Top Post Ad

भांडवलशाहीत मेलेलं... माणसांचं माणूसपण

 

 कथितरित्या वर्ष-२०२० पासून अदानी ग्रुप कंपनीच्या संपूर्ण मालकीची असलेल्या (जी बाब, 'गोदी-मिडीया'तून सांगितली जाणे नाहीच) 'नवयुग इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनी'ने अतिशय ठिसूळ स्वरुपाच्या हिमालयात...हिंदुंची चार पवित्रस्थळे एकत्र सांधणारा असा, सार्वकालिक रस्ता बनवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.१३४ च्या यमुनोत्रीच्या बाजुला...पर्यावरणतज्ज्ञांचे गंभीर इशारे बेधडक डावलून मोठा बोगदा खणायला घेतला आणि आजमितीस ४१ कामगार,  १६ दिवस, तो बोगदाच ढासळल्यामुळे त्यात अडकून पडले...या मानवनिर्मित दुर्घटनेतून दृग्गोचर होणाऱ्या, "मनुष्यप्राणी (दोन पायांचा पशू) ते नरपशू"...अशा संवेदनांच्या बधिरीकरणाच्या प्रवासाबद्दल बोलू काही...!!!

आधुनिक भांडवली-व्यवस्थेतील समाजामध्ये बदमाषी, संवेदनशून्यता, नीच-अधमपणा व आत्यंतिक स्वार्थीवृत्ती...ही प्रथम 'कार्पोरेटीय-क्षेत्रा'त उगम पावते आणि मगच, ती 'मैली-गंगा'...'गंगोत्री ते गंगासागर' अशी खाली वहात, खोलवर झिरपत झिरपत, समाजात सर्वत्र फैलावत-पसरत जाते"! जिथे, 'प्रोफेशन इज ॲबसेन्स ऑफ इमोशन', असं संवेदनशून्य, निर्दय प्रशिक्षण सर्रास दिलं जातं...ते 'काॅर्पोरेटीय-क्षेत्र'च, याला मुळातून जबाबदार आहे, हे आम्हाला कधि आकळणार? की, जाणिवपूर्वक आम्ही 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी', अशी स्वतःचीच फसवणूक व अशा फसवणुकीतून आपलं 'अपराधीत्व' नाकारणारी, ढोंगी-बेगडी भूमिका घेत रहाणार??

"भांडवलदारांना, नसते कुठली 'निती' (Ethics), ना पिढ्यापिढ्यांच्या भविष्याचा विचार, ना कुठला 'धर्म', ना कुठला 'देश'...त्यांना दिसत असतो फक्त नफ्याचा 'धनादेश'! त्यांच्या मनात असतो फक्त आपल्या कारकिर्दीच्या (Career) यशस्वितेचा तोकडा विचार व आपल्या कंपन्या-उद्योगधंद्यांचा उघडानागडा-विकृत स्वार्थ, राक्षसी नफ्याचा हव्यास आणि त्यामागे दडलेला सैतानी 'अभिनिवेश'!" अमुक एक उद्योग, एखाद्या सिईओ (CEO) अथवा एमडीने (MD), अनेक कामगार-कर्मचार्‍यांच्या संसारांचा सारीपाट उधळून लावत पुन्हा नफाक्षम कसा बनवला...कसा अमुक एका कंपनीचा नफ्याचा आलेख हृदयशून्य 'कंत्राटी-कामगार पद्धत' (गुलामगिरी + नव-अस्पृश्यता'स्वरुप असलेली) निर्घृणपणे लादून कसा प्रचंड वाढवला आणि ती लादताना, मनगटशहा असलेल्या गुंडपुंड राजकारण्यांची व आरपार भ्रष्ट असलेल्या बड्या आयपीएस (IPS) पोलिस-अधिकार्‍यांची मदत घेऊन युनियन्स चिरडून टाकत, ते कसं साध्य केलं...याचेच जर धडे, मॅनेजमेंट-इन्स्टिट्यूटमधून दिले जात असतील वा व्यवस्थापकीय-मंडळींकडून असले क्रूर, माणुसकीशून्य किस्से चवीने व अभिमानाने चघळले जात असतील; तर तुम्ही वेगळा कुठला समाज घडवणार आहात? 

भांडवलशाहीत, माणसांचं माणूसपण मरतं. भांडवली-व्यवस्थेत माणसांचं व निसर्ग-पर्यावरणाचं अतोनात 'दोहन आणि शोषण' होऊन उपभोग्य वस्तूंचा जरुर 'सुकाळ' होतो; पण, माणुसकीचा 'दुष्काळ' पडतो...निसर्ग-पर्यावरणीय महासंकटं, 'दत्त' म्हणत उभी ठाकतात व संपूर्ण सजीवसृष्टीसह अवघं मानवी-अस्तित्व, मोजक्या काही शतकातच मिटवू पहातात... हेच, त्या व्यवस्थेचं अंततः विनाशकारी वास्तव होय! भांडवली-व्यवस्थेचं सगळ्यात मोठं पातक, हे निव्वळ 'शोषण' करणं नसून (ते तर आहेच, पण नंतरचं आहे), सगळी 'मानवीमूल्यं'च समूळ नष्ट करणं, हे आहे! 

'बळी, तो कानपिळी', या जंगली असुरक्षित व अमानुष अवस्थेतून बाहेर येण्यासाठीच, द्विपाद मनुष्यप्राण्यांनी जंगलं तोडून गावं-शहरं-उपनगरं वसवली...उपजत बुद्धी असलेल्या समस्त मनुष्यप्राण्यांच्या 'आशाआकांक्षा' बर्‍यापैकी पूर्ण करण्यासाठी, "विज्ञान-तंत्रज्ञानाने शोध लावले, शास्त्रज्ञांचे गौरव करुन आपण त्यांना उत्तेजन दिलं आणि त्यातूनच, पुढे अर्थव्यवस्थांची उभारणी केली". पण, उत्पादन-संबंधांतील आपल्या 'मनुष्यपणाचा आलेख'...कायमच 'मालक-गुलाम (Masters & Slaves), सरंजामदार-भूदास (Lords & Serfs), अशा घसरत राहीलाय आणि अत्याधुनिक 'भांडवली-व्यवस्थे'त तर तो खाली खालीच घसरत घसरत...'मालक (किंवा व्यवस्थापक) आणि कामगार-कर्मचारी', अशा भावनाशून्य व क्रौर्यपूर्ण टिपेला पोहोचलाय!  ...याच अर्थाने, आपली कुशल आणि कुटील बुद्धी, येनकेनप्रकारेण फक्त आणि फक्त, आपल्या कंपनीच्या नफ्यासाठीच केवळ संकुचित दृष्टीने वापरणारे, "Managers of the companies are 'Damagers' of the societies" (अर्थातच, विशेषतः HR/IR वाले), असं म्हटलंच पाहीजे (भले मग तो, 'डॅमेजर' शब्द ऑक्सफर्ड-डिक्शनरीत नसेना का)!

या आपल्या भारत देशात, बुद्धिमंतांची बिलकूल कमतरता नाही...कमतरता फार मोठी आहे ती, "चांगली बुद्धी असणाऱ्यांची"...आम्ही सहजी चांद्रयान पाठवतो, मंगळयान पाठवतो...पण, आम्हाला आमच्याच माणसांपर्यंत पोहोचता येत नाही. मग ते उत्तराखंडच्या बोगद्यातले असोत नाहीतर, औद्योगिक-सेवा क्षेत्रातील असोत! आमच्याच देशातले करोडो-आत्मे, अन्याय-अत्याचार-शोषणाने विद्ध असतात, निरंतर आक्रंदन करत असतात...पण, सिगरेटच्या थोटकासारखी तोकडी असलेली आमची 'भावनिक-झेप', त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. ...शिवाय, नरेंद्र मोदी-भाजपा सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या काळात, आम्ही आता खऱ्याअर्थाने 'आध्यात्मिक' राहीलोयच कुठे...आम्ही झालोयत फक्त 'विद्वेषी'! आमच्या अध्यात्माची झेप, आता फक्त राममंदिर-चारधामपर्यंतच सिमित आणि तिथेच समाप्त आणि विद्वेषीवृत्ती मात्र, देशभर विषवल्लीसारखी फैलावलेली!! 

घरी गणपती आणले, ढीगभर पूजा घातल्या, पोथ्यापुराणं वाचली, जपजाप्य केलं, पानोपानी रामनाम लिहीलं...की, बनलो आम्ही रातोरात बेगडी-बनावट आध्यात्मिक. सोबतीला चारधाम, शिर्डी-अष्टविनायक यात्रांची यातायात काय नी काय काय...वाटेल तेवढी धडपड पायपीट व खिशाला न झेपणारा वेडावाकडा खर्च करुन आम्ही देवदर्शनाला जातो (हल्ली तो खर्च, भ्रष्टाचारातून अफाट माया जमा केलेले बेरकी राजकारणी करतात)...पण, "तिर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी", असं रोखठोक बजावणारा व तत्कालीन 'व्यवस्थेविरोधा'त एल्गार पुकारणारा संत तुकाराम, आमच्या कानीकपाळी हे ओरडून-गर्जून सांगतोय...पण, आमची बधीर मनं, आमचे बहिरे कान ऐकायला कुठे तयार आहेत?  त्यातूनच, "मला काय त्याचं", ही संवेदनशून्य बेफिकिरी व बेपर्वाई समाजात बेफाम वाढत चाललीय. त्याचं कारणही तसं खास आहे...सध्या भारतात-महाराष्ट्रात, 'काॅर्पोरेटीय-आशिर्वादा'ने (म्हणजेच, भांडवली पैशांच्या थैल्यांनी) तथाकथित आध्यात्मिक संत, बाबाजी आणि सद्गुरु वगैरे विविध संप्रदायवाल्या बनेल-ढोंगी मंडळींचा सुळसुळाट झालाय. तेच देशातील 'रक्तपिपासू-शोषक' व्यवस्थेचे (Vampire-State System) खरेखुरे 'आधारस्तंभ' आहेत...तेच, अन्याय व शोषणग्रस्त जनतेला मूर्ख बनवत 'षंढ आणि थंड' करण्यात प्रमुख भूमिका बजावत असतात. एवढं अवतीभवती अघटित घडत असताना, एकातरी पंथबाज-ढोंगी 'सरकारी-संत' मंडळींच्या तोंडून पिडीतांविषयी कणवेचा, 'व्यवस्था-विरोधा'चा एखादा शब्द तरी बाहेर पडतोय का? मग, त्यांच्याकडून संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांसारखी 'व्यवस्था-विरोधा'ची अपेक्षित ज्वलंत-जाज्वल्य आध्यात्मिक-कृति, तर खूपच दूर राहिली हो...

या आधुनिक भांडवली-व्यवस्थेत समाजातला सगळाच बुद्धिमान, उच्चपदस्थ व व्यावसायिक-यशस्विता पदरी बांधणारा 'अभिजनवर्ग' एकमेकाशी संधान बांधून (Coalition Of Connected) समाजपुरुषाचं 'शोषण' करत मजेत-चैनीत जगत असतो. ते तसं जगू शकतात, याचं प्रमुख कारण आपण मध्यमवर्गीय व तळागाळातले लोक, डोळे उघडे ठेऊन झोपलेलो आहोत...आपल्या संवेदनांनी, आपल्या मनाच्या-हृदयाच्या सांदीकोपर्‍यातून केव्हाचाच काढता पाय घेतलाय. आम्ही फक्त आता, 'अस्तित्ववादी' बनलोत...आम्हाला आजचा दिवस जमेल त्या मौजमजेत, पोटात-ओठात नशा चढवणारं काही ढकलून कसाही व गरज भासल्यास कुणाचाही बळी देऊन...पुढे ढकलायचाय, बस्स! गेल्या दहा वर्षांत, हे तर आम्ही अगदी ठासून गिरवून ठेवलंय, आमच्या दगड बनलेल्या हृदयावर...त्यातून, सध्या देशात 'अमृतकाळ' सुरु आहे, मग काय विचारता?

 या भारतदेशाचा, "बुद्ध्यांक वाढतोय...पण, भावनांक घसरतोय! बुद्ध्यांक वाढतोय...पण, अध्यात्म्यांक (Spirutual Quotient) आचके देतोय!!" ...तरीही, या देशात 'हिंदुत्वा'च्या ढोलगजरात व तारस्वरात, हे सगळं आक्रित, सुरुच आहे!

"जें खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रति वाढो ll
भूता परस्परे जडों l मैत्र जीवांचे ll
दुरितांचे तिमिर जावों l विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ll
जो जे वांछिल तो ते लाहो l प्राणिजात ll" 

...असं वैश्विक-कल्याणाचं 'पसायदान' मागणारे संत ज्ञानेश्वर, 'जय जगत' अशी उद्घोषणा करणारे म. गांधींचे प्रथम अनुयायी प. पू. विनोबा भावे... यांनी मांडलेली मानवता व भूतदयावादी 'भारतीय-अध्यात्मा'ची चूल लाथाडणारं, हिंदुत्वाच्या (शिवबा-संतांचं हिंदुत्व), महान-तत्त्वांना साफ हरताळ फासणारं...संघ-भाजपावाल्यांचं बोगस व उफराटं हिंदुत्व, आज देशभर थैमान घालत असेल...तर, अजून वेगळं काय घडणार? 

युरोप, ही 'वसातवाद व भांडवलशाही'तलं क्रौर्य, तसेच अमानुष शोषण निर्माण व जगभर प्रसारण करणारी जगाच्या नकाशावरील 'पातकी-भूमि' असेल; तर गुजराथ, ही त्याच अर्थाने, संपूर्ण भारतातली 'पातकी-भूमि' होय {म. गांधी, हे त्या पातकी चिखलात-दलदलीत कमळासारखं (भाजपाचं कारस्थानी-मळलेलं 'कमळ' नव्हे) फुललेलं आणि ती पातकं, एकांड्या शिलेदारासारखं आपल्या खांद्यावर पेललेलं, एक अगाध व्यक्तित्व होय!}...मग, दिल्लीश्वर 'गुजराथी-लाॅबी' कुठल्या लायकीच्या, कुठल्या प्रकारच्या आध्यात्मिक-स्तरावरची असेल, ते तुमचं तुम्हीच ठरवा!

हिमालय म्हणजे, राकट-कणखर सह्याद्री नव्हे...पर्यावरणतज्ज्ञ गंभीर इशारे सातत्याने देत असताना, देवभूमीत एकापाठोपाठ एक अनेक अशा मानवनिर्मित आपदा कोसळत असताना...ठिसूळ हिमालयात वेडेवाकडे बोगदे ठोकताय? मरणारे मरतात आणि ते नेमके असतात तळागाळातले कामगार. ते गाडले गेले काय किंवा भिंतीत चिणले गेले काय, व्यवस्थेतल्या कुणाला काय फरक पडतो? काही शेकड्यांनी केमिकल कंपन्यांमधील स्फोटात, काही खाणीतल्या स्फोटात, तर काही भूमिगत गटारातल्या विषारी वायूत गुदमरुन मरतात...नाहीतर, चिल्ल्यापिल्ल्यांसह तुटपुंज्या आवकीत महाग होत चाललेल्या शहरात संसाराचा गाडा हाकता येत नाही म्हणून आत्महत्या करतात...पण, 'व्यवस्थेची शिकार' असलेल्या, या दुर्दैवी जीवांकडे बघायला तरी कुणाला वेळ आहे काय? सगळ्यांना एकच वेड लागलंय...बस्, कुछ भी करके कमाते जाओ, मौजमस्ती करते जाओ और ऐसा करते करते, हो सके तो, 'कर लो दुनिया मुठ्ठी में'! 

...याच दृष्टीकोनातून पहाता, भांडवलशाही-व्यवस्था (Capitalism), ही दारु आणि अंमली (ड्रग्ज्) पदार्थांसारखी विलक्षण 'झिंग' पैदा करणारी चीज होय. एकवेळ, दारु-सिगरेट-अंमली पदार्थांचं व्यसन सुटेल; पण, 'भांडवली-व्यवस्थे'तल्या चैनबाजी, ऐशोआराम, सुखसंसाधनांचं जडलेलं व्यसन सुटणं मोठं कर्मकठीण. व्यक्तिगत व्यसन, हा एखाद्या व्यक्तीला किंवा फारतर, त्या संबंधित व्यक्तिच्या कुटुंबाला बरबाद करेल...पण, हे 'भांडवली-व्यवस्थे'चं व्यसन, एवढं खतरनाक व व्यापक आहे की, संपूर्ण पृथ्वीतलावरच्या सजीवसृष्टीचा सर्वनाश घडवून आणण्याची राक्षसी अंगभूत क्षमता, त्यात आहे आणि त्यातून, संपूर्ण कडेलोट होईपर्यंत, त्या 'व्यसना'तून बाहेर पडण्यासाठी, त्याविरोधात 'वैश्विक-मतैक्य' तयार होणं (ज्यावाचून, दुसरा कुठलाही पर्याय नाहीच), फारच कर्मकठीण...हाच सर्वात भांडवली-व्यवस्थेतला मोठा धोका आहे! 

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com