“सनातनचा अर्थ काय? तर ते शाश्वत आहे, म्हणजेच ते बदलता येणार नाही. कोणीही त्याविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाही. सनातनने जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली. ज्याप्रमाणे डेंग्यू, मलेरिया आणि करोना या रोगाचा संसर्ग पसरतो, त्याप्रमाणे सनातन धर्मामुळे अनेक आजार समाजाला झाले आहेत.” द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे चिरंजीव तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाची सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरु आहे. शनिवारी दि. २ सप्टेंबर रोजी तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. भारतातील बहुतेकांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.
आता त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नसणं, हेच सनातन धर्माचं उत्तम उदाहरण असल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आक्रमक झालेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी माफी मागावी असा सूर आवळला गेला होता. त्यावरुन सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे, असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं होतं.
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि उदयनिधी यांचे वडील एम. के. स्टॅलिन यांनी मुलाच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. “उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मातील भेदभावावर मत व्यक्त केलं आहे. त्यांना कोणत्याही धर्माला अथवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता,” असं मत एम. के. स्टॅलिन यांनी व्यक्त केलं. तसेच भाजपाच्या लोकांनी उदयनिधी यांच्याविरोधात खोटा प्रचार केल्याचाही आरोप स्टॅलिन यांनी केला. उदयनिधी यांनी सनातन धर्मात दलित, आदिवासी आणि महिलांबरोबर होणाऱ्या भेदभावावर मत व्यक्त केलं. त्यांचा कोणत्याही धर्माला किंवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता. उदयनिधी यांनी सनातन धर्मातील शोषण करणाऱ्या या गोष्टींवर बोलणं भाजपा समर्थकांना सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी उदयनिधी यांनी सनातनी लोकांचा नरसंहार केल्याचा खोटा प्रचार केला.”“खरेतर, सनातन धर्माकडे कुष्ठरोग आणि एचआयव्हीसारख्या आजारासारखं पाहिले पाहिजे. मी सनातन धर्मावर कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहे,” असं आव्हान ए राजा यांनी दिलं. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त दिलं आहे. ए राजा म्हणाले, “सनातन आणि विश्वकर्मा योजना वेगळ्या नाहीत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधी यांची भूमिका मवाळ होती. पण, समाजात घृणास्पद असं समजले जाणारे हे आजार नाहीत. कुष्ठरोग आणि एचआयव्हीसारखे आजार घृणास्पद आहेत.”
“सनातन धर्मावरून तीव्र झालेल्या वादावर, योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज आहे”, असे मत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत मांडले.
“नागरिकांची एखाद्या गोष्टीशी असहमत असण्याची आणि सतत चर्चा करण्याची क्षमता हे खऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. इतिहासाने आपल्याला वारंवार हे शिकवले आहे की, योग्य प्रश्न विचारल्याने अनेक महत्त्वपूर्ण उत्तरे मिळतात आणि एक चांगला समाज म्हणून आपल्या विकासात योगदान दिले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्मावरील त्यांची मतं मांडण्याचा हक्क आहे. जर तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनाशी असहमत असाल तर त्यांना धमक्या देण्याचा किंवा कायदेशीर बाबीत अडकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तसेच संकुचित राजकीय फायद्यासाठी लोकांना भावनिक करण्यासाठी त्याच्या शब्दांचा विपर्यास करण्याऐवजी सनातनवर आधारित चर्चेत भाग घेणे महत्त्वाचे आहे. तमिळनाडू हे मोकळ्या वातावरणातील चर्चांसाठी नेहमीच सुरक्षित स्थान राहिले आहे आणि ते पुढेही राहील. सर्वसमावेशकता, समानता आणि प्रगती करून आपल्या परंपरांचे मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे. सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी चला योग्य ती चर्चा करूया.” - अभिनेता कमल हसन
0 टिप्पण्या