खासदार हेमंत पाटील यांनी निधीवाटप करताना टक्केवारीचं शेण खाल्लं, असा आरोप पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. यावर राज्यात इतके जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येवून निधीवाटपात शेण खाणं योग्य नाही, निधीवाटप जर असंच सुरू राहिलं तर शिवसैनिक तुम्हाला पायाखाली घेतील, असा इशारा पाटील यांनी दिला. मंत्रीमहोदय आणि खासदारांमध्ये झालेल्या खडाजंगीमुळे बैठकीतील अधिकारी आणि सदस्यांची भंबेरी उडाली. जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रत्यक्ष स्वरूपात घेण्याचे ठरलेले असताना पालकमंत्री सत्तार यांनी अचानकपणे आपला प्रवास दौरा रद्द करत ही बैठक ऑनलाईन घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. बैठकीच्या सुरूवातीलाच निधी वाटपातील भेदभावावरून खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक रूप धारण करून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील आपला इरादा स्पष्ट केला. या घडलेल्या प्रकाराची प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.
हिंगोली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीला खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव हे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीमध्ये खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. पालकमंत्री आणि खासदार महोदयांनी असंवैधानिक शब्दाचा वापर केला असल्याचे या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. दोघेही नमतेपणा घेत नव्हते. प्रकरण थेट शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं. अखेर खासदार पाटील यांचा माईक म्यूट करून बैठक सुरू ठेवण्याची वेळ आली.
0 टिप्पण्या