Top Post Ad

बिल्किस बानोप्रकरणी महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार?


  गुजरात दंगलीत बिल्किस बानो यांच्यावर झालेला सामुहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींना गुजरात सरकारनं शिक्षेत दिलेली सूट सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे. गुजरात सरकारला मोठा झटका देत सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानोच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना माफी देण्याचा सरकारचा निर्णय आज रद्द केला. इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींना 2 आठवड्यात तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. सुटका झालेल्या या सर्व 11 दोषींनी पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. तसेच यासाठी दोन आठवड्यांचा अल्टिमेटमही देण्यात आला आहे. 

दरम्यान बिल्किस बानो प्रकरणातील हा निर्णय आज न्या. बीव्ही नागरत्न आणि न्या. उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठानं दिला. कोर्टानं म्हटलं की, , “भविष्यात गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली जाते पण पीडितेचे दुःखही लक्षात घेतले पाहिजे. आम्ही या प्रकरणाची कायदेशीर दृष्टीकोनातून तपासणी केली आहे. आम्ही पीडितेची याचिका सुनावणीस योग्य मानली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका ऐकण्यायोग्य आहेत की नाही यावर आम्ही भाष्य करत नाही.  तसेच गुजरात सरकारला या अशा प्रकारे शिक्षा माफ करण्याचा अधिकार नाही. या खटल्याची सुनावणी जर महाराष्ट्रात झाली आहे तर सुटका देखील महाराष्ट्र सरकारच करु शकतं. ज्या राज्यात आरोपींवर खटला दाखल केला जातो आणि शिक्षा सुनावली जाते त्याच राज्याला आरोपींच्या माफीच्या याचिकेवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या निर्णयानंतर देशभरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान गुजरातमधील बिल्किस बानो यांच्या घराबाहेप फटाके फोडण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गुजरातमध्ये कारसेवकांना घेऊन जाणाऱ्या एक्सप्रेसला गोध्रा इथं आग लावल्याच्या घटनेनंतर ३ मार्च २००२ मध्ये दंगल उसळली होती. यावेळी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात उग्र झालेल्या गर्दीनं बिल्किस बानोच्या घरात शिरले. त्यानंतर या लोकांपासून वाचण्यासाठी बिल्किस बानो आपल्या कुटुंबासह एका शेतात लपून बसली होती. तेव्हा बिल्किसचं वय २१ वर्षे होतं आणि ती ५ महिन्यांची गर्भवती होती.  पण दंगलखोरांनी बिल्किस बानो आणि तिच्या कुटुंबाला पकडलं आणि बिल्कसवर सामुहिक बलात्कार केला. तसेच तिची आई आणि ती इतर महिलांवरही अत्याचार करण्यात आला. या हल्ल्यात तिच्या कुटुंबातील १७ सदस्यांपैकी ७ जणांची हत्या करण्यात आली. ६ लोक बेपत्ता झाले, ते कधीही सापडले नाहीत. या हल्ल्यातून केवळ बिल्किस बानो, एक व्यक्ती अनं केवळ तीन वर्षांचं एक बाळंच वाचलं होतं.

सामुहिक बलात्काराच्या आरोपींना २००४ मध्ये अटक झाली. जानेवारी २००८ मध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टानं ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यावर गुजरात सरकारचा प्रभाव पडता कामा नये यासाठी हा खटला महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात आला. मुंबई हायकोर्टानं ही शिक्षा कायम ठेवली होती. आरोपींना सुरुवातीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात त्यानंतर नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर त्यांना गोध्राच्या सबजेलमध्ये पाठवण्यात आलं. दरम्यान मे २०२२ मध्ये तत्कालीन न्या. अजय रस्तोगी यांनी या प्रकरणातील ११ दोषींना गुजरात सरकारकडून तातडीनं माफी देण्याच्या अपिलाला परवानगी दिली होती. त्यानंतर गुजरात सरकारनं १५ ऑगस्ट २०२२ रोजी गोध्राच्या तुरुंगातून सुटका केली होती. त्यानंतर गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टानं या दोषींना सोडण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला. दरम्यान, गुन्हेगार पुन्हा महाराष्ट्र सरकारकडे अर्ज करणार का? आणि महाराष्ट्राचे सरकार काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.


बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने दिलेली शिक्षामाफी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्याने बिल्किस बानो कुटुंबाला दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली. परंतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक भाष्य करणं बिल्किस बानोच्या कुटुंबीयांना टाळलं. बिल्किसच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. न्याय अजूनही जिवंत असल्याची खात्री झाली आहे. परंतु, दोषी इतर राज्यातून माफीसाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आम्हाला हा अंतिम विजय वाटत नाही. तुरुंगाबाहेर राहण्यासाठी दोषी पुन्हा माफीसाठी अर्ज करू शकतात. माफीसाठी केलेल्या याचिकेवर न्यायालयही विचार करू शकतं. त्यामुळे आमच्या मनात अद्यापही शंका आहे. त्यामुळे लढा अद्याप संपलेला नाही, त्यांना तुरुंगात परत पाठवण्यापर्यंत आमचा लढा सुरू राहिल.” दरम्यान ११ दोषींची गुजरात सरकारने सुटका केल्यानंतर बिल्किस बानो तिच्या कुटुंबियांसह अज्ञात ठिकाणी राहत असल्याचं सुत्रांनी म्हटलं असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलंय 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com