दिवाळीच्या काळात मोठ्या आवाजांच्या फटाक्यावर न्यायालयाने अंशत: बंदी घातल्याने राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटत आहेत. मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यातील वाद उफाळून आला असून वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका टिप्पणी सुरु असल्याचे दिसून येत होते. रामदास कदम यांनी पहिल्यांदा मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला तर मुलगा सिद्धेश कदम लढवेल, असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता. यानंतर रामदास कदम यांनी देखील माध्यमांसोबत बोलताना कीर्तिकर यांच्यावर देखील वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गजानन कीर्तिकर हे रामदास कदम यांच्या समर्थनाची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामदास कदम हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. गजानन कीर्तिकर यांनी उशिरानं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. रामदास कदम यांनी मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांचा मुद्दा मांडल्यानं गजानन कीर्तिकर संतापले. गजानन कीर्तिकर हे तिथले विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीची अद्यापही घोषणा झाली नसली तरी मुंबई पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरुन सुरु झालेल्या वादाचा भडका उडाला असल्याचे मुंबईकरांना पहायला मिळत आहे.
खासदार गजाभाऊ कीर्तिकर यांचे आता वय झाले आहे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कदाचित गजाभाऊ कीर्तिकर उभे राहिले नाहीत तर या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील, असं मोठे वक्तव्य शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली दौऱ्यावर असताना केलं आहे. मुंबई गोरेगाव येथे वास्तव्य असलेले विद्यमान खासदार गजाभाऊ कीर्तिकर हे येथून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी खासदार म्हणून निवडून आले होते. स्थानीय लोकाधिकार समिती पासून अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. एकेकाळचे बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा या सगळ्या परिसरात मोठा जनसंपर्क आहे.
सिद्धेश कदम या गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत हे आपणदेखील माध्यमांमधून ऐकतो आहे. गजानन कीर्तिकर हे जर का उभे राहिले नाहीत तर या लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम उमेदवारी मागतील आणि तो आपला हक्क आणि अधिकार आहे पण गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले तर सिद्धेश कदम उभे राहणार नाहीत असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे गटाकडून अमोल किर्तिकर याच मतदारसंघातून उमेदवार असतील असेही आपण ऐकतो आहे.यामुळे बाप आणि बेटा यांच्यामध्येही या मतदारसंघात सामना होत असेल तर होऊन जाऊ दे असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
या वादामुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. गजानन कीर्तिकर यांनी प्रेसनोटमधून गद्दार असा उल्लेख करत आरोप केल्यानंतर संतप्त झालेल्या रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर कदम म्हणाले की, गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये दिवाळीत फटाके फुटत होते. दिवाळीमध्ये शिमगादेखील लोकांना पाहायला मिळाला. तो भविष्यात दोघांकडून होता कामा नये. कीर्तिकर काल मुख्यमंत्र्यांना भेटून आले. त्यांची भूमिका सांगितली. मी मुख्यमंत्र्याना सांगितलं की, भविष्यात आपापसात वाद झाले तर ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी वैयक्तिक आरोप करणं कितपत योग्य आहे असं विचारलं असता रामदास कदम म्हणाले की, मी कीर्तिकर यांच्याबाबत जी विधानं केली ती अगदी योग्य होती, असं मला वाटतं. कारण कीर्तिकर यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा शिक्का आहे. असे बोलणं योग्य आहे का? पक्षासाठी मी कफन बांधून लढलोय. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. कुठलीही शाहनिशा न करता मला राजकारणातून संपवण्याकरता एखादी प्रेसनोट काढणं हे कितपण योग्य आहे. असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला.
या प्रेसनोटमध्ये गजानन कीर्तिकर यांनी लिहिलंय की ३३ वर्षांपूर्वी मी त्यांना कांदिवलीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण कांदिवलीला शाखाप्रमुख म्हणून मी जे काम केलं होतं, त्या जोरावर गजानन कीर्तिकर निवडून आले होते. आता एवढ्या वर्षांनंतर कीर्तिकरांना मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण झाली का, आपण एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे असेही कदम यांनी यावेळी सांगितले. आता भविष्यात असं काही बोलायचं नाही. जर काही प्रश्न असतील तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडायचे असे निश्चित झाले आहे, असेही रामदास कदम म्हणाले.
0 टिप्पण्या