Top Post Ad

उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत मैदानी खेळाच्या सुविधा... सुमारे १ कोटी पाच लाख रुपयांचा खर्च


 ओपन जीमच्या अभूतपुर्व यशानंतर आता ठाणे महानगर पालिकेच्या वतीने उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत मैदानी खेळाच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. याकरिता तब्बल १ कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. 

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये झपाट्याने विकसीत होणाऱ्या महापालिकांमध्ये ठाणे महापालिकेचा आग्रक्रम आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ १२८.२३ चौ. किमी इतके विस्तीर्ण असून शहरात ३७७ किमी लांबीचे रस्ते आणि पदपथ बांधण्यात आले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. एकात्मिक शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहराच्या सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा महापालिका, सरकारी, खासगी मालकीच्या जागांच्या संरक्षण भिंतीवर थ्रीडी पेंटिंगच्या सहाय्याने प्रबोधनात्मक नागर, सामाजिक संदेश देऊन परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

 मोकळ्या जागांमध्ये शोभिवंत झाडे, रोपटी लावून हिरवळ वाढवण्यात येत आहे. याशिवाय शहरात आकर्षक विद्युतीकरणही केल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका जंक्शन, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि गोल्डन डाईज जंक्शन येथील उड्डाणपुलांची कामे पहिल्या टप्प्यात झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात या उड्डाणपुलाखाली मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नितीन आणि कॅडबरी कंपनी जंक्शन या भागात यापूर्वी जाहिरत विभागाच्यावतीने नागरिकांना उद्यान विकसीत करून दिले आहे.

यापुढील प्रकल्प म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील नितीन जंक्शन ते कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेमध्ये नागरिकांसाठी मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध करणे. नवी मुंबई महापालिका हद्दीतील सानपाडा उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेमध्ये महापालिकेकडून विविध मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उड्डाणपुलाखालच्या जागेत ठाणेकरांना बॅडमिंटन, टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग सारख्या मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी सुमारे १ कोटी पाच लाख रुपयांचा खर्च होणार असून ठाणे महापालिका आयुक्तांनी नुकतीच या खर्चाला मंजुरी दिल्यामुळे ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

स्केटींग रिंग तयार करण्यासाठी सोलिंग, पी.सी.सी करून त्यावर सिंथेटिक अक्रॅलिक कोटिंग करणे, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल कोर्टसाठी पोल्स, जाळी बसवणे, स्केटिंग रिंगसाठी संरक्षण भिंत बाधणे, कोर्ट सभोवताली चेन लिंक फेन्सिंग, ४.५० मी. उंचीचे जाळी बसविणे ही कामे केली जाणार आहे. लगतच्या पदपथांची दुरुस्ती, नूतनीकरण, रंगरंगोटी, थ्रीडी पेंटिंगच्या सहाय्याने रंगरंगोटी अशी कामे केली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ८९ लाख ३७ हजार ५०० रुपये खर्च येणार असून १६ लाख ७ हजार ७५० रुपये जीएसटी असा एकूण १ कोटी ५ लाख ९० हजार ९३८ रुपयांचा खर्च येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com