Top Post Ad

प्रधानमंत्र्यांच्या उद्घाटनाशिवायच धावणार नवी मुंबईची मेट्रो


   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन व्हावं, अशी राज्य सरकारची इच्छा होती. मात्र मागच्या १० महिन्यांपासून प्रधानमंत्र्यांची तारीख निश्चित होत नसल्याने अखेर उद्यापासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये सुरु करण्यात येत आहे. नवी मुंबई मेट्रोचा प्रोजेक्ट मागच्या तेरा वर्षांपासून रखडला होता. कसाबसा प्रोजेक्ट पूर्ण झाला परंतु उद्घाटनाअभावी दहा महिने प्रवाशी ताटकळले. अखेर उद्यापासून नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावेल. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या मार्गांवर ११ स्टेशन्स असतील. शेवटी बेलापूरपर्यंत प्रवाशांना प्रवास करता येईल. बेलापूर लोकल स्टेनशवरुन पुढे प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करता येणार आहे.  नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. १ वर शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबर पासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ही मेट्रो सेवा दिनांक १७ नोव्हेंबर  रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी ३ वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री १० वाजता असणार आहे. तर दिनांक १८ नोव्हेंबर पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १० वाजता होणार आहे. सदर मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे अंतरानुसार ० ते २ किमीच्या टप्प्याकरिता रु. १०, २ ते ४ किमीकरिता रु. १५, ४ ते ६ किमीकरिता रु. २०, ६ ते ८ किमीकरिता रु. २५, ८ ते १० किमीकरिता रु. ३० आणि १० किमीपुढील अंतराकरिता रु. ४०. असणार आहेत.

 नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या ११.१० किमी लांबीच्या मार्ग क्र. १ चे काम हाती घेण्यात आले होते. सदर मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे. मार्ग क्र. १ ची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून सिडकोतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या व त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. तद्नंतर मेट्रोच्या वाणिज्यिक परिचालनाकरिता सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र. १ वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असून १७ नोव्हेंबर २०२३ पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.सर्व नवी मुंबईकरांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी नवी मुंबई मेट्रोच्या या वातानुकूलित, आरामदायी व निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेऊन परवडणाऱ्या दरात सुखकर प्रवास करावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे. 

“बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो १७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. याबद्दल नवी मुंबईकरांचे हार्दिक अभिनंदन. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे, याबद्दल सिडकोचे अभिनंदन आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा. मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मेट्रोच्या अंमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे.”– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

“१७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे.”- अनिल डिग्गीकर (उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको)


 मुंबई तील बेलापूर ते पेंघर दरम्यान गेल्या पाच महिन्यापासून तयार झालेला मेट्रो मार्ग उद्यापासून सुरू होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबईकरांच्या वतीने खासदार राजन विचारे यांनीआभार मानले आहे 

कारण या तयार झालेल्या मेट्रो मार्गातील अकरा स्थानकातील प्रवाशांना वेठीस धरण्यात आले होते मेट्रो मार्गाचे काम सन 2012-13 मध्ये सुरू करण्यात आले होते परंतु सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू होते याला आज 11 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च कोट्यावधीनी वाढला होता यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता

या उद्घाटनासाठी आपण येणार यासाठी सिडको प्रशासनाने आपल्या उपस्थितीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते परंतु आपण कामांमध्ये अति व्यस्त असल्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही परंतु आपण हा मेट्रो मार्ग सुरू करण्याचा जो निर्णय दिवाळीनंतर का ना होईना घेतल्याने आपले आभार मानले आहे

याच धर्तीवर  ऐरोली -कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी रेल्वे प्रकल्पातील गेल्या सात महिन्यापासून तयार झालेले दिघा गाव रेल्वे स्थानक ही आपण सुरू प्रवाशांसाठी खुले करावे  कामानिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गांना त्यामुळे दिलासा मिळू शकेल तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल यासंदर्भात रेल्वे मंत्री व राज्यमंत्री यांना तीन ते चार वेळा स्मरणपत्र देण्यात आलेली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com