.अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ प्रिंप्री गावात दोन कुटुंबावर काही गावगुडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४०० ते ५०० जणांच्या जामावानं गावातल्या दोन कुटुंबाच्या घराची आणि वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून दोन कुटुंबावर चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केला आहे. दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलवरही मारहाण झाली होती, पण ते प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आलं होतं, मात्र एका ग्रामपंचायत सदस्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद पुन्हा उफाळून आला. यानंतर जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने काही पोलीस घटनास्थळी होते त्यांनी रक्षण केल्याने कुटुंबियांचा जीव वाचला आहे.
याप्रकरणी ७१ जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंसाचारादरम्यान घटनास्थळी दोन पोलीस आले होते पण जमावानं त्यांचे मोबाईल हिसकावून घेऊन त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे. या प्रकारामुळं घाबरलेल्या कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम ठोकला. या कुटुंबातील लहान मोठ्यांसह सर्वजण भयभीत झालेले आहेत. सध्या गावात पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे, असं सांगितलं जात आहे
"गावातल्या लोकांनी आमच्या घराची लाईट बंद केली. लाठ्या-काठ्या दगडफेक केली तसेच यांच्या आयाबहिणी धरा म्हाताऱ्या बायाही सोडू नका, मणिपूरसारखी घटना घडवून आणायची आहे. हे खूप माजले आहेत, यांना जाळूनच टाकायचं आहे. निवडणुकीपासून खूपच माजले आहेत हे, यांना गावातून बाहेर हाकलूनच द्यावं लागतं आहे," असं या गावगुडांनी म्हटल्याचा घटनाक्रम पीडित महिलेनं मीडियाला सांगितला. तर कोणावरही अशी वेळ येता कामा नये. खूपच वाईट स्थिती केलीए या गावगुंडांनी. यांची खैरलांजीसारखी परिस्थिती करा असंही ते म्हणतं होते, त्यांच्या दहशतीमुळं गावातील इतर दुसरे कोणी आमच्या मदतीसाठी आले नाहीत. या गावगुंडांना कडक शिक्षा झाली पाहिजे," असं एका पीडित पुरुषानं माध्यमांना सांगितलं.
"या घटनेमध्ये राहता पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही, शोध सुरु आहे" - युवराज आठरे (राहता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक)
या हल्ल्यामुळे कुटुंबाने रात्रीपासून लोणी पोलीस स्टेशनचा आसरा घेतला असून लहान मुलाबाळांसह सर्वजण घाबरले आहेत. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींवर कठोर कारवाई करावी - सुरेंद्र थोरात जिल्हाध्यक्ष रिपाइं
0 टिप्पण्या