिली रॅली झाली. १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला मग रॅलीला गेलो, असा गौप्यस्फोट करत ओबींसीसाठी शेवट पर्यंत लढणार आहे, असा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला.
आम्हाला आरक्षण मिळाले म्हणून गुलाल उधळला मग उपोषण कशाला करता. कागद आला आणि हा म्हणतो अध्यादेश आला. मसुदा आणि अध्यादेश यातला फरक कळत नाही. महाराष्ट्रामध्ये उन्माद केला जातोय ओबीसी लोकांना त्रास दिला जातोय. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ते वेगळं द्या. मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. मात्र प्रश्न करायचा आहे वाशीमध्ये तुम्ही जाहीर केलं मी शपथ घेतली होती ती मी पूर्ण केली. मग मला प्रश्न पडतोय की शपथ पूर्ण झाली तर आयोगाचा सर्वे कशाला? तपासणी करणारे लोक आपोआप माहिती भरतात. खोटं खोटं सुरू आहे. आरक्षण मिळाले तर हे कशासाठी? अनेक ठिकाणी खोटे कुणबी प्रमाणपत्र दिली जातात. तीनशे साठ कोटी रुपये खर्च या साठी करत आहात का?" असे अनेक सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांना ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत मी घेतलेली भूमिका पटत नसल्यामुळे आपली अडचण होऊ नये, आपण मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरला सकाळी साडेबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती हाती आली आहे. तर छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची 18 नोव्हेंबरला एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिन्ही मंत्र्यांनी छगन भुजबळ यांना राजीनामा देऊ नये, अशी विनंती केली. भुजबळांनी राजीनामा दिला तर हे मंत्रिमंडळासाठी योग्य ठरणार नाही. तसेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये असे त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी तिन्ही मंत्र्यांना राजीनाम्याबाबत माध्यमांमध्ये सांगणार नसल्याचे कबूल केलं. मात्र, त्यानंतरही छगन भुजबळांनी राजीनामा मागे घेतला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजूनही छगन भुजबळ यांचा राजीनामा असल्याची माहिती हाती आली आहे.
0 टिप्पण्या