ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग, परिमंडळ यांनी ही कारवाई केली आहे. दिवा प्रभाग समितीमध्ये एम. एस. कम्पाऊंड येथे तीन मजली बांधकाम पूर्णत: पाडण्यात आले. तसेच, दुसऱ्या बांधकामाचे प्लिंथ, २५०० चौ. फूटांचे बांधकाम, २५ कॉलम तोडण्यात आले. त्याशिवाय, दोन मजल्याचे आरसीसी बांधकाम, ४० कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तोडण्यात आले. दोन पोकलेन, तीन जेसीबी, ५० कामगार, ४० पोलीस कर्मचारी व आरक्षक यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
दिवा पूर्व येथे मुंब्रा देवी कॉलनी येथे २२ कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तसेच, फाउंडेशनची दोन बांधकामे पूर्णपणे काढण्यात आली. एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार आणि ३० पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कळवा प्रभाग समितीत समर्थमठाजवळील ३५ खोल्यांचे बांधकाम एक पोकलेन, दोन जेसीबी, ४० कामगार, ३० पोलीस यांच्या सहाय्याने पाडण्यात आले. तर, विटावा येथे प्लिंथचे बांधकाम काढण्यात आले. तेथे एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार, ३० पोलीस कार्यरत होते. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत बाळकूम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेले सहा मजल्याच्या आरसीसी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचे बांधकाम काढण्यात आले. त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर, एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार आणि ३० पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात अशापद्धतीने नियोजनबद्ध धडक कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे.
0 टिप्पण्या