Top Post Ad

राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले... 21 फेब्रुवारी रोजी ठोस आणि निर्णायक भूमिका घेणार


 ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि एकूणच राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले या संदर्भात ठोस आणि निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची महत्वाची बैठक 21 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात होणार असल्याची घोषणा एस.एम.देशमुख यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर  पुण्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात निदर्शने करण्यात आली. यावेळी मुंबईतील सर्व प्रमुख पत्रकार संघटनासह अनेक सहकारी संस्था, कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. या विरोधात सर्व पत्रकार संघटनांनी एकजूट कायम ठेवण्याची गरज सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.. निखिल वागळे यांच्याआधीही राज्यात गेल्या सहा महिन्यात 36 पत्रकारांवर हल्ले झाले असून निवडणुकांच्या काळात असे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विरोधात केवळ निषेध करून चालणार नाही तर काही ठोस भूमिका घ्यावी लागेल अशी सूचना अनेक वक्त्यांनी केली. त्यानुसार विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची २१ फेब्रुवारी २०२४  रोजी दुपारी २ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक घेण्यात येणार आहे..या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.. 

एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निषेध सभेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीरसिंग, जतीन देसाई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रवीण पुरो, मुंबई क्राईम रिपोर्टर असो.चे शाहिद अन्सारी, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मुंबई महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू सोनावणे तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, युवराज मोहिते, संजीव साबडे, राही भीडे, संजय परब, एनडीटीव्हीचे मिश्रा आदिंनी  निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. दोन तास सुरु असलेल्या या आंदोलनाला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार संघटनांनी आंदोलनं करून निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. 

या आंदोलनात काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा, आमदार वर्षाताई गायकवाड यांनीही सहभाग नोंदवला. सध्या केवळ पत्रकारांनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला धमकवण्याचे आणि त्याचे विचार दाबण्याचे प्रयत्न विद्यमान सरकारकडून होत आहेत.  ज्यांच्यावर हल्ला होतो त्यांच्यावरच पोलिस प्रशासन केसेस दाखल करते आणि हल्लेखोरांना मोकाट सोडून देते. हल्ला होणार हे माहित असूनही निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. उलट त्यांना चार तास थांबवून ठेवले. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. काही संघटनांनी आंदोलन तीव्र केल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली. असा मनमानी कारभार महाराष्ट्रात सुरु आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी निश्चितच भयावह आहे. मागे संसदेमध्ये स्फोटके फोडण्यात आली. त्याबाबत विचारणा करणाऱ्या खासदारांनाच निलंबित करण्यात आले. अशा तऱ्हेने येथील पत्रकारांचीच नव्हे तर एकूणच सर्व विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचे काम हे शासन करीत आहे. संविधान धोक्यात आहे. परंतु नक्कीच जनआंदोलनातून हेही सरकार बदलेल आणि पत्रकार त्याचा चौथा स्तंभ भक्कमपणे उभा राहिला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व ताकदीने उभे राहू, ग्वाही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली. 

मुंबई, देशातील सद्यस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारकडून दडपशाहीचा झुंड व द्वेषाचे राजकारण सुरू असून पत्रकार कामगार आणि शेतकरी यांचा आवाज दाबला जात असून त्या विरोधात पत्रकारांनी अन्याय विरोधात आवाज बुलंद करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग यांनी इथे बोलताना केले.    महाराष्ट्र पुरोगामी आहे का असा सवाल आता थेट जनतेतून केला जात आहे, असे पत्रकार युवराज मोहिते यांनी सांगितले. महाराष्ट्रात आझाद मैदानामध्ये आंदोलनाचा वेग वाढत आहे. सध्याची कायदा सुव्यवस्था लक्षात घेता महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का  असा थेट सवाल ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी केला.‌ ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती हल्ला हा नवीन नसून गेल्या काही दिवसांपासून पत्रकार शशिकांत वारीशे त्यांच्या हत्यानंतर अनेक पत्रकारांवरती महाराष्ट्रभर हल्ले झाले आहेत, याचा निषेध केला पाहिजे, मात्र केवळ निषेध करून भागणार नाही तर या विरोधात निर्णायक भूमिका घेतली पाहिजे असा हल्लाबोल मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख यांनी केला. पत्रकारांवर कितीही हल्ला केला तरी तो आम्ही कदापि सहन करणार नाही मुंबई मराठी पत्रकार संघासह महाराष्ट्रातले सगळे पत्रकार एका छत्राखाली एकवटतील, असा आशावाद पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी व्यक्त केला. पत्रकारांचाच नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि न्यायालय यांचा आवाज दाबला जात आहे. देशातील कामगार कष्टकरी संघटना कायम पत्रकारांच्या सोबत आहे आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्यासोबत लढा उभा करेल अशी ग्वाही समितीचे निमंत्रक डॉ. विवेक मोंटेरो यांनी दिली. 

 अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर,(रायगड)  मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई  मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर आणि विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.    निदर्शने आंदोलनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ  वार्ताहर संघ, टीव्हीजेए, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, बृहन्मुंबई महापालिका पत्रकार संघाचे प्रतिनिधी  तसेच सामाजिक संघटना,कामगार संघटनानी सहभागी होत हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघाबाहेर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.----------------------------------------------------------------------टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com