Top Post Ad

 ‘शाळा बंद करणार नाही, शाळांचे एकत्रीकरण करणार’ असे सांगून शिक्षण आयुक्तांनी २० पटसंख्येपेक्षा कमी जिल्हा परिषद शाळा एकत्रित करून समूह शाळा तयार करण्याचे प्रस्ताव राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवले आहेत. वाडी वस्तीवरील कमी पटाच्या शाळा बंद करून करून मध्यवर्ती ठिकाणी या शाळांचे एकत्रीकरण करणार असल्याने ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील २,०५३ जिल्हा परिषद शाळांना घरघर लागणार असून तब्बल अडीच हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

समूह शाळेपासून ४० मिनिटांचा बस प्रवास म्हणजे साधारणतः १० ते १५ किलोमीटर अंतरावरील कमी पटाच्या शाळांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली खेड्यातील शाळा बंद करण्याचा घाट असल्याचे शिक्षणतज्ज्ञ व पालकांचे मत आहे. आजही आदिवासी वस्तीवर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत घेऊन यावे लागते. ही परिस्थिती असताना १० ते १५ किलोमीटर दूरवर बस प्रवास करून ही मुले प्राथमिक शिक्षणासाठी जातील का? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य होण्याचा धोका आहे.

मोफत व सक्तीचा अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाला त्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण व तीन किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा आहे. त्यामुळे समूह शाळा हा प्रकल्प केंद्राच्या या कायद्याला फाटा देणार आहे. ग्रामीण भागामध्ये स्वस्त आणि सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेल्या एसटी बंद होण्याच्या मार्गावर असतानाच ग्रामीण शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यास गरीब पालकांची ससेहोलपट होऊन ग्रामीण परिसरातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाण्याची शक्यता शिक्षक व्यक्त करत आहेत. त्यातून समूह शाळेमुळे ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शिक्षकांच्या नोकरीवर संक्रात येण्याची भीती संघटनांमधून व्यक्त केली जात आहे.

समूह शाळा प्रकल्पाने शेकडो मराठी शाळा बंद होऊन गोरगरिबांना गावातल्या गावात उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या संधी नाकारल्या जातील. त्याचबरोबर शेकडो सरकारी नोकरीच्या संधी कायमच्या लोप पावतील. गोरगरिबांचे शिक्षण व नोकऱ्यांच्या खासगीकरणाचे हे षडयंत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कदापी यशस्वी होऊ देणार नाही, प्रसंगी राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.-किशोर मधुकर पाटील, चिटणीस, राज्य कार्यालयीन (मंत्रालयीन), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

अंदाजे अतिरिक्त ठरणारे शिक्षक

ठाणे-५४६

पालघर-१५४

रायगड-१६१८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com