महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे, अशा गंभीर प्रसंगातही भाजपच्या कुळे यांची 'मुळे' मकाऊच्या कॅसिनो महालात पोहचली. राऊत यांनी केलेल्या या पोलखोलमुळे बावनकुळे चांगलेच बिथरले आहेत. केवळ बावनकुळेच नव्हे तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षच बॅकफूटवर गेला आहे. खरेतर याप्रकरणामुळे बावनकुळे यांनी राजीनामाच द्यायला हवा होता. पण सध्याच्या भाजपवाल्यांकडून अशा प्रकारची अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. एकंदरीतच जनतेमधून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियेमुळे बावनकुळे चांगलेच धास्तावलेले आहेत. त्यामुळे स्वतःची इमेज बिल्डींग करण्यासाठी त्यांनी पत्रकारांना हाताशी धरण्याचा निर्णय घेतला. याआधीही 'विरोधात बातम्या न लावण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या' या वादग्रस्त विधानामुळे ते पत्रकारांच्या रोषाचे बळी ठरलेले होते.
दिवाळीचे निमित्त करून 'लाच' देण्याचा प्रयत्न
बावनकुळे यांनी पत्रकारांना खुश करण्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी 'दिवाळी भेट' असे कार्यक्रमाचे गोंडस नामकरण केले होते. वास्तविक दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले होते. बावनकुळेंचा खरा उद्देश हा पत्रकारांना खूष करण्याचा होता, पत्रकारांचे लक्ष 'मकाऊ' प्रकरणावरून दुसरीकडे वळवण्याचा होता. त्यासाठी लाच द्यायचा हा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला व दिवाळीनंतर पुन्हा 'दुसरी' दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमानंतर 'मंत्रालय व विधिमंडळ' कव्हर करणाऱ्या काही निवडक पत्रकारांना त्यांच्या मीडिया विभागातील पत्रकारांनी व्यक्तिशः बोलावले. त्यापैकी काहींना लॅपटॉप तर काहींना आयपॅड दिले. तर काही पत्रकारांना चक्क १५ ते २० हजार रुपयांची रोख रक्कम पाकिटात घालून दिली. इतकेच नव्हे तर काही निवडक संपादकांना त्यांच्या घरी जाऊन ५० हजार रुपयांची रोख रक्कमही दिली. याप्रकरणात बावनकुळे यांचे मीडिया सांभाळणारे 'चंगूनाथ' व 'मंगूनाथ' यांनी मोलाची मदत केली. ('चंगूनाथ' व 'मंगूनाथ' या टोपणनावामुळे ही जोडगोळी भाजपच्या मुंबई कार्यालयात कुप्रसिद्ध आहे.)
मास मीडियाचा अभ्यासक्रमही आता अपडेट व्हायला हवा. आता यापुढे 'मास मीडिया'च्या टुकार कोर्समध्येही मंत्री, पुढारी यांचा 'मीडिया' कसा सांभाळावा, इतकेच नव्हे तर पत्रकारांना कधी व किती पैसे द्यावेत याचीही माहिती द्यायला हवी.
बावनकुळे यांनी मुंबईसारखाच कार्यक्रम पुण्यातही आयोजित केलेला होता. बावनकुळे यांनी एक शिळ घातल्यावर पुण्यातही अशाच प्रकारे महत्त्वाच्या वृत्तपत्र व चॅनेलमधील समूह संपादक, संपादक व निवडक पत्रकार गोळा झाले होते. त्यांनीही भोजनाचा आस्वाद घेतला. बावनकुळेंबरोबर फोटोसेशन केले. बावनकुळे यांनीही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तक दिले, त्याचेही फोटो काढण्यात आले. बावनकुळेंसारखेच या संपादक व पत्रकार यांनी ते आनंदाने शेअर केले. मात्र हा सारा दिखावा होता. त्यानंतर बावनकुळे व त्यांच्या मीडियातील टीमने अशाच प्रकारे प्रत्येकाला व्यक्तिशः भेटून भेटवस्तू व रोख रक्कम दिली, अशी खात्रीलायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या टीमकडे आलेली आहे.
जे पत्रकार लोकशाहीचा स्तंभ म्हणून मिरवतात व दुसरीकडे अशा भ्रष्ट नेत्यांबरोबर फोटो किंवा सेल्फी काढतात, त्यांच्याकडून गिफ्ट घेण्यातच धन्यता मानतात, ते या सत्ताधाऱ्यांविरोधात लिखाण करण्याची हिंमत दाखवतील काय, लाचारीचा कळस तो अजून काय असतो, असा प्रश्नही जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहे.
'स्प्राऊट्स'ला न्याय मिळणारच!
मागील वर्षी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'सागर' या सरकारी बंगल्यावर १८० हून अधिक निवडक पत्रकारांना ('लष्कर- ए - देवेंद्र') 'दिवाळी भेट' देण्याच्या निमित्ताने बोलावले होते. यातील बरेचशे पत्रकार हे विधिमंडळ व मंत्रालय बिट कव्हर करणारे होते, काही संपादकही होते. तेथे त्यांना पोटभर जेवण दिले व त्यानंतर या सर्वांना तेथे रिलायन्स कंपनीचे ५० हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर वाटण्यात आले, अशी वस्तुस्थिती दर्शविणारी बातमी 'स्प्राऊट्स'ने प्रसिद्ध केली.
या बातमीच्या विरोधात 'द इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तसमूहाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 'स्प्राऊट्स'चे संपादक उन्मेष गुजराथी यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला. आजही 'स्प्राऊट्स'चे संपादक व त्यांची स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम ही त्यांनी लिहिलेल्या मतांवर ठाम आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल. न्यायालयात 'स्प्राऊट्स'ला न्याय मिळेल, अशी खात्री आहे. 'स्प्राऊट्स'च्या 'त्या' बातमीमुळे महाराष्ट्रातील प्रशासनानेचेही धाबे दणाणलेले होते. बऱ्याचशा पुढारी, नेते मंडळींनी पत्रकारांना कार्यक्रमात, खुलेआम गिफ्ट किंवा पैसे देण्याचे टाळले. त्याऐवजी त्यांचे पीआरओ स्वतः पत्रकारांना व्यक्तीश: भेटून गिफ्ट देतात. हा नवा पायंडा आता पडलेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी या घटनेनंतर आठवड्याभराने मंत्रालय कव्हर करणाऱ्या पत्रकारांना सोन्याचे गोल्ड कॉईन तर ठाण्यातील पत्रकारांना डिजिटल घड्याळे वाटली. संपादकांना '१४ प्रो मॅक्स' (14 max iPhone) हा ऍपल कंपनीचा जवळपास दीड लाखाचा मोबाईल वाटले. या सर्व भेटवस्तू त्यांना व्यक्तिशः बोलावून देण्यात आल्या. अर्थात त्यातही भ्रष्टाचार झाला. कित्येक पत्रकारांना यापैकी काहीच मिळाले नाही.
यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाणे येथील पत्रकारांना 'वर्षा' बंगल्यावर बोलावले, कोणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून त्यांना प्रत्येकाला केवळ ड्रायफ्रूट्सचे पाकीट दिले. मात्र आठवड्याभरानंतर 'मंत्रालय' कव्हर करणाऱ्या निवडक पत्रकारांना व्यक्तिशः पाकिटे पाठवली. त्यात ५० हजार रुपयांची 'लाइफस्टाइल' (Lifestyle) कंपनीची गिफ्ट व्हाउचर्स आहेत. संपादकांना मात्र विशेष गिफ्ट पाठवलेली आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत ( दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे आम्हाला क्षमा करा... ) यांनीही यंदाच्या दिवाळीत मंत्रालय कव्हर करणाऱ्या व काही संपादकांना मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बोलावले व त्यांना १५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पाकिटे दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अशाच प्रकारे मंत्रालय व विधिमंडळ' कव्हर करणाऱ्या काही निवडक पत्रकारांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पाकिटे दिली.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही २० ग्राम चांदीचे नाणे पत्रकारांना वाटले, 'शिक्षण'क्षेत्रात नवा पायंडा केसरकर गुरुजींनी घालून दिला. शिवसेना नेते (शिंदे गट ) यशवंत जाधव यांनी तर पालिकेतील निवडक पत्रकारांना गोल्ड प्लेटेड गणपतीही दिला. (हे सर्व पत्रकारांचे 'आकडे' आहेत, संपादकांचे 'आकडे' याहून कितीतरी पटीने अधिक आहेत).
लोकायुक्तांकडे तक्रारी करणे आवश्यक
असंख्य नेते व पुढारी दिवाळीनिमित्त पाकिटे वाटतात, विशेषतः मंत्रालय व पालिका कव्हर करणाऱ्या पत्रकारांना दिवाळीनिमित्ताने पाकिटे वाटण्याचे प्रकार अधिक आहेत. 'दिवाळी'च्या निमित्ताने लाच देण्याचाच हा प्रकार असतो. खरेतर याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करायला हवी व निर्भीड पत्रकारितेचा आवाज बुलुंद करायला हवा.
'अग्रलेख मागे घेणारे' संपादक गायब
एरवी प्रत्येक दिवाळीच्या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणारे, गिफ्ट व्हाउचर हक्काने मागून घेणारे संपादक यावेळी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या कार्यक्रमात फिरकलेदेखील नाहीत. कदाचित यावेळी गिफ्ट व्हाउचर मिळणार नाहीत, याची त्यांना अगोदरच कुणकुण लागली असावी.
महाराष्ट्र्रात अग्रलेख वारंवार मागे घेण्याचा नवीनच पायंडा स्वतःला 'लोकमान्य' म्हणून मिरवणाऱ्या वृत्तपत्राने पाडलेला आहे. हे अग्रलेख मागे घेताना, त्यांच्यावतीने माफी मागताना 'त्या' लाचार संपादकाला (नाव घेण्याचाही लायकीचे नाहीत ) कळविण्याचे सौजन्यही मालक दाखवत नाहीत. थेट माफीनामा वृत्तपत्रात प्रसिद्ध केला जातो, वेबसाइटवरून अग्रलेख काढण्यात येतो, यापेक्षा शरमेची बाब ती काय?
दुर्दैव म्हणजे हेच वृत्तपत्र दरवर्षी पत्रकारितेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना 'Excellence in Journalisam' च्या नावाखाली पुरस्कार खिरापतीसारखे वाटतात, त्यासाठी नियमबाह्य काम करणाऱ्या, सरकारी महसूल बुडवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती घेतात व त्यातूनही कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
लाचार संपादकाने घेतला 'स्प्राऊट्स'चा धसका
पाश्यात्य वृत्तपत्रांतील उत्कृष्ट लेखांचे जसेच्या तसे तितक्याच उत्कृष्टपणे मराठीत अनुवाद करणे व ते स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणारे, लपूनछपून होलसेलमध्ये दुकानदारी करणारे, 'उचल्या'कार संपादक मात्र यंदा कुठल्याही 'दिवाळी भेट' कार्यक्रमात उपस्थित नव्हते. 'स्प्राऊट्स'च्या बातमीचा त्यांनी फारच धसका घेतलेला आहे. साधे पोस्टाने किंवा कुरिअरने आलेले 'पाकिट'ही हातात घ्यायला, ते सध्या घाबरतात. असो कालाय तस्मै नमः !
'स्प्राऊट्स'च्या लढ्यात सहभागी व्हा!
वाचकांनो 'स्प्राऊट्स'च्या या जनजागृती लढ्यात तुम्हीही सामील व्हा, या विशेष बातम्या योग्य वाटल्यास तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा. लोकायुक्तांकडे तक्रार करा. एखाद्या भ्रष्टाचाराची माहिती आढळल्यास ९३२२ ७५५ ०९८ या मोबाईल नंबरवर व्हॉटस अॅप करा, आम्ही त्या बातमीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, हे विनम्रपणे सांगू इच्छितो.
- Unmesh Gujarathi
- Editor in Chief
- sproutsnews.com
- epaper.sproutsnews.com
- businessnews1.com
- twitter.com/unmeshgujarathi
- https://www.linkedin.com/in/unmesh-gujarathi-4125481a/
Call: 9322 755098
0 टिप्पण्या