Top Post Ad

‘राष्ट्रपिता’ ‘महात्मा’

 महात्मा गांधीबद्दल खरा इतिहास सांगण्याऐवजी अलीकडे जाणून बुजून अफवा पसरवण्यात येत आहेत. नवीन पिढी आणि काही प्रौढ वयाचे लोकही अभ्यासाशिवाय पसरवलेल्या (समाजमाध्यमांतून ‘फॉरवर्ड’ होणाऱ्या) अफवा खऱ्या मानू लागल्याचे लक्षात येते. अशा भाबड्या लोकांसाठी (सत्य) आहे तेच सांगायचे असल्याने हा लेख काही अभ्यासू वाचकांना ढोबळ- साधारण वाटण्याची शक्यता गृहीत आहे, त्याला इलाज नाही.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. ४ जून १९४४ रोजी सिंगापूर रेडिओवरील प्रक्षेपणात बोस यांनी गांधींचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ असा केला. गांधीजींच्या आदर्शवाद आणि मजबूत व्यक्तिमत्त्वामुळे भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. नंतर ६ जुलै १९४४ रोजी रेडिओ रंगूनवर संदेश प्रसारित करतानाही नेताजींनी गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सेने’त ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ नावाच्या बटालियन सुरू करून गांधी व नेहरू यांच्या कार्याचा गौरव केला होता. गांधींना ‘महात्मा’ या नावाने पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधले.

भारताच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे गांधी मानत. ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी आयुष्य पणास लावले. भारताबाहेरील अनेक व्यक्ती आणि अनेक देशांत त्यांचा प्रभाव होता, अजूनही आहे. गांधींनी मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही प्रभाव टाकला आणि परिणामी अमेरिकेत आफ्रिकन- अमेरिकनांना आता समान अधिकार आहेत, दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांनाच राज्यकारभारात स्थान देणारी व्यवस्था आता नामशेष झाली आहे. भारताचे स्वातंत्र्य शांततेने जिंकून गांधीजींनी जगभरातील इतिहासाचा मार्ग बदलला. भारतात दलितांना मानसन्मान मिळावा म्हणून अनेक दृष्टीकोन दिले, स्वत: स्वच्छतेला वाहून घेतले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील ते प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकतावादी होते. शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सलग तीन वर्षे त्यांच्या नावाचा विचार झाला होता पण इंग्रजांच्या विरोधामुळे त्यांना ते दिले गेले नाही. नंतर त्यांच्या काही शिष्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गांधीजींबद्दल जगप्रसिद्ध विचारवंत आईनस्टाईन म्हणतात, ‘महात्मा गांधीजींसारखा हाडामांसाचा असाही माणूस या पृथ्वीवर होऊन गेला, याचे येणाऱ्या पिढीला मोठे अप्रूप वाटेल. त्यांचा विश्वास बसणार नाही.’ (हा मनुष्य पंधराव्या शतकात जन्माला आला असता तर आज लोकांनी त्यांना देवाचा अवतार मानले असते.) गांधी यांची तुलना करायची झाली तर भगवान महावीर, गौतम बुद्ध अशा धर्मसंस्थापकांशी करावी लागेल. विसाव्या शतकात सामान्य माणसाप्रमाणे या भूतलावर वावरणारा हा महान मनुष्य ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला त्या लोकांना सुदैवी म्हणावे लागेल. गांधींच्या ‘माणुसकी’च्या महान शिकवणुकीमुळेच भारताच्या तत्कालीन नेत्यांची नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या पंतप्रधान पदाची धुरा गांधीवादी नेहरूंसारख्या प्रगल्भ व विज्ञाननिष्ठ नेत्याकडे गेली. म्हणून भारताची धर्मनिरपेक्ष लोकशाही भक्कम होत आजपर्यंत टिकून राहिली. पुढे लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी आदींनी भारताची निधर्मी प्रतिमा यशस्वीरित्या सांभाळली.

महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशा त्यावेळच्या अनेक नेत्यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. आपले सगळे खासगी जीवन (काहींनी खासगी मालमत्ताही) देशाला अर्पण केले होते. तत्कालीन काही मतभेद असले तरी त्यांनी व्देष पसरवला नाही. मतभेद देशहितासाठी होते हे एकमेकांना ज्ञात होते. गांधींसह भारतीय नेत्यांनी त्यांना स्वतंत्र पाकिस्तान न देता भारताचे पंतप्रधानपद दिले असते तरी पुढे लवकरच भारताचे अनेक तुकडे झाले असते. याचे कारण भारत- पाकिस्तान ब्रिटिशांपासून स्वतंत्र होऊन एक वर्षाच्या आत जिना वारले. त्यांच्या मृत्यूनंतर केवळ द्विराष्ट्रवाद नव्हे तर इथे अनेकराष्ट्रवाद फोफावला असता. उदा. त्यानंतरचे लाल डेंगा, सुभाष घेशींग (पूर्वोत्तर), भिद्रनवाले (खलिस्तानवादी) आदींचा उल्लेख करता येईल. अशा फुटीरतावादाला आपल्या देशात आजही थारा नाही, कारण गांधीजींच्या सर्वसमावेशकतेच्या तत्त्वावर आपली धर्मनिरपेक्ष राज्यघटना भक्कम उभी आहे. (याच कारणामुळे १९७१-७२ च्या युद्धात पाकिस्तान तोडूनही इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तान भारतात सामील न करता त्याला स्वतंत्र ‘बांगलादेश’ म्हणून मान्यता दिली.) या पार्श्वभूमीवर ‘अखंड भारत’ नावाची संकल्पना अतिशय तकलादू पायांवर उभी आहे.

ब्रिटिशांनी भारतातील पारंपरिक राजे व संस्थानिकांपुढे तीन पर्याय ठेवले होते. संस्थानिकांनी एकतर भारतात, पाकिस्तानात अथवा स्वतंत्र देश म्हणून रहायचे होते. याचा अर्थ गांधींच्या हातात अखंड भारत राखण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. संस्थानिकांशी व्यक्तिगत संपर्क साधून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेव्हा जास्तीतजास्त भाग (५६० संस्थाने) भारतात विलीन केली. (ब्रिटिश अंमल पूर्णपणे संपल्यानंतर सैन्य कारवाई करून काही स्वतंत्र संस्थाने विलीन करावी लागली.) यावेळी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भडकलेल्या क्रूर दंगली शांत करणे एवढेच महत्त्वपूर्ण काम महात्मा गांधींनी हाती घेतले होते. दंगली थांबाव्यात म्हणून गांधी उपोषण करत होते.

५५ कोटी ही रक्कम पाकिस्तानला इंग्रजांमुळे देणे भाग होते. भावांची वाटणी झाली की घरातली गंगाजळीचीही विभागणी होते, त्याप्रमाणे ही रक्कम द्यावीच लागणार होती, ते काम तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर चिंतामणराव (सी. डी.) देशमुख यांच्या कारकिर्दीत झाले (इतकेच काय पाकिस्तानच्या निर्मितीनंतर काही काळ पाकिस्तानचे चलन भारतात छापले जात होते. भारत स्वतंत्र होताच पाकिस्तानकडून काश्मीरवर पहिले आक्रमण होऊन प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेऊन गुंता करण्यामागेही ब्रिटिश होते. याचे कारण भारताच्या आणि पाकिस्तानच्या सैनिकांचे प्रमुख तोपर्यंत ब्रिटिश होते. भारत पाकिस्तानाचे व्यवस्थापन ब्रिटिश करत होते.) भारताचे शेवटचे व्हाइसराॅय लॉर्ड माउंटबॅटन हे स्वातंत्र्यानंतरही वर्षभर दोन्ही देशांवर दबाव आणत होते.

महात्मा गांधींचा मृत्यू ही एक खूप दुःखद घटना होती. ३० जानेवारी १९४८ ला संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास महात्मा गांधी नेहमीप्रमाणे ते राहत असलेल्या घराजवळच्या बागेत प्रार्थनेला गेले. तेव्हा परधर्मीय वेशभूषा केलेला नथुराम गोडसे नावाचा फॅसिस्ट- वंशाभिमानी मारेकरी गर्दीतून अचानक बाहेर आला आणि त्याने कपटाने महान हिंदू नेता महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या. गांधींनी ‘हे राम’ म्हणत प्राण सोडला.

भगवान महावीर आणि महात्मा गांधीजींच्या जीवन चरित्रातील थोडासा अंश जरी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडेल. आजचा हिंसाचार, संग्रह– साठेबाजी करण्याच्या, ओरबाडून घेण्याच्या, नफेखोर प्रवृत्तीमधून बाहेर पडायचे असेल तर भगवान महावीर व महात्मा गांधीजींच्या अहिंसा, अपरिग्रह आणि अनर्थदंड या तीन तत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी संत नव्हते, परंतु ते संतप्रवृत्ती असलेले विश्वातील महान व्यक्तिमत्व होते हे निश्चित. त्यामुळेच त्यांचे जीवन आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

महात्मा गांधींचे ग्रंथ आणि गांधींविषयी तटस्थ लेखकांनी लिहिलेले निबंध वाचकांनी जरूर वाचावे. गांधीजींचे संपूर्ण जीवन आपल्याला खूप मोठा संदेश देणारे आहे. मात्र आज ‘गांधी विचार’ पुसण्याचा प्रयत्न जाणूनबुजून होताना दिसतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com