छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या केवळ एका विशिष्ट वर्गाच्या भरवशावर अवलंबून राहिले असते तर त्यांना स्वराज सोडा एक किल्लाही जिंकता आला नसता. त्यामुळे त्यांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेतले. महाराष्ट्रातील मराठा हा ब्राह्मणी व्यवस्थेतील एक शोषक तरी ही गुलाम असलेला चेहरा आहे. हे छत्रपतींना माहित असल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक मावळा हा शब्द आपल्या सैनिकांसाठी वापरला. मावळा हा बहुजनवादी विचारांचा द्योतक आहे. मराठा समाजाने मनोज जरांगेचे नेतृत्व स्वीकारले त्याच वेळी या समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक समजेचे वस्त्रहरण झाले. " एक मराठा, लाख मराठा" चे नारे देत व आपल्या शक्तीचे प्रदर्शन करीत आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मराठ्यांची सत्तेत बसलेल्या अनाजी पंत व सत्तेसाठी हपापलेल्या त्याचाच मराठा साथीदारांनी जी बोळवण केली. ती मराठ्यांना समजून पण आली नाही. सहा महिन्यांपासूनचे आंदोलन, त्यात लाखों रुपयांचा झालेला चुराडा, गावा -गावांत मराठ्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन, त्यामुळे गावातील सामाजिक सलोख्याला निर्माण झालेला धोका,आंदोलकांनी केलेली जाळपोळ, प्राणघातक हल्ले यातून काय मिळविले ? याचा हिशोब ज्यावेळी होईल, त्यावेळी ज्याला ऐतिहासिक आंदोलन म्हटले जात आहे. त्या जरांगेचे आंदोलन पुरोगामी महाराष्ट्रावर एक आघात होता, हे स्पष्ट दिसेल.
ज्या मंडल आयोगाला विरोध केला. आरक्षणाच्या लाभार्थींची थट्टा मस्करी केली. त्या आरक्षणात हिस्सेदारी मागताना खरे तर या मराठा समाजाला काहीतरी वाटायला हवं होतं. त्यासाठी किमान दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी होती. पण आज ही शक्ती प्रदर्शनच होत आहे अन् हिच दाखवत असलेली शक्ती मराठा समाजासाठी मारक ठरली आहे. ती आजही जात नसेल तर मराठ्यांचा भविष्यकाळ गुलामगिरीचा आहे. राज्यात मराठ्यामध्ये दोन वर्ग पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. एक गरीब मराठा जो शेती पिकली नाही की आत्महत्या करतो अथवा तसा विचार करतो. तर दुसरा श्रीमंत मराठा. ज्याच्याकडे सहकार चळवळ आहे. कारखाने अन् बँका आहेत. त्यातील करोडो रुपये लुबाडण्यासाठी आहेत. शिक्षण संस्था आहेतं. ज्यांचा त्याने बाजार करून लूटमार करीत आहे. अन् पेशव्यांचा आशीर्वादाने मिळालेली सत्ता ही त्याच्याकडे आहे. तोच या शेतकऱ्यांच्या वाट्याचे, हिस्स्याचे लुबाडत आहे. अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला नसता व निधी सिंचनासाठी वापरला असता तर आज या मराठ्यांच्या शेतीला पाणी मिळाले असले. शेती पिकली असती. अन् आत्महत्येची वेळ आली नसती. थोडक्यात गरीब मराठा जातीचा विचार करून जातीच्या उमेदवाराला मत देतो. अन् निवडून आलेला श्रीमंत मराठा मग त्याचीच लूटमार करतों. हे मराठा समाजाला समजत नाही. अन् सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या तो स्वतःला बदलून घेतं नाहीं. तोपर्यंत त्याचे भविष्य अंधकारमयच राहणार.
सामजिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास जातींना जे आरक्षण आहे ते ५० टक्क्याच्या आत आहे. उर्वरित ५० टक्क्यामध्ये स्पर्धा करण्याची त्यांची तयारी नाहीं. या मराठ्यांना ओबीसीत घुसायचे आहे. असे झाले तर ओबीसी आरक्षणातील किती टक्के त्याच्या वाट्याला येतील ? अन् त्यामुळें काय होइल ? याचा विचार केला तर मराठा स्वतःच स्वतःच्या पायावर दगड पाडून घेत आहे व दुसऱ्यांचे ताटात घुसत असल्याने बदनामही होत आहे.
मराठा बांधवांना हे सांगणे आहे की, जी दादागिरी तुम्ही ओबीसीत घुसण्यासाठी दाखवीत आहात ती शेतीला वीज, पाणी, शेती मालाला हमी भाव मिळविण्यासाठी करा. सहकारी साखर कारखाने, बँका, अन् दूध संघात जो भ्रष्टाचार होत असून त्यातून तुमचीच पिळवणूक होत आहे. ती थांबविण्यासाठी करा. आपले म्हणुन ज्यांना निवडून देता, त्यांना एकदा पाडून बघा. संविधान व लोकशाहीवादी व्हा. शाहु-फुले-आंबेडकरवादी व्हा. मगच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजतील. आज जे छत्रपती तुमच्या डोक्यात आहेतं. ते बामणी व्यवस्थेने घुसविले आहेत. खरे शिवराय महात्मा फुले यांनी लिहून ठेवले आहेत. शिवरायांवर पहिला प्रदिर्घ पोवाडा लिहून समस्त शिवरायांचे दर्शन त्यांनी आम्हाला घडवले आहे. तेव्हा फुले-आंबेडकर वाचल्याखेरीज खरे शिवराय कळणार नाहीत. तेव्हा जातीचा अभिमान सोडा... संविधानवादी होण्यातच तुमचे भले आहे.
राहुल गायकवाड, 99673 80268
महासचिव, समाजवादी पार्टी, मुंबई/ महाराष्ट्र प्रदेश.
0 टिप्पण्या