मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय माणसाची किंवा एखाद्या समूहाची प्रगती होणार नाही. नाहीतर प्रगती खुंटलीच म्हणून समजा’ असे स्पष्ट मत मराठा आरक्षणाकरिता उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले. जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोनदा 26 दिवस आंदोलन केले. त्यातील दुसरे नऊ दिवसांचे उपोषण अन्न आणि पाण्याविना करण्यात आले. सगळ्यांचे मनोज जरांगे-पाटील हे गळ्यातले ताईत झाले. त्यांच्या संदर्भातील अनेक लेख, ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण बेमुदत उपोषण स्थगित केले असले तरीही आताही आंदोलन चालू आहे. आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असे कृत्य करायचे नाही”, असे आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केले. ‘डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचे आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. शेतीतले कामे करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे’, असेही मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचे आहे. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे,’ असेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या