मराठा समाज इतर समाजापेक्षा बहुसंख्यांक असलेला लढवय्या, श्रीमंत, जमीनदार असा समाज आहे. त्याची सामाजिक,राजकीय , धार्मिक, सांस्कृतिक आदी सर्व स्तरावर वर्चस्व आहे. त्यामुळे त्या समाजाची सर्वच समाजावर भिस्त आहे. असा मर्दमूकी असणारा समाज आज घडीला सैरभैर झालेला दिसत आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांचे मनी काहूर उठले कि. असा कोणता अन्याय अत्याचार झाला आहे? ज्यामुळे तो समाज सर्व स्तरावर उध्वस्त झाला आहे. तो भुकेकंगाल अन् कफल्लक झाला आहे. तो समाज फारच हीनदीन, कुचलेला पिचलेला कुजलेला आहे. ह्या समाजावर दिवसागणिक अन्याय अत्याचार सुरूच आहे आणि तो समाज अन्याय अत्याचार सहन करतोय. त्यांच्या आया बहिणीना भोगले जाते आहे. त्यांच्या भावाचे मुडदे पडता आहेत. त्यांच्या जमिनी हडप केल्या जाता आहेत त्याची नग्न धिंड काढली जाते आहे . त्यांच्या बागा, घरेदारे, झाडेझुडपी उध्वस्त केली जाता आहेत. एवढेच नव्हे तर हा सर्व मराठा समाज बहुसंख्यांक असून इतर समाजाला घाबरतोय ? तो त्यांच्या हातातील बाहुले झालेला आहे ? त्या समाजाच्या हाताच्या बोलावर मोजण्या इतक्या जिरायती - बागायती जमिनी आहेत ? त्या समाजाच्या ज्या आर्थिक विकासाच्या नाड्या आहेत त्या सहकाररूपी उद्योग, पतसंस्था आहेत त्या भीकेला लागल्या आहेत. अगदी सर्व मराठा समाज हजारो वर्षे अन्याय अत्याचार सहन करतोय? अगदी नरकयातना भोगतोय ? नाही ना ।
अर्थात, मराठा समाजाने आरक्षणावरून रान पेटविले आहे. त्याने ५७-५ ८ मोर्चे काढून धरणे आंदोलने करून सर्व समाजासह सरकारला ही वेठीस धरले. परंतु तो त्यांचा आततायीपणा, शिरजोरपणा, रास्त आहे का? कारण सर्व समाजाचा मराठ समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे . सर्वांनाच वाटते कि, मराठा समाजालाच काय इतर समाजाला ही आरक्षण मिळालेच पाहिजे. परंतु ज्या समाजाला अजूनही आरक्षण मिळत नाही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. त्यांच्या हक्कांवर,सुख सुविधांवर, त्यांच्या निधीवर डल्ला मारला गेलाय, मारला जातोय? त्याचे काय? अहो, अजूनही त्याच्या ताटात मातीच कालवली जाते आहे. त्याचा विचार आतापर्यंत कुणी केला का? त्यांचे सर्वच स्तरावर शोषण होत आहे. मुडदे पाडले गेले आहे. माणूस म्हणून जगू दिले जात नाही. इतकेच काय तर दिवसांगणिक अन्याय अत्याचाराची परिसिमा ओलांडली जाते आहे. त्या मनसुन्न, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये अजूनही न्याय मिळाला नाही? मिळत नाही त्याचे काय? आणि ह्या साऱ्या घटना उघड्या डोळ्यांसमोर घडत असताना कुणी ही न्यायासाठी पुढे येण्यास धजावत नाही. चाउलट जाती- धर्माच्या- पंथांच्या चष्याम्याने त्या घटनांचा असुरी आनंद लुटायचा यापलीकडे काय केले आहे? आणि आता आरक्षण हवे तर ओबीसी समाजाच्या कोट्यातूनच हवे? अन्यथा खुन्नशी प्रवृत्तीने, सूडाच्या भावनेने दोन्ही समाजाने बघून घेण्याची भाषा करणे हे कितपत योग्य आहे.
आणि सरकारने ही मतांच्या बेरजेकडे पाहून बघ्याची भुमिका घेणे हे फारच भयावह आहे. याउलट सरकारने धाडसी पाऊले उचलून सर्व समाजातील विचारवंत, विद्वान, कायदेतज्ञ आदींना पाचारण करून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल? यावर कृती केली पाहिजे. तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो. विनाकारण दडपशाही करून दंडेलशाही करून कायदा पायदळी तुडवून त्याची लक्तरे वेशीवर टांगून आताच आरक्षण हवे तेही ओबीसी समाजाच्या कोट्यातूनच, अन्यथा सरकारला आणि इतर समाजाला भारी पडल्याशिवाय राहणार नाही ही बघून घेण्याची धमकी फारच विचार करणारी आहे. परंतु याठिकाणी मराठा समाजाला सांगावेसे वाटते कि, सरकारने आजघडीपर्यंत मराठा समाजाच्या मागणीला दुजोरा दिला. त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. कारण सत्य हे आहे कि जेवढे आयोग, समिती स्थापन करण्यात आल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या त्यामधून सामाजिक मागासलेपणाचा अर्क मिळून आला नाही. आणि हे वास्तव असतानाही, हे सत्य असतानाही सर्व समाज,सरकार आणि त्यांची सरकारी यंत्रणा आरक्षण देण्यास पुढे सरसावले आहे. सर्वांचीच सकारात्मक भूमिका आहे. तरी देखील ही दंडेलशाही, दडपशाही का?
आणि हो, मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर जे रान पेटविले आहे त्यामध्ये त्यांनी विश्वकारणी तथागत गोतम बुद्ध महत्मा फुले शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज संत कबीर संत तुकाराम महाराज संभाजी महाराज, आदी सर्व महापुरुषांचा संतांचा अभ्यास करावा आणि त्यांच्या विचारांचा वारसा आणि वसा चालवावा. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची दोन दोन वेळा जयंती साजरी केली जाते आहे ? हा महाराजांचा अपमान नाही का? ज्या संभाजी राजांचा वध केला त्यांच्या मारेकऱ्यांचा चेहरा जगासमोर आणायला नको का? ज्या ज्या संतांचा महापुरुषांचा कपटनितीने वध करण्यात आला तो इतिहास सर्व जगासमोरआणायला नको काय? एवटेच काय तर ज्या आरक्षणासाठी आंदोलने धरणे मोर्चे उपोषण केली जाते आहे. त्या आरक्षणाची अंमलबजावणी
इतर समाजासाठी कठोरपणे केली गेली का? त्या समाजांना किती लाभ झाल? त्यांचा निधी कुणी लाटला? यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. आणि सरकारने तर कहरच केला खासगी क्षेत्रात आरक्षण नाहीच नाही. सरकारी क्षेत्रात ही पाचर मारणे सुरूच आहे त्याविरोधान ही उभे ठाकण्याची गरज आहे. याशिवाय इतर समाजाला जे स्वसंरक्षणासाठी कायदा केला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी उभे राहण्याची गरज आहे. थोडक्यात लोकशाही वाचविण्यासाठी वाचविण्यासाठी पुढाकार घेऊन हुकुमशाही विरोधात क्रांतीकारक पाऊले उचलण्याची गरज आहे. जेथे लोकशाहीच राहणार नसेल तर आरक्षण कसे राहणार? त्यासाठी मराठा समाजातील नेतेमंडळी घाणेरडे राजकारण न करता सर्वच समाजातील नेत्यांसह, कायदेतज्ञासह, समाजधुरिणासह बैठक घेऊन मराठा समाजाच्या नव्हे तर सर्व समाजाच्या विविध रूपी मागण्यावर समस्यांवर जालीम उपाय शोधून त्यांचा प्रश्न धसास लावावा. तरच ज्या ज्या समस्या आहेत त्यात्या समस्या आक्राळ विक्राळ स्वरूप धारून करून मनुष्याचा माणुसकीचा निःपात करणार नाही एवढे मात्र खरे!
: सुरेश गायकवाड / ९२२४२५०८७३
0 टिप्पण्या