Top Post Ad

लोकसभेवर विजय मिळवण्यासाठी मोदी सरकार-भाजपाचे आधूनिक प्रचार तंत्र....


 आगामी लोकसभा निवडणूकांच्यादृष्टीने देशातील मोठमोठी राज्ये काहीही करून जिंकता यावी याकरिता केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांवर आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यानंतर भाजपासोबत येण्यासाठी बाध्य करायचे आणि एकदा ते सोबत आले की तपास यंत्रणांचा ससेमिराही शांत.  राजकिय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सातत्याने होत आहे. मात्र या चर्चांना भाजपाने पूर्णविराम दिला ना कधी केंद्रीय तपास यंत्रणांनी. त्यातच आता  सरकारी योजना आणि सरकारी मालमत्तांचा वापर नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाच्या प्रचारासाठी होत असल्याचे दिसत आहे.  आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदी थ्री डी प्रतिमेसोबत सेल्फी पॉंईट तयार करण्यात आले असून हे सर्व जनतेच्या पैशातून रेल्वे स्थानकात उभारण्यात येत असल्याचे RTI कायद्यांतर्गत माहिती मिळत आहे.  यासंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एक्स वर ट्विट करत सवाल उपस्थित केला.

आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाने लोकसभेत काहीही करून ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करत आहेत. तसेच महाराष्ट्रात भाजपामय बनविण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्यासाठी मुंबई डिव्हीजन, नागपूर डिव्हीजन, भुसावळ डिव्हीजन, सोलापूर डिव्हिजन, पुणे डिव्हीजनच्या अखत्यारीत ५० मुख्य रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा फोटो काढण्याची हौस फिटावी यासाठी मोठ्या रेल्वे स्थानकांवर ३ डी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा ३ डी फोटो लावत त्यासोबत सेल्फी पॉंईट तयार करण्यात आला आहे. यातील काही रेल्वे स्थानकांवर हे ३ डी सेल्फी पॉंईट तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात येणार आहेत. तर काही ३ डी सेल्फी पाँईट हे कायमस्वरूपी उभारण्यात येणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांचा फोटो या सर्व रेल्वे स्थानकांवर उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन विभागाकडून महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या ३ डी सेल्फी पाँइटच्या उभारणीसाठी १.२५ लाख रूपये आणि तर ज्या ठिकाणी कायमस्वरूपी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६ लाख २५ हजार रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने माहिती अधिकारातंर्गत दिली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे जमा होणाऱ्या सर्वसामान्याच्या खिशातून जमा होणारे पैसे आणि करदात्या देशवासियांकडून भरण्यात येणाऱ्या करातून हा पैसा खर्च करण्यात येणार असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.

तसेच महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात  भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यत पोहोचावी या दृष्टीने केंद्र शासनाने "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहीम दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते दि. २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत सुरु करण्यात आली आहे. या यात्रेकरिता शासकीय यंत्रणेचा पुर्ण वापर करण्यात येत असून या यात्रेकरिता लागणारा निधी देखील शासनाच्या तिजोरीतूनच खर्च होत आहे.  मात्र या यात्रेच्या बॅनरवर मोदी सरकार असं लिहिल्या गेलं असल्याने लोकांमध्ये रोष असलेला पहावयास मिळत आहे.  प्रत्यक्षात भारत सरकारच्या योजनांची माहिती देण्याच्या नावाखाली भाजपचा प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार होत असल्याची चर्चा आता लोकांमध्ये होऊ लागली आहे. 

हे इव्हेन्ट सरकार आहे कोणत्याही गोष्टीचा इव्हेन्ट करायचा आणि लोकांमध्ये आपला प्रचार प्रसार करायचा ही निती या सरकारने मागील दहा वर्षापासून अवलंबली आहे. यासाठी प्रचार माध्यमांवर अब्जो रुपयांची खैरात वाटण्यात आली असल्याचे मागील दहा वर्षापासून दिसत असून आता भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असे म्हणत खुल्या पद्धतीने आपला प्रचार करण्यापर्यंत ही मजल गेल्याने लोकांमध्ये याबाबत रोष निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नुकतीच कोल्हापूर येथील एका तरुणााचा व्हीडीओ सर्वत्र व्हायरल झाला असल्याने याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या ठिकाणी ही यात्रा आली असता राजवैभव शोभा रामचंद्र या तरुणाने या यात्रेसोबत आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. या योजनेद्वारे सरकारच्या योजनांची माहिती दिली जात असेल तर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असा बॅनरवर उल्लेख का करण्यात आला असा प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांची पाचावर धारण झाली असल्याचे पहायला मिळाले. या घटनेनंतर नाशिकसह अनेक ठिकाणी या संकल्प यात्रेला गावकऱ्यांनी हुसकावून लावल्याचे चित्र दिसत आहे. पैसा जनतेचा प्रचार नरेंद्र मोदी-भाजपचा हे कसं काय असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com