Top Post Ad

कळवा रुग्णालय मृत्युकांड....महाराष्ट्र शासनाची बनवाबनवी !

 


  ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल २३ रुग्णांचे बळी गेले. दोन दिवसांच्या अंतराने अशाप्रकारचे मृत्युकांड झालेली ठाण्याच्या इतिहासातील ही, पहिली आणि सर्वात मोठी दुर्घटना असावी. याच मृत्युकांडाला सुमारे  दोन महिने पूर्ण झाली मात्र, कळवा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यापलीकडे, ठामपा प्रशासन आणि राज्य शासनाने कोणतीही गंभीर पाऊले उचललेली नाहीत. मृत्युकांडाची घटना घडल्यानंतर, राज्य शासनाने चौकशी समिती नेमून, त्याबाबतचा अहवाल १५ दिवसांत जाहीर करण्याचे निर्देश दिलेले असतानाही, त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली नाहीच, उलटपक्षी अहवालात कोणावरही ठपका ठेवण्यात न आल्याची धक्कादायक बाब मात्र, समोर आली. यावरून मोठा गाजावाजा करुन आणि स्वतःचीच पाठ थोपटून, “गतिमान सरकार” असे बिरुद लावलेले महाराष्ट्र शासन सध्या, 'अशी ही बनवाबनवी'च्या प्रयोगात मदमस्त झालेले असल्याचे दिसून येते.  एकापाठोपाठ एक घोषणा करण्यापलीकडे राज्य सरकारचे कोणतेही अस्तित्व जाणवत नाही... आणि याचे ज्वलंत उदाहरण आहे. 

 एकीकडे कारवाईचा आणि चौकशी समितीचा देखावा उभा करायचा आणि दुसरीकडे महापालिका आयुक्तांपासून ते रुग्णालयाच्या अधिष्ठात्यापर्यंत सगळ्यांना पाठीशी घालायचं म्हणजे, “तू मारल्यासारखं कर... मी रडल्यासारखं करतो” असं म्हटल्यास वावगं ठरु नये. त्यातच संतापजनक बाब अशी की, रुग्णांच्या दुर्दैवी मृत्यूंनंतर, चोहोबाजूंनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागल्याने, आठवड्याभरातच महापालिका प्रशासनाने कंत्राटीपद्धतीने परिचारिकांची मेगाभरती करुन टाकली. प्रशासनाला आलेली ती जाग नव्हती; तर, यामाध्यमधून डॅमेज-कंट्रोल करण्याचा हा निलाजरा प्रयत्न होता, हे सांगण्यासाठी कुणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज लागणार नाही. मुळात, कळव्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे, त्याच्या स्थापनेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे.

 रुग्णालयाच्या भव्यतेच्या तुलनेत, त्यातील सुविधा मात्र, सुरुवातीपासूनच अपुऱ्या होत्या. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण, यामुळे महापालिकेला हा पांढरा हत्ती पोसावा लागत होता. यामध्ये प्रशासनाचा नाईलाज नव्हता; तर, हलगर्जीपणा होता... आणि म्हणूनच, ठाणे शहराच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना घडली. त्याहीपेक्षा सर्वात मोठी दुर्दैवाची बाब म्हणजे, आज या घटनेला दोन महिने पूर्ण होऊनही, ठाणे महानगरपालिका प्रशासन “असे काही घडलेच नाही” या अविर्भावात वावरतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब हे, ठाणे शहराचे सुपुत्र असूनही, त्यांनीदेखील ही घटना म्हणावी तेवढी गांभीर्याने घेतलेली नाही, हे इथे खेदाने नमूद करावेसे वाटतेय. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, निष्पाप रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले... 

आता नवरात्रौत्सव त्यानंतर दहा दिवसांनी दसरा आणि पंधरा दिवसांनी दिवाळी... आपण सर्वसामान्य ठाणेकर नागरिक कल्पनाही करु शकणार नाही, अशी स्मशानशांतता आज त्या मृतांच्या घरात पसरलेली असेल; मात्र, उत्सवप्रियतेत रमलेल्या व व्यस्त असलेल्या आमच्या ठाणेकर मुख्यमंत्र्यांना याची पुसटशी तरी कल्पना आहे की नाही, हा संशोधनाचा विषय ठरावा. एकंदरीतच, कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्युकांडाप्रकरणी, महाराष्ट्र शासनाची अशी ही बनवाबनवी सुरु आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही असे मत धर्मराज्य पक्षाचे नितीन देशपांडे यांनी व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com